Tuesday, July 27, 2010

फणसाडचा थरार!

खरंतर ही गोष्ट कॅनडात घडलेली नाही, पण परवा चहाच्या टेबलावर कोणीतरी विषय काढला की, तुमच्या आयुष्यातील सर्वात थरारक प्रसंग कोणता? आणि तत्क्षणी माझ्या डोळ्यासमोर फणसाडचा रस्ता तरारुन गेला!

जंगलं ही माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासमान आणि फणसाडचे जंगल हे सर्वात आवडीच्या जंगलांपैकी एक! रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ बसलेले हे साधारण ७० चौ. किलोमिटरचे छोटेखानी अभयारण्य. पण ह्या जंगलात वाघ नाहीत, सिंह नाहीत, हत्तींचे कळप नाहीत, झेब्रा, गेंडे, मगरी असेही काही नाही. जीपमधुन सफारी नाही, राहायला अलिशान गेस्ट-हाउस नाहीत, ट्रेड-मार्क ठरावं असे इथे काही म्हणजे काही नाही. पर्यायाने (आणि सुदैवाने) इकडे हौशी पर्यटक फार काही यायच्या फंदात पडत नाहीत! पण मला विचाराल तर, ह्या जंगलाकडे जंगलाला म्हणुन हवे असलेले सगळे गुण आहेत! जीवघेणी गंभिरता, त्याच्या निबिडतेत साचुन राहिलेला अंधार, पक्षांचे नाद, जंगलभर झिरपणारा माकडांचा घुत्कार, वेल्यांच्या जीर्ण-शीर्ण जाळ्या, विशाल झाडांची शेवाळलेली राकट खोडं आणि सदैव मानगुटीवर बसणारा थरार; बिबट्याचा थरार! हो, इथे बरेच बिबटे आहेत!


तुम्ही जसे जंगलात दाखल होता तसे हळुहळू बिबट्यांच्या कथा कानावर येउ लागतात आणि मग रात्री तुम्ही बाहेर तंबू टाकून राहता तेव्हा त्या सगळ्या कथा तुमच्या भोवती पिंगा घालायला लागतात! एकंदरीत काय तर तुम्ही सदैव बिबट्याच्या छायेत जगत असता! माझ्याबाबतीतली थरारक गोष्ट ह्याच छायेत उलगडते.

सगळ्या रोमांचाची सुरवात झाली, जेव्हा मी आणि माझे पक्षीमित्र श्री. भागवत आणि श्री. वाघेला, वनरक्षक श्री. नाईक ह्यांच्याबरोबर जंगालातले पक्षीनिरिक्षण संपवुन आमच्या तंबुकडे परतत होतो तेव्हा! सकाळाचे अकरा वाजले असतील, आम्ही आमच्या सुपेगावच्या मुक्कामी पोहोचतच होतो तेवढ्यात एका घराच्या छतावर कौलं नीट करता करता, एकाने हाळी दिली - "ओऽऽऽ नायीकसायब, तुम्च्या बिबट्यांनं ढोर मारलं बगा!"‌‌

त्या दिवशी पहाटे गावाबाहेर एक वासरु बिबट्याने मारलं होते आणि झाडीत लपवून ठेवलं होतं. कदाचित उजाडल्यामुळे त्याला ते खाऊन संपवता आलं नव्हतं. पण त्याचा एक अर्थ असाही होता की, ते वासरु खायला बिबट्या परतणार! आणि जर आजुबाजूला दबा धरुन बसलो तर आम्हाला बिबट्याला पहाण्याची सुवर्णसंधी मिळणार होती! बिबट्या ती शिकार संपवायला परतणार हे १००%, ही संधी कशी सोडणार! आता आमचा डाव असा होता की त्या शिकारीच्या आजुबाजूला काही लपायला जागा मिळते का ते पाहणे आणि संध्याकाळी दबा धरुन बसणे! मी तर झाडावर रात्र काढायचीही मानसिक तयारी करुन बसलो होतो! आम्ही महत्प्रयासाने त्या बिबट्याची ती शिकार शोधली. हळुहळू गावकरीही जमु लागले. बिबट्या ४ वाजल्यानंतर कधिही येइल असे सगळ्यांचेच मत होते. आम्ही असे गृहित धरुन होतो की साधारण अंधार झाला, म्हणजे सहा-साडेसहा की त्यानंतर बिबट्या येईल. तरी अगदी दुपारी ५ पासुन तिथे ठाण मांडायचे ठरवले! पण बिबट्याने शिकार लपवायला जागासुद्धा अशी भन्नाट शोधली होती की आम्हाला काय प्लान आखावा तेच समजत नव्हतं. जंगलाचा जवळजवळ सर्व भाग डोंगररांगांमध्ये बसलाय. एका ऊतारावर ओढ्यामुळे तयार झालेल्या एका छोट्याश्या घळीत बिबट्यानं शिकार लपविली होती. आजुबाजूला सगळीकडे झुडपं माजलेली. जवळपास मोठी झाडं अशी फार कमी. एक साधारणसे झाड शिकारीपासून अगदीच पाच फुटावर! तर दुसरे मोठे आंब्याचे झाड ३०-४० फुटांवर आणि तिथुनही बाकीच्या झुडपांमुळे शिकार दिसतच नव्हती. त्यापलिकडे सर्व निलगिरी! त्यामुळे आम्ही बिबट्या येण्याच्या विरुद्ध बाजुच्या झाडीमध्ये चक्क आमची कार घालायची ठरवलं आणि कारमध्येच दबा धरायचे नक्की केले. अर्थात जिथे शिकार होती तिथे कार आणणे महामुष्कील काम होते, पण तिथे भागवतांचा दांडगा अनुभव कामी आला! शिकार जिथे होती त्याच्यापासुन वरच्याबाजुला ४०-५० फुट अंतरावर एक रस्ता जात होता. हा तसा फार रहदारीचा रस्ता नव्हता. ह्या रस्त्याच्या एका हाताला उतार होता, जिथे घळीत शिकार होती आणि दुसर्या हाताला निबिड जंगल. बिबट्या जंगलातुन आला, रस्ता पार करुन खाली उतरला, जवळपासच्या गावातील हे वासरू मारुन त्या घळीत आणुन लपविले आणि परत रस्ता ओलांडून घरी! तो परत त्याच रस्त्यानं येणार हेही नक्की होतं. बिबट्या पहायला मिळणार ह्या आशेने दुपारी ४ च्या सुमारास प्रचंड रोमांचक अवस्थेत आम्ही शिकारीच्या जागी परतलो.

हळुहळू साडेचार झाले, एव्हाना एकूण सात जण शिकारीभोवती मोर्चेबांधाणी करु लागले होते. आम्ही तिघांनी एका बाजुला कार उभी केली होती, पुण्यातले दोन जिगरबाज मंडळी शिकारीला लागुन असलेल्या झाडावर चढुन बसले होते, तर नाईकसाहेब आणि एक जण आंब्याच्या झाडाच्या अलिकडे शिकारीपासुन १५-२० फुटांवर गवताचे कुंपण उभारुन लपले होते. अर्थात अश्या ठिकाणी कार जर बिबट्याच्या नजरेत खुपू द्यायची नसेल तर ती झाकून ठेवणे स्वाभाविक होते! आम्ही आजुबाजूचे गवत, काटक्या, पाने जे मिळेल त्याने गाडी झाकायला सुरवात केली. तेव्हढ्यात लक्षात आले की तंबूत एक मातकट रंगाची चादर आहे ती फार उपयोगी पडेल. मी पटकन म्हटलं की मी जाउन ती चादर घेउन येतो! निघालो! मी झरझर तो डोंगर चढुन रस्त्याला लागलो! आणि माझ्या आयुष्यातील प्रचंड थरारक क्षणांना सुरवात झाली!

त्या ठिकाणापासुन साधारण दोन किलोमिटर अंतरावर आमचा तंबु होता एव्हढे अंतर मला चालत जायचे होते. रस्त्यावर काळं कुत्रं नाही. आणि मला त्याच रस्त्यानं जायचं होते जिथुन बिबट्या येणार हे १००% नक्की होतं. गावकरी म्हणत होते ४च्या नंतर कधीही येईल. आत्ता ५ वाजत आलेले! आजुबाजूला किर्र झाडी आणि शंभर पावले चाललो नसेन आणि बाजुला बारीक खसखस ऐकु आली! मी स्तब्ध - घामेघुम! थरकाप उडणे म्हणजे काय असते ते पहायचे असेल तर अश्या प्रसंगात अडकावे! इथे आता एखाद्या फुलपाखराने जरी पंख फडफडवले असते तरी माझी टरकली असती. मी टक लावून झाडीकडे पहायला लागलो, कानात प्राण एकवटला, ह्रदयची धडधड मेंदुत पोचली होती ...... आणि एका चिमुकल्या माकडानं टुण्णकन् उडी मारली आणि दुर पळून गेले! मी सुटकेचा निश्वास टाकला. पण माझ्या आयुष्यातल्या सर्वात थरारक प्रसंगी माकडानं माझी फिरकी घेतली होती! माकड दिसणे हे माझ्या दृष्टीनं शुभ होतं, कारण एकतर ते माकड होतं, बिबट्या नव्हता आणि महत्वाचे म्हणजे जर बिबट्या आजुबाजुला असेल तर माकडं धोक्याचा इशारा देत ओरडत राहतात! म्हणजे इथे बिबट्याही नव्हता! मी खुष!

मी धावतपळत तंबु गाठला आणि परतायला लागलो. जसे जसे इप्सित स्थळी पोचु लागलो तसे तसे परत घाम, धडधड चालुच! कानात डोळ्यात तेल टाकुन चालत होतो. इतके "सजग" असल्याची आठवण मला तरी कधीही नाही! आता सोबतीला एक भलतेच टेन्शन! मला जाउन येईपर्यंत जवळजवळ अर्धा तास गेला होता, एव्हढ्यात जर तो बिबट्या शिकारीपाशी पोचला असेल तर? मी जिथुन खाली उतरत होतो, तिथे अशी गर्द झाडी होती की मी शिकारीच्या जवळ पोचेपर्यंत इतर कोणालाही दिसु शकत नव्हतो! म्हणजे कोणा माणसाला दिसायच्या आधी बिबट्याला! ह्रदयाची धडधड सांभाळत हळुहळु उतरु लागलो. झाडीतुन डोकावत डोकावत सावकाश ती शिकार पार करुन गाडीपाशी पोचलो. गाडीवर चादर अंथरुन त्यावर पालापाचोळा टाकुन गाडीत जाउन चुपचाप बसलो! गाडीत बसल्यावर मग कुठे जीवात जीव आला. साडेपाच झालेले, आजुबाजुच्या झाडीत काही हालचाल होतेय का ते आम्ही तिघे टक लाउन पहात होतो. प्रचंड शांतता, नजर, कान नजर झाडीकडे आणि हात कॅमेर्यावर!

सहा वाजत आले असतील आणि नाईकसाहेब त्यांचा आडोसा सोडुन बाहेर आले, झाडावरची पोरंही उतरली, काय झालं ते पहायला आम्हीही बाहेर पडून शिकारीजवळ गेलो. ते काय सांगतात ते ऐकून आम्ही आवाकच झालो! पाच मिनीटं आधी बिबट्या येउन गेला होता! आमच्यापासुन बाजुच्या गर्द झाडीमधुन तो अगदी २०-३० फुटांवरुन गेला, शिकारीच्या जवळ गेला, समोरच्या झाडांवरच्या पोरांशी नजरानजर झाली, त्याला कळलं आजुबाजुला माणसं आहेत, आल्या पावली निघुन गेला! आमच्या सगळ्यांपासुन हाकेच्या अंतरावरही नव्हता पण एव्हढं मोठ्ठं ते धुड फक्त दोघांना ओझरतं दर्शन देत निघुन गेलं. मला चादर आणुन पंधरा मिनिटेही झाली नसतील, तो तिथुन फार काही दूर नसणार तेव्हा! त्यानं मला रस्त्यावर पाहिलं असेल का? मला प्रत्यक्ष बिबट्या दिसला नाही पण त्याच्या नुसत्या उपस्थितीच्या शंकेने माझ्या आयुष्यातल्या थरारक क्षणांना जन्म दिला होता! अशा राजेशाही प्राण्याचा थरारही बाकी राजेशाहीच! गमतीचा भाग म्हणजे, ज्या प्राण्याला बघायचं म्हणुन इतकी तगतग चाललेली तो दिसेल म्हणुनच माझी भंबेरी उडाली होती!

तुमच्या आयुष्यातला थरारक क्षण कोणता?

3 comments: