Wednesday, March 21, 2012

इति श्री

  मार्च महिना.  जरासं तापमान वर गेलं आणि मी इतके महिने बर्फामुळे घट्ट बसलेली खिडकी उघडली. वाऱ्याच्या थंडगार झोतासरशी एक अस्फुटसा मृद्गंधही नाकाला स्पर्शून गेला. लहानपणापासून अनुभवलेल्या वळवाच्या पावसात येणाऱ्या मृद्गंधापेक्षा हा वेगळ्या थाटाचा. ह्या गंधात वसंताच्या आगमनाचं गुपित दडलयं. दुरुन येणारे पक्षांचे किलबिलाट, आजूबाजूला मातकट होऊन शेवटच्या घटका मोजणारा बर्फ किंवा आपली पांढरी गुबगुबीत फर झाडून टाकणारे ससे येणाऱ्या वसंताचीच नांदी म्हणायचे. पुन्हा झाडं खुलतील, फुलं बहरतील,  पक्ष्यांच्या गर्दीत तळीही परत जिवंत होतील, पण अरेरे! कॅनडातला येता वसंत काही माझ्या नशिबी नाही हेच खरं. बघता बघता दोन वर्ष झाली कॅनडात येउन, आणि आता गाशा गुंडाळायची वेळ आली. कॅनडा सोडायची वेळ आली. मार्च महिना सरतासरता जसे पक्षीगण दक्षिणेकडुन परतू लागतील तसे मला दक्षिणेकडे, म्हणजे भारताकडे, परातावं लागेन. परतताना सोबत बरंच काही घेउन चाललोय म्हणा!

आंद्रेयच्या कुटुंबासमवेत
    दोन वर्षात बरेच काही शिकायला मिळालं. संशोधनाचं म्हणाल तर सौरऊर्जेपासून ते ग्राफीन सारख्या अनेक विषयावर हातपाय मारता आले. पण खरी मजा आली ती म्हणजे अँड्रीय (आंद्रेय) बरोबरच्या सघन चर्चेत. 'स्टिप्स'च्या दुकानात बसुन आम्ही इतके कप काळे/हिरवे चहा रिचवले असतील की विचारयची सोय नाही. कोणत्याशा मंद सुरातील इंग्रजी गाण्याच्या पार्श्वभुमीवर समोरच्या कागदाच्या कस्पटावर किती गणितं सोडवली असतील, किती आलेख खरडले असतील, किती आकृत्या चितारल्या असतील आणि किती कल्पनांचा कीस पाडला असेल ह्याला मोजदाद नाही.  (अर्थात, मी 'चर्चा' हा शब्द वापरला पण बर्याचदा त्यांचे स्वरुप भांडण ह्याच प्रकारात जायचे. कित्तेक वेळा तर तीन-चार कप चहा ढोसूनही प्रश्न मार्गी लागायचा नाही मग आम्ही माझ्या खोलीवर येउन उरलेलं भांडण भांडायचो!) १२ मितीच्या अमूर्त मॅनिफोल्ड मधुन 'रस्ता' शोधायचा असो वा ग्राफिनमधल्या इलेक्ट्रॉनचं हरवलेलं ‌‌वजन समजुन घ्यायचं असो,  आंद्रेय बरोबरच्या चर्चेतून जितकं ज्ञान मिळालं असेल तितकं गेल्या दोन वर्षात इतर कशातूनच मिळालं नसेल! आज जेव्हा कॅनडा सोडायचा विचार करतो तेव्हा हे प्रकर्षानं जाणवतं की भविष्यात ह्या सगळ्या 'हिटेड डिबेट्स'ची मनात सदैव हुरहूर लागून राहील!

कॅरोलीन(, क्ष जॉगर) आणि डॅन
   आणि मनात राहतील ते म्हणजे इथले पक्षी आणि पक्षीनिरीक्षण. स्वत:ची चारचाकी नसेल तर कॅनडात भटकणे जरा जिकरीचे जाते. तरीही  डॅनसारखा सज्जन मित्र बरोबर असेल तर बरीच सोय होते. डॅनबरोबर एडमंटनच्या आजुबाजूला अनेक ठिकाणी भटकलो. 'कॅनडा गीज' पासून 'स्नोवी आऊल' (हिमघुबड)  पर्यंत शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीचे पक्षी पाहिले! डॅनमुळं अनेक व्याख्यानं ऐकायला मिळाली, अनेक लोकांशी ओळखी झाल्या. डॅनचे आभार मानायला माझ्याकडं शब्द नाहीत, तो नसता तर मी फोटोग्राफीचे काय केले असते कोण जाणे!

  कॅनडात बरीच फोटोग्राफी करायला मिळाली. इथला भूभाग अर्थातच खूप वेग‍ळा, बहुदा बर्फात अडकलेला. बराच काळ बर्फाच्छादित राहण्याचे काही फायदेही आहेत. जसं की, छायाचित्रांच्या पार्श्वभूमी‌वरचे लक्ष विचलित करू शकणारे बरेच घटक बर्फात झाकले जातात! पण एक फोटोग्राफर म्हणून 'आयुष्य सार्थकी लागल्याचे' क्षण मिळणे खुप महत्त्वाचे!  आणि असाच एक दुर्मीळ क्षण कॅनडात माझ्या नशिबी आला! व्हॅंकुव्हर शहराला भेट दिली तेव्हा देवमाश्यांच्या (Killer Whale /Orca) स्थलांतराचा काळ होता.  अशी नामी संधी सोडून कसं चालेल? देवमासा बघायचाच हे मी नक्की केले, पण जो भव्य देखावा, जसा टिपायला मिळाला त्याची मात्र कल्पना केली नव्हती.


 सहा हजार किलो वजनाचा, जवळजवळ तिस फूट लांब निव्वळ अजस्त्र असा प्राणी ज्या सुलभतेनं आणि डौलानं पाण्याबाहेर उसळतो त्याला बस तोडच नाही! असलं काहितरी बघायला मिळणं, वरुन त्याचे फोटो काढायला जमणं (आणि कधी नव्हे तो फोकस बरोब्बर बसणं) हे म्हणजे 'अजि म्या ब्रह्म देखिले'! हे असलं काही टिपायला मिळाल्यानं कॅनडातलं आयुष्य सार्थकी लागलं!

    भारतात परतायची कितीही ओढ असली तरी अनेक ‍गोष्टींची हुरहूरही आहे. सदैव हाडांचा ठाव घेणारी थंडी, एखाद्या रात्री दिव्यांच्या पिव‍ळ्या प्रकाशात  ह‍‍ळूवार भिरभिरत जमिनीवर उतरणारं बर्फ, नियमीतपणे गोठणारी आणि फुगणारी नदी, त्याच तालात रंग बदलणारा तिचा किनारा ह्या आणि अश्या कितीतरी गोष्टींचा मनात सतत निवास राहील हेच खरं.  आंद्रेय, डॅन, इव्हान, वाटेवर गवसलेले अनेक अनोळखी चेहरे ह्यांनी आणि अश्या अनेक जणांनी माझा कॅनडातला सह‌वास सुखकर केला, ह्या सर्वांचा मी आभारी आहे. हे, ह्या ब्लॉग वरचं शेवटचं पान, लिहिण्याच्या अनुषंगाने मी सर्व वाचकांचेही आभार मानतो. आपल्या प्रोत्साहनावरच इथ‌वर पोचता आलं. पुन्हा काही खरडायला घेतलं तर इथं अथवा कुठंतरी जाहीर करेनच!

तो पर्यंत, कळावे लोभ असावा!

Wednesday, November 9, 2011

असंबद्ध गमती

दृश्य पहिले: नेहमीचाच रस्ता,
वेळ: घरी परतायची
पात्रं  : मी, व्यंकटेश, आजुबाजुचं बरच पब्लिक (पण सगळे कार मधे असल्यानं बिनचेह-याचे!)

   "भारतासमोरचे प्रोब्लेम्स कशामुळे आहेत माहितीय? कारण भारताच्या वास्तूतच दोष आहे!" - इति माझ्याबरोबर काम करणारा व्यंकटेश! विज्ञानशाखेत काम करणा-यांचे सर्वसाधारणपणे देवाधर्माशी फार सख्य नसतं हा प्रवाद अगदिच काही खरा नव्हे. आमचा व्यंकटेश तिरुपतीच्या व्यंकटेशाचा निस्सिम भक्त. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं आदर्श नोकरी म्हणजे तिरुपतीच्या विद्यापीठात शिक्षकी! 'जर मला तिथे नोकरी मिळाली ना, तर मी रोज मस्तपैकी सकाळी २/३ तास मंदिरात जाउन दर्शन घेईन, संध्याकाळीसुध्दा डोंगरावर जाऊन २/३ चक्कर मारुन येईन आणि जमल्यास दुपारी एकदा दर्शनाला जात जाईन!' व्यंकटेशकडे चमत्कारांनी भरलेल्या घटनांची पण भारी रेलचेल. भारतातील कोणत्यातरी संस्थानाचा कोणतातरी हिरा कसा कोण्या परदेशी माणसाने चोरला, मग कसा तो हिरा जिथे जाईल तिथे, म्हणजे फ्रान्स, बेल्जीअम, इंग्लंड मधे, संकटं कोसळत गेली, मग कसा कोणी एक साधू प्रकट झाला आणि तो हिरा घेउन अदृश्य झाला! किंवा जर पद्मनाभ मंदिराचा सहावा कक्ष उघडला तर सर्वनाश कसा अटळ आहे वगैरे वगैरे! तर तिकडे भारतात लोकपाल आंदोलन जसे तापू लागले तसे व्यंकटेशला भारतासमोर कसा वेगवेगळ्या समस्यांचा चिखल साचलाय ह्याची जाणिव झाली. मग एके दिवशी घरी जाताना वाटेत मला म्हणाला:
तो: भारतासमोरचे प्रोब्लेम्स कशामुळे आहेत माहितीय?
मी: ?
तो: कारण भारताच्या वास्तूतच दोष आहे!
मी : काय सांगतो?
तो: होच मुळी!
मी: असं कसं? अरे वास्तुत दोष असता तर इतका महाकाय देश इतकी वर्ष कसा तगला असता? कशी काय इतकी विकसित संस्कृती टिकली असती?
तो: हो. टिकलीय, पण पहिल्यापासून प्रोब्लेम्स आहेतच ना!
(आता काय बोलणार) मी: बर बुवा, काय दोष आहे वास्तुत?
तो: हिमालय आहे ना, तो उत्तरेला नको होता... दक्षिणेला हवा होता!

मी हबकलोच! आता वास्तुशास्त्राला पटत नसेलही, पण त्या हिमालयाला दक्षिणेला कसं काय कोंबायचं? जागा कुठाय तिकडं? बरं उत्तरेवरुन काढला तर थंडगार चिनी वारं, नाहितर अख्खा चीनच भारतात शिरेल त्यांच काय? आणि समजा, सह्याद्रीची आणि अरवलीची कशीबशी समजुत काढून हिमालयाला दक्षिणेत नेवून ठेवलंच तर पल्याडचा मान्सुन कसा यायचा भारतात? जाउ देत मी आपलं उगिच फालतू हिशोब करत बसतो झालं.
-------------------------------------------------

दृश्य दोन.
जागा: कार्यस्थळ,
वेळ: जेवणाची,
पब्लिक: मी, लिओनार्डो, लिउ, स्टीव्ह, निक, बाजुनं जाताजाता थांबलेली एलेना, (आजुबाजूची काही लोकं आणि समस्त एडमंटण ग्रामस्थ)
विषय: काहिच्या काही, उदा: टेबलटेनिस, लिओची प्रेयसी, स्टीव्हच्या बिन्स, बॉसलोकं, कॅनडातला हिवाळा, हालोवीन

(ब्राझिलियन विद्यार्थी) लिओनार्डो : हे 'हालोवीन' काय असते?
( प्रशासकीय कर्मचारीण) एलेना : तो भुताखेतांसाठी साजरा होणारा दिवस आहे. त्या दिवशी लोक भुतासारखा वेष करुन फिरतात.
लिओ : पण का? कॅनडात भुतं फार आहेत म्हणून का? (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना : छेछे, फक्त कॅनडातच नाही तर सर्वत्र करतात साजरे. आणि भुतं वगैरे असे काही नसतंच रे.
लिओ : आमच्या ब्राझिलमधे असतात की (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना: गप! उगिच गम्मत नको करुस. भुतं काय,  चेटकीणी काय, पिशाच्चं काय सगळे मनाचे खेळ ... पण हो, व्हंपायर मात्र खरे असतात बरं का!
लिओ : ऑऽ?
लिउ :  ऑऽ?
मी :  ऑऽ?
स्टीव्ह : ऑऽ?
निक :  ऑऽ?
बाजुचे टेबल :  ऑऽ?
शेजारची इमारत :  ऑऽ?
एडमंटण गाव :  ऑऽ?
एलेना : हो! व्हंपायर बाकी खरे असतात. युरोपात सर्रास सापडतात!..
(हे बाकी अति झालं! सर्रास सापडतात म्हणायला ये काय पिझ्झा-हट सारखे स्टॉल टाकून बसलेयत का?)
एलेना : .. माझी एक मैत्रीण होती ईटलीची, तिच्या आजीनं स्वत:च्या डोळ्यानं पाहिला होता एक!
लिओ : कसा होता दिसायला? (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना : अरे नेहमीच्या माणसांसारखेच दिसतात रे ते!

लिओ : पण मग व्हंपायर आहे हे ओळखायचं कसं! (लि स खे ए सं प दे ना)
एलेना : जर कोणी व्यक्ती तुमच्या मानेकडं सरकतयं असे दिसले तर समजायचं की ती व्यक्ती व्हंपायर आहे!
लिओ (लि स खे ए सं प दे ना) : ओह् नो!
एलेना : का? काय झालंं?
लिओ : ओह् नो!  मी इतके दिवस एका व्हंपायरच्या प्रेमात पडलोय वाटतं!
(लि स खे ए सं प दे ना)


--------------------------------------------------------
दृश्य तिसरे
पात्रं : कोणीच नाही. (तसं म्हणजे, मी आहे, पण झोपलेलो!)
वेळ: माहित नाही (अहो असं काय करताय, सांगितलं ना झोपलेलो आहे ते)

फोन खणखणतो! यच्चयावत शिव्या गिळत,
मी: हम्म्म् ?
पलिकडून : झोपलाय काय?
मी (यच्चयावत शिव्या गिळत): असे वाटतय तरी...
पलिकडून : अरे मग उठ उठ, धाव.. घराबाहेर पड!
मी : पण का? आधी सांगा कोण बोलतंय? (पृथ्वीवर प्रलय आला तरी झोपेशी तडजोड नाही)
पलिकडून : अरे मी, इव्हान बोलतोय..
मी : ओह्.. का काय् झालं?
इव्हान: अरे असे काय करतोस? आपले ठरलंय ना, ज्याला कोणाला अरोरा दिसेल तो दुस-याला फोन करुन सांगणार ते! आत्ता आकाशात दिसतोय अरोरा .. पटकन उठ आहे बाहेर पड!

आधी पाहिलेला अरोरा!
का? का? मी असे ठराव करतो! तसा मी ह्या पुर्वी अरोरा पाहिला होता त्यामुळं मला तितका उत्साह नव्हता, तरी झक मारत उठलो आणि खिडकीकडं गेलो. डोळे फाडून बघायचा प्रयत्न केला. काहिही दिसले नाही. माझा असा दृढ विश्वास आहे की माणसाच्या पापणीच्या आणि डोळ्यांच्या मधे एक बारीक पडदा असतो. तो जोपर्यंत सरकत नाही ना तो पर्यंत काहिही दिसत नाही! तीन सेकंद कठोर मेहनत घेउन, काहिही दिसत नाहिए असा समज करुन मी परत ताणुन दिली.

दुस-या दिवशी.
इव्हान : मग? दिसला का?
मी : नक्की सांगता येत नाही, पण काहितरी दिसले असावं! (नरोवा कुंजरोवा!)
इव्हान : हो हो खुपच नाजुक दिसत होता!
मी : ह्म्म्
(मनात : चला बरं झालं जीवाला जास्त त्रास नाही करुन घेतला!)

------------------------------------------------------

Friday, October 21, 2011

हाऊ आर यु टूडे?

"हेय, हाऊ आर् यु टूडे?"
आमचा सिक्युरिटी ऑफिसर रोज संध्याकाळी ६ वाजता आमच्या इमारतीमधुन चक्कर मारतो. बरोब्बर ६:०५ ला माझ्या lab च्या बाजुला येतो आणि  मला रोज न चुकता हा प्रश्न विचारतो! मीही माझ्या ठरलेल्या साचेबद्ध उत्तरापैकी एखादे त्याला उत्तर देतो :  "आएम गुड",  "नॉट बॅड!" किंवा तत्सदृश काहितरी. परंतु त्याच्या मुळ प्रश्नातच मुळी एक गम्मत आहे. आज कसा आहेस असे विचारायला, रोज माझ्या आयुष्यात खरेच काही वेगळे घडते का?

   सकाळी विशिष्ट वेळेला कंटाळा करत उठतो. अंघोळ-टंघोळ करुन, अत्यंतिक बेचव सिरीअलचा बाउल रिचवत, संगणिकेवर पत्रं आणि हवामान बघतो. आवरुन कामाला. तोच रस्ता, तिच वेळ त्यामुळे माणसंही तिच. चौकातला भिकारी मला रोज तशीच हाक मारतो, मी तसेच दुर्लक्ष करत पुढे!  पुढे जी काही तुरळक लोक समोरुन येत असतात त्यातून एक बुटका म्हातारा माणुस पुढे येतो. निळी टोपी, निळं जाकीट आणि निळी जीन्स ह्यामुळे ते 'निळकट्ट आजोबा' नावाने ओळखले जातात (म्हणजे सध्या तरी मी एकटा त्यांना त्या नावाने ओळखतोय!). चालताना एका पायाने किंचित अधू असल्यासारखे चालतात. पण फुटपाथचा संपूर्ण वापर केला पाहिजे असा त्यांचा नियम असल्याने फुटपाथच्या उजव्या बाजुपासुन डाव्याबाजुपर्यंत सारखे लेन बदलताना दिसतात. निळकट्ट आजोबांना एक सवय आहे. कॅनडात अनेक ठिकाणी फुकट वर्तमानपत्रे मिळतात. ती एका पेटीत रचुन ठेवलेली असतात आणि अश्या अनेक पेट्या गावभर मांडून ठेवलेल्या असतात. तर आमचे हे निळकट्ट आजोबा एखाद्या पेटीच्या ठिकाणी जातात त्यातले एखादे वर्तमानपत्र काढतात, दोन मिनिटं चाळल्यासारखे करतात, परत ठेवून देतात आणि पुढे सरकतात. मी अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या पेट्यांवर त्यांना हे करताना पाहिलंय पण मला आजतागायत ह्याचे प्रयोजन लक्षात नाही आले! (अहो, ते फुकटचं वर्तमानपत्र आहे, घ्या की आणि घरी जाउन निवांत वाचा ना! (ह्या ह्या अश्याच फुकट्या प्रवृत्तीमुळे घरात पेपरांचा ढिग जमलाय, त्याचे काहितरी करा आधी मग द्या सल्ले दुस-यांना!)) ह्या आजोबांचे असे मनोरंजक निरिक्षण चालू असताना बाजुने एक गंभिर चेह-याचा माणुस जातो. ह्या बुवांविषयी मला कमालीचे आकर्षण आहे. त्याच्याकडे बघितल्यावर मला प्रकर्षाने वाटतं की हा कोणी एखाद्या राजघराण्याचा वंशज आहे. छान परिटघडीचे कपडे, तेही शक्यतो पांढ-या किंवा तत्सदृश सौम्य रंगाचे. त्यावर व्हेस्ट, त्या व्हेस्टच्या रंगाला शोभेल अशी प्यांट! व्यवस्थित विंचरुन लावलेले केस अन् त्यावर एखादी, समस्त पोषाखाला साजेश्या रंगाची ह्याट आणि व्हेस्टच्या खिशात जुन्या पद्धतीचे घड्याळ आहे की काय असे भासवणारी एक सोनेरी चेन. पायातले महागडे चकचकीत लेदरचे बूट हेही ह्या सगळ्या राजवैभवाला साजेसे! खांद्यावर नेहमी एखादी ब्याग, कधी शबनम-छाप तर कधी लेदरची. हा सद्गृहस्थ नेहमी नाकासमोर नजर ठेवून झपाझप चालत निघुन जातो. ह्याचा मागोवा घेउन नक्की करतो काय अशी गुप्तहेरगिरी करावी अशी खुमखूमी आवरती घेत मीही पुढे सरकतो.
   पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत जसे कसब्याचा गणपती पुढे सरकल्यावर तांबडी जोगेश्वरी येतो, तसा हा निटनेटका राजपुत्र पुढं सरकल्यावर थोड्याच वेळात अजागळ 'जांभळ कपल' येतं! जांभळ्या कपलमधल्या पोरीच्या केसांची पुढची बट जांभळी आहे तर पोराच्या हातावर जांभळ्या रंगाचे ट्याटू गोंदवलेले आहेत! हे जोडफं रॉक संगिताचं भक्त आहे हे मी पैजेवर सांगायला तयार आहे. त्यांचा पोषाखच तसा असतो मुळी. प्रामुख्याने काळ्या रंगाचे ढगळ कपडे, त्यावर स्टीलच्या वस्तुंची एंब्रोयडरी! पैकी पोराच्या कानात काळ्या रंगाच्या तीन चकत्या तर पोरीच्या कानात रिंगाच रिंगा! दोघांच्या केसांची स्टाईल कोणत्याप्रकारची आहे ह्यावर अजुन माझेच एकमत झालेले नाही. पोराचे केस बहुधा बेकहम अधिक गांधिजी भागिले दोन, अश्या स्टाईलचे असावेत! 
  ह्या मंडळींच्या व्यतरिक्त, बसस्टॉपवर केस विंचरत उभी दिसणारी भारतीय वंशाची मुलगी(!), टीम होर्टीनच्या टपरीच्या बाहेर चकाट्या पिटणारी बेघर मंडळी, वृद्धाश्रमाबाहेर व्हिलचेअरवर बसून शून्यात बघणारे आजोबा अशी अनेक मंडळी मला नित्यनेमाने अगदी ठराविक ठिकाणी दर्शन देत राहतात. पण 'चिनी म्हातारा' नेमका कोणत्या वेळेस कुठे दिसेल ह्याचा काही नेम नाही. किंवा तो अगदी नियमितपणे आदल्या दिवशीपेक्षा वेगळ्या ठिकाणी दिसतो हे नक्की. आमच्या विद्यापीठाची पिवळ्या जर्द रंगाची पिशवी एका खांद्यावर लटकवून हे महाराज कोणता तरी रस्ता ओलांडतांना दिसतात. पण रस्त्यावर दिसणा-या इतर मंडळींच्यात आणि चिनी म्हाता-याच्यात एक फरक आहे. चिनी म्हाता-याशी मी बोललोय! एके दिवशी मी जेव्हा डबा आणायचा आळस केला होता तेव्हा विद्यापीठाच्या खानावळीत बर्गर गिळत निमुटपणे बसलो होतो. तेव्हा माझ्या शेजारच्या खुर्चीवरुन आवाज आला,
"एक्सक्युज मी!"
"...?" मी बर्गरसाठी वासलेला 'आ' शेजारी बसलेल्या चिनी म्हाता-याकडं वळवला.
चिमा : तुला काय वाटतं, वय महत्वाचे की पात्रता?
 मला काही झेपलंच नाही! अरे ह्या प्रश्नाला काही प्रस्तावना?   
मी : ..?
चिमा : त्याचं काय आहे, चिन मधे एका नोकरीसाठी मी अर्ज धाडतोय, पण समस्या अशी आहे की नोकरीचे पात्रता वय कमाल ३५ वर्षांचे आहे, आणि मी आहे ५६ चा! पण मी म्हणतो एव्हढ्या 'साध्या' कारणासाठी कोणी माझा अर्ज रद्दबातल कसे काय करु शकेल?...
बर्गरसाठी मघाशी आवासलेला आ अजूनही बंद नाही झाला हे माझ्या लक्षात आले!
चिमा : .. माझा अनुभव त्यांनी लक्षात घेतला पाहिजे ना! मी ३४व्या वर्षी इकडं आलो. आज माझ्याकडं २०+ वर्षांचा अनुभव आहे. तेही महत्वाचे आहे ना?
मी : हो ना! (आता ह्या व्यतरिक्त मी काय म्हणू शकत होतो? पण सिरीअस्ली, ३५ आणि ५६??)
पुढे  दहा मिनीटं त्याचं आत्मचरित्र ऐकत ऐकत बर्गर संपवला आणि शेवटी 'जेवण झालं' हे कारण देत तिथुन अक्षरश: कल्टी मारली! तर असा हा चिनी म्हातारा सतत बिचारा नोकरी शोधत ह्या दुकानातून त्या दुकानात हिंडतोय असे मला उगिचच वाटत राहतं!
   अशा नानाविध माणसांना रोज न चुकता हजेरी देत मी कार्यस्थळी दाखल होतो. आता मी काय काम करतो (किंबहुना करतो की नाही) हा आंतरराष्ट्रीय वादाचा मुद्दा असल्यानं त्याच्या खोलात न गेलेलं (माझ्यादृष्टीनं) बरे! (पण हो, संशोधन क्षेत्रात काम करतो म्हणजे रोज बाथरुममधुन 'युरेका-युरेका' म्हणत बोंबलत उठतो असेही नव्हे.)  अर्थातच संशोधनाच्या पाट्या टाकताना चहापाण्याच्या वेळा अचूक सांभाळल्या जातील ह्याची मात्र मी पुरेपूर काळजी घेतो. अरे हो, चहापाणी म्हटल्यावर आठवले, एकवेळ उपरोल्लेखित सर्व घटनांना अपवाद घडू शकतो, पण एक गोष्ट रोज म्हणजे रोज म्हणजे रोज घडते ती म्हणजे आमच्या स्टिव्हच्या डब्यातल्या 'बिन्स'. स्टिव्ह रोजच्या रोजच्या रोज डब्यात एकाच प्रकारे शिजवलेली एकाच पद्धतीची कडधान्यं आणतो. रोऽऽज! त्याच्याबरोबर डबा खाताना आदल्या दिवशीचीच रेकोर्डींग समोर चालू आहे असं भासतं. खरं म्हणजे त्याचा रोजचा दिवस हा तर माझ्यापेक्षाही चाकोरीबद्ध आहे! तो एकतर खुप शिस्तीचा आणि अर्थातच वस्तू जागच्या जागी ठेवणारा आहे. एकदम मितभाषी आणि जंटलमन प्रकाराच्या स्टिव्हचा दिवस कितीही चाकोरीबद्ध असला तरी त्याचं आयुष्य बाकी एकदमच बंडखोर वाटेचं. प्रस्थापित नातेसंबंधाच्या चौकटीला आणि लग्ननिर्देशांना न जुमानता आज स्टिव्ह त्याच्या फिलीपिनी पार्टनर बरोबर सुखाचा संसार करतोय.
       तसं बघायला गेलं तर निळकट्ट म्हातारा असो, राजपुत्र असो, जांभळ कपल असो, चिमा असो वा स्टिव्ह असो सगळे रोज एकसारखंच आयुष्य जगत असतात. तरी मला रोज त्यांची नोंद घ्यावीशी का वाटते? रोज काहितरी वेगळं घडतय अश्या भावाने मी का निरिक्षणं नोंदवत असतो? की खरेच मंडळी चाकोरीचे आयुष्य काढतात? सगळेच जण फुकटची वर्तमानपत्रे उचलतात मग निळकट्ट म्हातारा का नाही उचलत? आणि राजपुत्र अश्या जुन्या धाटणीच्या अवतारात आधुनिक जगात काय म्हणून वापरतो? जांभळ कपल बटा जांभळ्या करुन फिरताना किंवा कानात चकत्या घालून वावरताना आजुबाजूच्या प्रस्थापित वेषभूषेला काटशहच नाही का देत? चिमाला छपन्नाव्या वर्षी पस्तिशीच्या नोकरीची उमेद कशी काय येते? किंबहुना अश्या नोकरीसाठी प्रयत्न करावा हा विचारच कसा काय येतो? आणि रोज कडधान्याचं अळणी जेवण घेणा-या स्टिव्हला नातेसंबंधात ठसका लावणारा मसाला टाकायची ताकत कुठून येते? वरकरणी चाकोरीबद्ध तरिही चाकोरीच्या बाहेरचं आयुष्य जगणार्या ह्या मंडळींना एकदा थांबवून मला विचारायचंय:
'हाऊ आर यु टूडे?'


Friday, March 4, 2011

'अमानुष' माणूस

  बऱ्याच जणांचा असा (गैर)समज आहे की आमचा इव्हान माणूस आहे! वेल्ल, इव्हान म्हणजे माझ्या बाजुच्या संगणकावर माझ्याप्रमाणे चवऱ्या ढाळणारा कानी कपाळी निटस असलेला, दोन हात दोन पाय एक डोके असा वरकरणी माणसासारखा दिसणारा एक अ-माणूस! तो मूळचा युक्रेनचा पण रशियन वंशाचा आणि आमच्याच लॅब मध्ये पी.एचडी करणारा विद्यार्थी! लोकांना तर तो माणुसच वाटतो, पण मला विचाराल तर तो रशियाच्या कुठल्याशा अतिगुप्त संघटनेनं अतिअतिगुप्त प्रयोगाअंतर्गत बनवलेला, हुबेहूब माणुस दिसणारा एक रोबो आहे! अहो खरेच! (कृपया रजनीकांतशी काहीही संबंध जोडू नये!)

  मी सुरवातीला त्याला भेटलो तेव्हा मी इथे नविन होतो आणि 'कोणी घर देता का घर' असा प्रश्न घेऊन गावभर फिरत होतो. तेव्हा एक घर बघण्यासाठी इव्हान बरोबर जाण्याचा योग आला!
"आपण ४ नंबर बसनं १०:४५ ला निघू, १०:५२ ला रस्ता नं १०७ वर उतरु. तिथुन चालत आपल्याला ९ मिनिटं लागतील  म्हणजे आपण ११:०१ ला घरी पोचू; पण हे बसवाले कधिकधी उशिर करतात त्यामुळे आपण त्या घरमालकाला ११:०३ ची वेळ सांगू!" मी आवाक! काळ सांगायची वेळ जेव्हा येते तेव्हा तासाचे 'साधारण' चार भाग करुन त्यांना सव्वा-साडे-पावणे आणि तास अश्या नावाने संबोधायची मला सवय! तासाचे साठ भाग करुन खरंच ते वापरायचे असतात हे आमच्या गावीही नाही! मला जर कुणी सांगितले की मी तुझ्याकडे ११:०३ ला पोचतो तर ११:०३ घड्याळात कसे दिसतात ह्याचा हिशोब लावेतो तो सद्गृहस्थ दारी अवतरलासुद्धा असता! तर तेव्हा मला पहिली चुणूक आली की हा 'अमानुष' आहे! पुढे बसथांब्यावर तर अजुन कहर. मी नवा होतो तरिही मला बसा कश्या व्यवस्थित माहिती आहेत असा भाव खाण्यासाठी त्याला म्हणालो की "अरे, ही बघ ७ नंबर बस, ही पण जाईल ना तिकडे? हिनेच जावं का?". इव्हान : "नको! त्याला दोन कारणे आहेत. कारण एक: दोन्ही बस एकदमच सुटतात आणि कारण दोन: मला ७ नंबर बस आवडत नाही! २००८ सालच्या डिसेंबरमधे  ह्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लागली होती! आणि तेव्हा काही सुट्टीचा दिवसही नव्हता, बुधवार होता!" मी आवाक! महत्प्रयासाने 'तारिख काय होती रे' हा प्रश्न आवरला!  मी परत हिशोबाला बसलो! समजा पुण्यात एखाद्या पीएमटी च्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लावली असती आणि मी जर बसवर रुसून बसलो असतो तर मी अश्या किती बसांच्या प्रेमाला पारखे झालो असतो?! असो. पण इव्हान रोबो आहे की काय असे मला तेव्हा वाटू लागले.

 हळुहळू माझ्या रोबो-सिद्धांतावर माझी पक्की खातरजमा होऊ लागली. इव्हानचा रोज साधारण एकसारखा पेहराव असतो. एखादा टि-शर्ट आणि घोट्यापर्यंत पोचलेली जीन्स! तापमान १०.३ सेल्सिअसच्या वर असले की जीन्सच्या जागी हाफ चड्डी! तो फार हसत नाही. आमच्या सारखं 'ख्या-ख्या' करत दात काढताना तर मी त्याला कधिच पाहिलं नाहिए!  सकाळी भेटला की माझ्यापासून साडे चार फुट अंतरावरुन 'गुड मॉर्निंग' म्हणताना मानेला वरच्या बाजुला किंचीत झटका देतो आणि ओठ साधारण चार मिलिमीटर फाकवतो! बोलताना, ओठांना लिपस्टिक लावलेलं आहे आणि ते खराब होऊ नये म्हणून ओठांची फार हालचाल होणार नाही, अश्या पद्धतीत बोलतो!  तो फार तोलून-मापून आणि तांत्रिक दृष्ट्या अचूक बोलतो; ते "११:०३" वरुन वाचकांच्या ध्यानी आलेच असेल! बोलताना चेह-यावर हावभाव फारच कमी त्यामुळे तो विनोद सांगतोय का मर्तिकाची बातमी ह्याचा काही सुगावा लागत नाही!

  इव्हानला थंडी आवडते, आणि त्याच्यादृष्टीनं थंडी म्हणजे -२०सेल्सिअस पेक्षा कमी तापमान! जेव्हा तापमान -३ सेल्सिअसला पोहोचले होते तेव्हा मी इमानेइतबारे स्वतःला कपड्यांच्या ढिगामधे गुंडाळून वावरत होतो तेव्हा हा मला म्हणतोय "अरे अजुन तर हिवाळा सुरू व्हायचाय;  तू इतके का गुरफटून बसलायस? तसेही किती ऊबदार आहे आत्ता!" ... ऊबदार? हेल्लो??!!

 इव्हानचे फंडेही भारी! 'फुटबॉल किती बोर खेळ आहे! एक चेंडू इतकी सारी माणसं! मला उलटं आवडतं एक माणूस आणि खूप सारे चेंडू - बिलिअर्ड!!' (स्वाभाविकपणे मी आजपर्यंत ह्याच्या समोर क्रिकेटबद्दल बोललो नाहिए! एक चेंडू तोही अतिसुक्ष्म, इतकी सारी माणसे आणि तब्बल ५ दिवस!!)

 आमच्या ग्रुपच्या सिनियर मंडळींना दर आठवड्याला ग्रुप मधल्या पीएचडीच्या मुलामुलींच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनला बसावे लागते. इव्हान चे प्रेझेन्टेशन असले की आम्ही आधीच थोडी तयारी करून घेतो. चेहऱ्याला पाणी मारणे, त्याने मागच्या वेळी काय सांगितले होते ते आठवणे इत्यादी इत्यादी. इव्हान प्रचंड गंभीर चेहऱ्याने खोलीत प्रवेशतो. तो मुळातच सगळीकडे गंभीर मुद्रेने असतो इथे तर गंभीरतेची अनुज्ञप्ती मिळालेली! हा गडी नमनाला चमचाभारही तेल न वापरता सरळ आलेख वगैरे सादर करायला सुरवात करतो. बाजूच्या पब्लिकला (म्हणजे आम्ही बापुडे) कळतही नाही की नेमके कशाचा आलेख आहे आणि काय वरती चाललंय आणि काय खालती घसरतंय!! तो मोजून ५ स्लाईड्स दाखवतो आणि छापील कागद डोळ्यासमोर असल्याप्रमाणे आजूबाजूच्या य:कश्चित मंडळींकडे साफ दुर्लक्ष करत आपले सादरीकरण आटोपते घेतो. त्याने नोबेल पारितोषिकाच्या लायकीचे जरी संशोधन केले तरी बोलताना त्याचा एकही स्वर ना वर सरकतो ना खाली! सादरीकरण संपता संपता निम्मे इतरेजन डुलक्या काढत असतात उर्वरित  छताकडे बघत असतात किंवा खिडकीच्या बाहेर किंवा आपल्या संगणिकेत नाक खुपसून असतात!

 पण तो रोबो असल्याचा त्याला एक फायदाही आहे, तो सुपर हुशार आहे! त्याला त्याच्या कामाबद्दल विचारलेल्या कोणत्या प्रश्नांचे उत्तर येणार नाही असे घडणे फारच दुरापास्त! त्याच्याशी सापेक्षतावादाच्या सिद्धांतापासून (Theory of Relativity) ते पुंज भौतिकीच्या (Quantum Physics) सिद्धांतांवर चर्चा करणे तुफान मजेदार (आणि  आव्हानात्मक) असते. तो रशियन असल्यानं इतर रशियन माणसांप्रमाणे त्याचेही गणिताचा पाया भलताच बळकट आहे.

आणि इव्हान अरसिक आहे असेही नाही! (प्रोग्रामच तसे केले आहे हो!) तो बऱ्याच वेळा गाणी ऐकताना दिसतो (आता गाणी असतात की हाय-कमांडच्या आज्ञावली ते सांगणे कठीण). पण त्याच्या सगळ्यात आवडता छंद म्हणजे ट्रेकिंग! आम्ही तासनतास ट्रेकिंगच्या गप्पा मारत घालवले आहेत. इव्हान खूप सराईत गिर्यारोहक आहे, तो विविध संसाधने वापरून गिर्यारोहण करण्यात पटाईत आहे. ट्रेकिंग, स्कीईंग अश्याबद्दल तो भरभरून बोलतो. त्याला असे भरून बोलताना पहिले की वाटते की चला कुठेतरी 'माणुसकीचा' अंश आहे!


असा हा इव्हान! पुढं जाऊन मला जेव्हा घर मिळालं तेव्हा त्याने मला विचारले की "कुठे आहे तुझे घर?" मी सांगितले अमुक अमुक रस्ता तमुक तमुक गल्ली!
तो: "मग तुला घरी चालत जायला किती वेळ लागतो?"
मी: "अम्म, साधारण अर्धा तास!"
तो: "अर्धा तास? मला नाही वाटत.. कमी लागत असेल"
मी: "हां, असेलही! २० मिनीटं लागत असतील"
तो: "फक्त २० मिनिटं?"
माझा टोटल वैताग! वाटलं म्हणावं : 'अरे २० मिनीटं आणि ३० मिनीटं ह्याच्या मधली वेळ माझं घड्याळ दाखवत नाही रे बाबा!'. पण मी तसे काही बोललो नाही म्हटलं चला आपणही गम्म्त करावी
मी: "त्याचे काय आहे, मला साधारण २४ मिनीटं लागतात पण मी फारच कमी दिवस झाले चालत येतोय त्यामुळे खात्रीनं सांगायला पुरेसा डेटा नाहिए माझ्याकडं!!!"
तो: "ओह! हं .. बरोबर आहे तुझं"

अरे बरोबर काय आहे??? डोंबल!! मला क्षणभर त्याला गदागदा हलवून जागं करावंस वाटलं, पण मग लक्षात आलं तो माणूस थोडीच आहे झोपायला! :)
 

Wednesday, November 24, 2010

बर्फाळ वहि'वाट'

   फार वेळ वाट पाहू न देता आमच्याकडे बर्फाळा येउन थबकला! मागे म्हटल्याप्रमाणे, आमच्या मते, इकडे कॅनडात दोनच ऋतू: एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी हिवाळ्यात थंडी वाजते तर बर्फाळ्यात सगळ्या संवेदना आजुबाजूच्या बर्फाप्रमाणे गोठून गेलेल्या असतात.

   तर असा बर्फाळा येणार म्हणून आम्हीसुद्धा कसून तयारी केली होती; निदान तसा आमचा समज तरी होता! भले थोरले, woodland चा बाप शोभतील असे, बूट घेउन आलो. ('पादत्राण' शब्दाचा उद्गम बहुधा असलेच काहितरी बघून झाला असणार!) पुण्यात असताना कधी मफ्लर वापरुन माहित नाही, इथे इमानेइतबारे एक मफ्लर घेउन ठेवला. पुण्याहून येताना आणलेली कानटोपी अंमळ तकलादू आहे हे ज्ञान व्हायला फार काळ लागला नाही! चुपचाप एक कानटोपीही घेउन आलो. थोडक्यात काय तर बर्फ पडायला सुरु व्हायच्या आधी आम्ही पुरेसी मानसिक तयारी करुन बसलो होतो.

  आणि बर्फ पडला. आणि सोबत पाराही! -१०, -१५, -२५... बघता बघता -३० सेल्सिअस चा असह्य ॠतू चराचराला गोठवता झाला. हवेत होती नव्हती ती सगळी आर्द्रताही बर्फ बनुन जिथे जागा मिळेल तिथे जाउन बसली. सगळं कसे पांढरं-फटाक! इतक्या थंड हवामानात सगळे कसे निर्जीव होउन जाते. बहुतांश झाडांनी पाने केव्हाच झाडून टाकलीयत, त्यामुळे एखादी वा-याची झुळूक आलीच तर त्या सोबत डोलायला कोणी नाही. बहुतांश पक्षीगणही केव्हाच दक्षिणेच्या ऊबदार हवामानाकडे निघून गेलेत. जे कोणी एखाद-दुसरं आहेत ते चुपचाप काळोख्या ढोल्यांमध्ये लपून बसलेत. त्यामुळे पहाटे पक्षांच्या किलबिलाट किंवा चिवचीवाटासारखे रोमँटीक काहिही घडत नाही!  सगळं कसे एकदम चिडीचूप, निष्प्राण! इतक्या थंडीत सूर्यही उगवायचा कंटाळा करतो आणि उगवल्यावर लगेचच घरी परतायच्या घाईत असल्यासारखा क्षितिजावरच टाईमपास करताना दिसतो. त्यामुळे माफक सूर्यप्रकाशाचा बर्फावर काडीमात्र परिणाम होत नाही.

  पण ह्या सगळ्याचा आमच्या उत्साहावर थोडीच परीणाम होणार? आम्हीही थंडीच्या नाकावर टिच्चून ठरवून टाकले की कामाच्या ठिकाणी रोज पायीच चालत जायचे! (लेखकाने 'ठरवून टाकले' असे म्हटले आहे, 'संकल्प केला' असे म्हटलेले नाही, त्यामुळे संकल्पभंगाचे पाप माथी लागायची शक्यता नाही हे वाचकांच्या लक्षात आलेच असेन!) तशीही आमची खत्रुडातली खत्रूड सायकल चोरीला(!) गेल्यावर आम्ही पायीच चालत होतो त्यामुळे काही वेगळी तयारी करायची गरज नव्हती. आणि अंतर जेमतेम दोन किलोमीटर, ते २०-२५ मिनीटात पार होऊन जाते त्यामुळे थंडीची जाणिव व्हायच्या आत आपण ईप्सित जागी पोहोचलेलोसुद्धा असू असा आम्ही अंदाज बांधला! (वाह रे माझ्या राजा!). त्यानंतर आमची ही रोज बर्फ तुडवत जाण्याची वहिवाट सुरू झाली!

  आधी सांगितल्याप्रमाणे आमची मानसिक तयारी जय्यत आहेच, फक्त निघताना रोज काय ती शारिरीक तयारी करावी लागते इतकेच. (व्यायाम? का उगिच गम्मत करता राव!?) लज्जारक्षणार्थ असलेल्या कपड्यांव्यतरिक्त, थर्मल्स, त्यावर एक साधा टी-शर्ट, त्यावर कामाच्या जागी मिरवायचा शर्ट, त्यावर एक स्वेटर त्यावर एक जाडं भरडं जॅकेट, हातात एक किंवा दोन हातमोजे, डोक्यावर कानटोपी, त्यावर जॅकेटची टोपी, लांबीचे आणि मानेच्या परिघाचे अचुक गणित करुन गुंडाळलेला मफ्लर; जो नाकाच्या शेंड्यावर तोलून धरला जातो, पायात जीन्स,  एक किंवा दोन मोजे आणि त्यावर आमचे धट्टेकट्टे बूट, अशी जय्यत तयारी करुन आम्ही रोज युध्दभूमीकडे प्रयाण करायच्या अविर्भावात घराचे दार ओढून घेतो. आणि इथेच पहिली समस्या न चुकता उभी राहते.

  इतकी सगळी साग्रसंगित तयारी केल्यावर त्या जाड्याभरड्या हातमोज्याने काहि केल्या जीन्सच्या खिशात आतवर गेलेली किल्ली बाहेर काढता येत नाही! आम्ही अजुन घराच्या बाहेर पण इमारतीच्या आतल्या उबदार वातावरणातच असतो आणि त्या ड्यांबिस किल्लीच्या आणि हातमोज्याच्या अहमहिमिकेमध्ये आमचा मफ्लरमध्ये गुंडाळलेला श्वास गुदमरायला लागतो! मग परत मफ्लर बाजुला करुन, हातमोजा काढून, वस्त्रप्रावरणांची आवरणं बाजुला काढत खिशातून किल्ली काढुन मार्गस्थ होईपर्यंत कानटोपीने निषेध दाखल केलेला असतो, मफ्लरने गणित चुकवून ठेवलेले असते आणि ती वस्त्रप्रावरणांची आवरणेही टोचायला लागतील अश्या अवस्थेत चुरगाळून गेलेली असतात! पण चिडचीडिचा परमोच्च बिंदू तेव्हा येतो जेव्हा जिन्याच्या चार पाय-या उतरल्यावर हे लक्षात येते की, पेन, रुमाल, पाकीट, कार्ड किंवा तत्सदृश, हरवायचा अंगिभूत गुण असलेल्या कोण्या वस्तुने, आमच्या नजरेला गुंगारा देउन कालच्या शर्ट/पँटच्या खिशात दडी मारलीय!

 पण 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार असे' अश्या घोषवाक्याने प्रेरित आमच्यासारख्या मावळ्याला असली क्षुद्र संकटं थोडीच थांबवणार आहेत? आम्हीही त्या सर्वांवर मात करत, आमची चिलखतं सावरत मोठ्या उमेदीनं इमारतीच्या बाहेर पडतो! हवेच्या थंडगार झोतासह नवोन्मेषाने संचारत आम्ही यात्रा सुरू करतो. पायाखाली कुरुकूरू वाजणा-या बर्फावर निर्धाराने पावले टाकत, दर चार पावलांमागे सिंहावलोकन करत, बर्फावर उमटलेली स्वतःचीच पावले कौतुकाने न्याहाळत आम्ही बाणेदारपणे मार्गाक्रमण करु लागतो!

 हळुहळू डोळ्यांच्या आजुबाजूला थंड वाटू लागते. मग आम्ही मफ्लर अजुन थोडा वर उचलतो आणि कानटोपी खाली खेचतो; भुवयीच्याही थोडी खालीच! आता आम्हाला डोळ्याच्या वरच्या बाजुला टोपी, खालती मफ्लर आणि आजुबाजुला जॅकेटची टोपी असे चौकटबद्ध जग दिसू लागते. मफ्लर, टोपी सावरण्यासाठी खिशातुन बाहेर काढलेला हात आता गारठतो, मग आम्ही परत खिशात तो खुपसून मार्गस्थ!

 दोन चार गल्ल्या पार केल्या रे केल्या की आमच्या बुटाची नाडी बंड करुन उठते. बुटाची सुटलेली नाडी ही दातात अडकलेल्या बडिशेपेच्या तुकड्यासारखी असते; काही केल्या स्वस्थ बसू देत नाही! आमच्या दृष्टीने बुटाची सुटलेली नाडी म्हणजे धर्मसंकट. आता ती  नाडी बांधायची म्हणजे हात खिशातुन तर काढावेच लागतात पण  हातमोज्यातूनही काढावे लागतात! पण 'तस्माद् अपरिहार्ये अर्थे' असे म्हणत, उणे तिस अंश सेल्सिअसच्या तापमानात बधरटलेल्या बोटांनी नाडी बांधताना आम्ही त्या बुट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करुन मोकळे होतो.

 पदयात्रा सुरू करुन पाच सात मिनिटे होतात न होतात तो आम्हाला जाणिव होउ लागते की मघाशी ते 'नवोन्मेष' का काय संचारलं होते ते आजुबाजूच्या बर्फात गोठून गेलंय! पण तरिही आम्ही नेटाने पावले टाकत मोठ्या चौकाच्या सिग्नलपाशी येउन थडकतो. चौक ओलांडण्यासाठी सिग्नल मिळेपर्यंत आजुबाजूच्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेउ लागतो. कॅनडात रस्त्यावरचे बर्फ घसरडे होउ नये म्हणुन त्यावर बारीक वाळू पसरवतात. त्यामुळे येणा-या जाणा-या वाहतुकीच्या पायदळी तुडवून बर्फाचा चिखल तयार होतो. पण बर्फही निगरगट्ट; इतक्या कारा, बसा, ट्रके अंगावरुन जाउनसुद्धा वितळायचे नाव घेत नाही. माती, वाळू आणि बर्फ ह्यांचा भुसभूशित चिखल रस्त्याच्या आजुबाजूला छोटीशी भिंत तयार करतो. हे सगळे निरिक्षण चालू असताना, आमचे गारठलेले हात काही केल्या टाळ्यावर यायचे नाव घेत नसतात. आम्ही दुर्लक्ष करत मार्गस्थ!

 आता एक विचित्र समस्या समोर येते. आमचा मफ्लरमधून बाहेर पडणार उच्छवास आमच्या डोळ्यांकडे सरकतोय हे आम्हाला माहितीच असते. पण आता हळुहळू तो पापण्यावर पाणी आणि बर्फाची एक झालर बनवायला लागतो! आमची परत चिडचीड, आता पापण्या साफ करणे म्हणजे खिशात गरम होऊ पाहणारा हात परत बाहेर! पण पर्याय तरी काय म्हणा! खरेतर आता आम्हाला हेही कळून चुकते की मफ्लरच्या बाहेर सर्वत्रच बारीक बर्फ जमलाय! आम्ही चुपचाप मफ्लर न हलेल ह्याची काळजी घेत परत गारठलेला हात खिशात कोंबून वाट चालू लागतो.

  नाकाला खाज सुटणे, कानात गुदगूल्या होणे, डोळ्यात काहितरी गेल्यासारखे वाटणे किंवा गारठलेले हात अस्वस्थ करणे अश्या असंख्य छोट्यामोठ्या समस्या आमच्या प्रवासात विघ्न आणू पाहातात पण आम्ही निर्धाराने दुर्लक्ष करत पुढे सरकतो! आमची एक वाईट खोड आहे, (तश्या अनेक आहेत,पण सध्यापुरती एकच.) रस्त्यावरुन चालता चालता बाजुला साठलेल्या भुसभूशीत बर्फाला लाथ तरी मारायची किंवा त्यात पाय किती खोल बुडतो हे तपासण्यासाठी त्यात पाय रोवायचा! वाटताना गम्मत वाटते, पण आख्खा बूट वरुन-खालून बर्फाने माखून जातो! मग काय हळुहळू बूटातून थंडी आमच्या पायांपर्यंत पोहोचतेच! आम्ही परत बूट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करतो! एव्हाना आम्ही अर्ध्याच्या वर अंतर आलेलो असतो पण आता पाउले थंड पडू लागलीयत अशी भावना जोर धरू लागते. आमचे हात आधिच थंडीला वैतागलेत आता पायही त्यात सामिल. हातापायांतून आत एक थंडीची लकेर नाचून जाते आणि -३०ची थंडी हाडांपर्यंत पोचते! (तसे आमच्या हाडांपर्यंत पोहोचायला थंडीला विशेष श्रम पडत नसावेत)

  गारठलेले हात-पाय, मफ्लरभोवती साठलेल्या बर्फाने गारठलेला चेहरा, नाकाला सुटलेली खाज, कानाला सुटलेल्या गुदगुल्या, पापण्यावर साचलेला बर्फ ह्यामुळे आमची चिडचीड पराकोटीला पोचते. कधी एकदा एखाद्या इमारतीत शिरतो असे होउन जाते. अजुन पाच एक मिनिटांचे चालणे बाकी असेल आणि थंडीने नाकी नउ आणलेले असतात. इतक्यात समोरून परीशुद्ध कॅनडीयन माणूस जातो. ना हातात मोजे, ना मानेवर मफ्लर, ना डोईवर कानटोपी! थंडीवरच उपकार करतोय अश्या अविर्भावात लटकवलेले जॅकेट! जाताना तो मंदस्मित करतो; आम्हाला वाटते की जणू वाकुल्या दाखवत म्हणतोय
"हे हे हे! ये तो बस शुरवात हैं| आगे आगे देखो होता हैं क्या!!"

 

Wednesday, November 17, 2010

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन

केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.

आम्ही कोण?
'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?

ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!

रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा

आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?

           - भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'.

Tuesday, October 26, 2010

पैलतीरी काफ्का!

  "मित्रा, काय कानफाटात दिल्यासारखं गायलायस!!" अशी अवधूत गुप्तेंची प्रतिक्रिया बहुधा आपण ऐकलीच असेल. काही कलाकार आपल्या कलाकृतीद्वारे आपल्याला असे काही स्तंभित करुन टाकतात की जणु कानफाटात बसल्यासारखे वाटते! आणि जेव्हा जपानी लेखक, "हारुकी मुराकामी" कानफाटात देतात तेव्हा पाचही बोटे व्यवस्थित गालावर उमटतील ह्याची ते खात्री घेतात!

मागे एकदा, आमचे मित्र राज ह्यांनी मुराकामींच्या "Kafka on the shore"  नामक पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यानंतरही त्यांच्या वेगवेगळ्या टिका-टिप्पणीतुन मुराकामींचे नाव सतत कानावर येते होते. राज हे चांगले व्यासंगी मित्र, म्हणुन म्हटले जरा बघावे कोण आहेत हे मुराकामी आणि त्यायोगे Kafka on the shore हे पुस्तक वाचायला घेतले!


Kafka on the shore चे पहिलेच (खरे म्हणजे शून्यावे) प्रकरण "कावळा नावाचा मुलगा" असे असल्याने, लगेचच ध्यानात येते की हे जरा वाचायला जड जाणारे पुस्तक आहे! आणि शेवटच्या पानापर्यंत मुराकामी तशी पुरेपूर खात्रीही घेतात. तसे बघायला गेले तर हे पुस्तक एका पंधरावर्षीय मुलाचे आहे. जो आपल्या बापाला वैतागून आईचा शोध घ्यायला घराबाहेर पडतो. त्याला येणारे गोचर आणि अगोचर अनुभवांच्या झालरीतून तयार झालेले कथानक म्हणजे Kafka on the shore! पण अर्थात ही फक्त ह्या पंधरा वर्षीय मुलाचीच कथा आहे असे म्हणणेही जरा चुकीचे आहे. खरेतर मुलगा फक्त इतर पात्रांना आणि घटनांना जोडणार दुवा आहे.

 पुस्तकाच्या सुरवातीच्या प्रकरणांमधुन अनेक, वरकरणी असंबद्ध अशी, कथानकं जन्माला येतात. वाचकालाही माहित असते की काहितरी करुन हे सगळे घागे एकत्र जोडले जाणार, पण कसे जोडले जाणार ह्याचे गुढ जपण्यात मुराकामी कमालीचे यशस्वी होतात. प्रत्येक प्रकरणांनिशी गहन आणि गुढ होत जाणारे कथानक अश्या धक्कादायक वळणांमधुन जाते की, 'पुढे काय होणार?' हा जीवघेणा प्रश्न पुस्तक हातातून ढळू देत नाही!

पण Kafka on the shore ची फक्त कथाच सुरस आहे असे नाही. किंबहुना "काफ्का..." ची खरी ताकद त्यातल्या तत्त्वज्ञानात आहे! प्रत्येक प्रकरणातुन, प्रत्येक पात्राकडून मुराकामी खुप सारे प्रश्न, अनेक कोडी निर्माण करतात आणि वाचकाला गहन विचारात बुडवतात.  काहींची उत्तरे पुस्तकात मिळतात , तर काही मिळतात की नाही हे सांगणे जरा अवघडच आहे! कथेत खुप सा-या रुपकांची रेलचेल आहे. कोणी मांजरांशी गप्पा मारणारा म्हातारा असो किंवा कोणी कर्नलचे रुप धारण केलेला "एब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट" असो, कधी आकाशातुन पडणा-या जळवा असो किंवा मांजरांच्या आत्म्यांंपासुन बनवलेली बासरी असो! एक ना दोन अश्या अनेक रुपकांतून वाचकाच्या डोक्यात सतत प्रश्नांचे काहुर माजुन जाते!

 Kafka on the shore च्या कथेतुन डोकावणारी पात्रंसुद्धा निराळीच. जवळजवळ सगळीच पात्रं समाजातल्या मुख्य प्रवाहापासुन बाजुला पडलेली. अर्थात, प्रस्थापित नातेसंबधांच्या चौकटीला छेद देणारं किंवा व्यवहारी मनाला अगोचर वाटणा-या घटनांची मंदियाळी असलेल्या कथानकाची पात्रंही सर्वसामान्य असुन कसे चालेन?!

ह्या पुस्तकाचे कथानक, त्यातली पात्रं, घडणा-या घटना सगळंच क्लिष्ट आणि प्रचंड प्रमाणात धक्कादायकही आहेत. खुद्द  मुराकामींच्याच मते हे पुस्तक एकदा वाचुन समजणे जरा अवघड आहे! मुराकामी हे मराठीतल्या जीए किंवा ग्रेस ह्यांच्या जातकुळाचे. त्यामुळे जर तुम्ही जीए/ग्रेसांचे पंखे असाल किंवा काहीतरी बौद्धीक खुराकाच्या शोधार्थ असाल तर पैलतीरीचा काफ्का तुमची वाट बघतोय!! 

You sit at the edge of the world,
I am in a crater that's no more.
Words without letters
Standing in the shadow of the door.

The moon shines down on a sleeping lizard,
Little fish rain from the sky.
Outside the window there are soldiers,
steeling themselves to die.

(Refrain)

Kafka sits in a chair by the shore,
Thinking for the pendulum that moves the world, it seems.
When your heart is closed,
The shadow of the unmoving Sphinx,
Becomes a knife that pierces your dreams.

The drowning girl's fingers
Search for the entrance stone, and more.
Lifting the hem of her azure dress,
She gazes --
at Kafka on the shore"
— Haruki Murakami (Kafka on the Shore)