Tuesday, July 13, 2010

अँड्रीय आणि भारत!

"तुझे भारतात अजुनही काही काँटॅक्ट्स आहेत का?"
"हो अर्थातच! मला इथे येउन पंधरा दिवस तर झालेत, त्याआधी भारतात तर होतो!"

जेवण गरम करता करता, अँड्रीयचा आणि माझा हा "हाय-हॅल्लो" च्या व्यतरिक्त झालेला पहिला संवाद. अँड्रीयकडे बघुन जर त्याचे एका शब्दात वर्णन करा असे कोणी सांगितले असते तर मी म्हणालो असतो - मंद! काही माणसे असतात की ज्यांच्याकडे पाहुन तुम्हालाही एकदम उत्साही वाटायला लागते आणि काही माणसे अशी असतात की, ब्रह्मदेवाने 'जरा बाहेर जाउन येतो, तो पर्यंत जरा ह्या विश्वाच्या पसा-याकडे बघ' असे सांगुन समस्त विश्वाची आर्तता ह्यांच्या खांदी दिल्यासारखे दिसते. अँड्रीय दुस-या श्रेणीतला! नुकतेच e=mc squre चा शोध लावुन आलेल्या आईनस्टाइन सारखी केशभुषा, सदैव अर्धोन्मिलीत नेत्र, 'विश्वाची आर्तता'वाला चेहरा, अत्यंत (म्हणजे अगदीच अत्यंंत) संथगामी बोलणं अश्या ह्या अँड्रीयची समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायची शक्यता शून्य! अँड्रिय मुळचा रशियाचा पण गेले अनेक वर्षंं कॅनडात आहे. (रशियाचा आहे त्यामुळे तो हुशार असावा असे मी मानुन चाललोय!) तो माझ्याच लॅब मध्ये काम करतो पण आमचे कधीच बोलणे झाले नव्हते. इन फॅक्ट आमच्या लॅब मध्ये कोणिच कोणाशी काहिही बोलत नाही, चुकुन बोललेच तरी अत्यंत बारिक आवाजात! (आणि ह्याउलट आमची पुण्याची लॅब! वैभव आणि मी लॅबच्या एका टोकाहुन दुस-या टोकाला एकमेकांना खड्या आवाजात हाक टाकायचो! बाकीच्यांना डिस्टर्ब वगैरे होते हे आमच्या ध्यानीमनीही नसायचे! आणि तसेही लॅबमध्ये हळू बोलण्याचा कायदा आमच्या मास्तरांच्या अखत्यारीत अस्तित्वात यायची शक्यताच नव्हती!)  बाकी काही असो पण त्या दिवसापर्यंत मी अँड्रियला हसताना कधीच पाहिले नव्हते. आणि आत्ता तो हसला!

अँड्रीय : "[हसत] तु कोणत्या शहरातुन आहेस?"
मी : "पुणे .. बॉम्बे माहितीय? तिथुन जवळच आहे!" (पुणे-मुंबई अंतर हे कॅनडाच्या कोणत्याही स्केलवर "जवळ" ह्या प्रकारातच मोडते.)
अँड्रीय :"ओह्ह पुणे?? म्हणजे तो आश्रम आहे तिथेच ना?"
मी : "ओशो आश्रम?"
अँड्रीय :"हां हां! तोच!"

पुण्याचा शनिवारवाडा, गणेशोत्सव, फेस्टिवल, संस्कृती, (आगाऊ) पुणेकर, पर्वती, विद्यापीठ, आगाखान पॅलेस, केळकर संग्रहालय इ. इ. सगळे सोडून नेमके आश्रमच बरे सगळ्यांना माहित असतो! (प्रश्न : वरिल वाक्यातुन लेखकाचा पुणेरी आगाऊपणा कसा दिसतो ते थोडक्यात लिहा! (अजुन एक प्रश्न : लेखक कंस वापरणे कधी सोडणार आहे?))

मी : "तु ओशो-भक्त आहेस का?"
तो : "छे छे! असेच ऐकुन आहे .. खरेतर मला भारताविषयी बरेच काय काय माहितीय"

खरेच! त्याला भारताबद्दल काय काय माहीत होतं. ताजमहाल पासुन जर्मन बेकरी पर्यंत! त्या दिवसा नंतर जवळजवळ रोज आम्ही जेवताना भारत, रशिया आणि कॅनडा ह्यांच्यातील राजकीय संबध, लोकसंखेचे बलाबल, विद्वत्ता, संस्कृती आणि जे काही सापडेल त्या सर्व विषयांवर चर्चा करु लागलो! हळुहळू त्याच्या काही इंटरेस्टींग बाजु मला लक्षात येउ लागल्या! अँड्रीय खाली मान घालुन बोलतो, नजरेस नजर भिडवून बोलणे त्याला काही जमत नाही! तसे अँड्रीयला जोक करायला आवडतात, पण त्याची समस्या अशी आहे की तो इतका संथपणे बोलतो की त्याचा जोक संपायच्या आतच एकतर तो जोक समोरच्याला आधीच कळलेला असतो किंवा समोरच्याला "बोर झालेले" असते! अँड्रीयला एकुणच भारताबद्दल कमालीचं कुतुहल. "तुमच्याकडे म्हणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते?" "तुमच्यातले काही लोकं खुप जास्त श्रीमंत आहेत म्हणे?" "भारतात किती धर्माचे लोक राहतात?" "सध्या बॉलीवूडला कुठली हिट मुव्ही आहे?" एक ना दोन अनेक प्रश्न तो सदैव विचारु लागला! आयुष्यात एकदातरी भारतात यायचे असा त्याचा निर्धार आहे, पण सध्यातरी पोस्ट-डॉकचा तुटपुंजा पगार हा प्रमुख अडथळा आहे. (पोस्टडॉक, त्यांचा पगार आणि त्यांचे (नसलेले) सामाजिक स्थान हा आमच्याकडच्या सर्वात आवडीच्या आणि ज्वलंत विषयांपैकी एक!) मला बाकी कुतुहल की ह्याला इतकी का भारताबद्दल आस्था?

उत्तर सोपे होते - अँड्रीय "योगा" करतो आणि सोबत तो शाकाहारी आहे. ज्या दिवशी त्याला कळलं की मी पण शाकाहारी आहे त्यादिवसापासुन तो माझ्याशी अधिकच खुलून बोलायला लागला. प्राण्यांना मारणे कसे वाईट आणि शाकाहार कसा चांगला ह्याबद्दल त्याने मला एक पंधरा मिनिटांचे लेक्चरपण दिले! आयुष्यात ज्याने कधीच मांसाहार केला नाही, अश्या मला अजुन एक शाकाहारी घास भरवून तो मोकळा झाला! पण त्याला खुलून बोलताना बघायचे असेल तर "योगा" ह्या विषयावर बोलावे!

अँड्रीय : योगा प्रकृतीला चांगला असतो! तू कधी केलायंस का?
मी : हो! लहानपणी करायचो पण आता सोडलं (खोटे खोटे साफ खोटे! शाळेत अर्धा तास, "काय कटकट आहे" असे म्हणून मारलेल्या हातापायांच्या गाठी योगा प्रकारात मोडत नाहीत!)
तो : तुझे आवडते "आसना" कोणते?
मी : [हसत हसत] शवासन! (त्याला विनोद कळला नाही; माझा पोपट!)
तो : ह्म्म्म
मी : आणि तुझे?
तो : मला नीट नावे लक्षात राहत नाहीत, कोणते बरे ते आसन? त्यात पाय वर करतात आणि डोके ... (त्याला मध्येच तोडून)
मी : शिर्षासन?
तो : नाही नाही.. [खांद्यावर हात लावत] डोक्याचा खालचा भाग जमिनीला लावायचा आणि उलटे उभे राहायचे ..
मी : सर्वांगासन??
तो : हां ऽऽऽ! सर्वांगासना!
मी : तु कुठे शिकलास योगा?
तो : मॉस्कोमध्ये. अय्यंगार योगा! आमच्याकडे योगा शिकवायला एक भारतीय गुरु यायचे. त्यांचे शिक्षण प्रत्यक्ष अय्यंगारांच्याकडे झालेले आहे! तुला "पातांजाली योगासूत्रा" माहितीय का?
मी : पातंजली योगसूत्र? हो हो, माहितीय ना
तो : आमचे गुरू त्याच्या रेफरन्सने शिकवायचे! (मी डोळ्यासमोर चित्र उभं करायचा दुबळा प्रयत्न केला आणि सोडुन दिला!)
पुढिल अर्धा तास मला तो योगाच्या वेगवेगळ्या लेव्हल्स, मॉस्कोतले गुरूवर्य अश्या विषयावर सविस्तर माहिती सांगायचा प्रयत्न करत होता! तो इतका तन्मयतेने बोलतो तेव्हा लक्षात येते की ह्याला भारतात यायची इतकी ओढ का आहे!

गेल्या काही दिवसांपासुन एकदमच तो लॅब मधुन गायब झालाय. आता चौकशी केल्यावर ध्यानात आलयं की गेल्या परवा त्याला मुलगा झालाय! आता मला वेगळीच चिंता आहे, पुत्ररत्नाच्या आगमनानंतर ह्याच्या चेह-यावरची आठी वाढणार की कमी होणार?! :)

2 comments: