Wednesday, November 9, 2011

असंबद्ध गमती

दृश्य पहिले: नेहमीचाच रस्ता,
वेळ: घरी परतायची
पात्रं  : मी, व्यंकटेश, आजुबाजुचं बरच पब्लिक (पण सगळे कार मधे असल्यानं बिनचेह-याचे!)

   "भारतासमोरचे प्रोब्लेम्स कशामुळे आहेत माहितीय? कारण भारताच्या वास्तूतच दोष आहे!" - इति माझ्याबरोबर काम करणारा व्यंकटेश! विज्ञानशाखेत काम करणा-यांचे सर्वसाधारणपणे देवाधर्माशी फार सख्य नसतं हा प्रवाद अगदिच काही खरा नव्हे. आमचा व्यंकटेश तिरुपतीच्या व्यंकटेशाचा निस्सिम भक्त. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं आदर्श नोकरी म्हणजे तिरुपतीच्या विद्यापीठात शिक्षकी! 'जर मला तिथे नोकरी मिळाली ना, तर मी रोज मस्तपैकी सकाळी २/३ तास मंदिरात जाउन दर्शन घेईन, संध्याकाळीसुध्दा डोंगरावर जाऊन २/३ चक्कर मारुन येईन आणि जमल्यास दुपारी एकदा दर्शनाला जात जाईन!' व्यंकटेशकडे चमत्कारांनी भरलेल्या घटनांची पण भारी रेलचेल. भारतातील कोणत्यातरी संस्थानाचा कोणतातरी हिरा कसा कोण्या परदेशी माणसाने चोरला, मग कसा तो हिरा जिथे जाईल तिथे, म्हणजे फ्रान्स, बेल्जीअम, इंग्लंड मधे, संकटं कोसळत गेली, मग कसा कोणी एक साधू प्रकट झाला आणि तो हिरा घेउन अदृश्य झाला! किंवा जर पद्मनाभ मंदिराचा सहावा कक्ष उघडला तर सर्वनाश कसा अटळ आहे वगैरे वगैरे! तर तिकडे भारतात लोकपाल आंदोलन जसे तापू लागले तसे व्यंकटेशला भारतासमोर कसा वेगवेगळ्या समस्यांचा चिखल साचलाय ह्याची जाणिव झाली. मग एके दिवशी घरी जाताना वाटेत मला म्हणाला:
तो: भारतासमोरचे प्रोब्लेम्स कशामुळे आहेत माहितीय?
मी: ?
तो: कारण भारताच्या वास्तूतच दोष आहे!
मी : काय सांगतो?
तो: होच मुळी!
मी: असं कसं? अरे वास्तुत दोष असता तर इतका महाकाय देश इतकी वर्ष कसा तगला असता? कशी काय इतकी विकसित संस्कृती टिकली असती?
तो: हो. टिकलीय, पण पहिल्यापासून प्रोब्लेम्स आहेतच ना!
(आता काय बोलणार) मी: बर बुवा, काय दोष आहे वास्तुत?
तो: हिमालय आहे ना, तो उत्तरेला नको होता... दक्षिणेला हवा होता!

मी हबकलोच! आता वास्तुशास्त्राला पटत नसेलही, पण त्या हिमालयाला दक्षिणेला कसं काय कोंबायचं? जागा कुठाय तिकडं? बरं उत्तरेवरुन काढला तर थंडगार चिनी वारं, नाहितर अख्खा चीनच भारतात शिरेल त्यांच काय? आणि समजा, सह्याद्रीची आणि अरवलीची कशीबशी समजुत काढून हिमालयाला दक्षिणेत नेवून ठेवलंच तर पल्याडचा मान्सुन कसा यायचा भारतात? जाउ देत मी आपलं उगिच फालतू हिशोब करत बसतो झालं.
-------------------------------------------------

दृश्य दोन.
जागा: कार्यस्थळ,
वेळ: जेवणाची,
पब्लिक: मी, लिओनार्डो, लिउ, स्टीव्ह, निक, बाजुनं जाताजाता थांबलेली एलेना, (आजुबाजूची काही लोकं आणि समस्त एडमंटण ग्रामस्थ)
विषय: काहिच्या काही, उदा: टेबलटेनिस, लिओची प्रेयसी, स्टीव्हच्या बिन्स, बॉसलोकं, कॅनडातला हिवाळा, हालोवीन

(ब्राझिलियन विद्यार्थी) लिओनार्डो : हे 'हालोवीन' काय असते?
( प्रशासकीय कर्मचारीण) एलेना : तो भुताखेतांसाठी साजरा होणारा दिवस आहे. त्या दिवशी लोक भुतासारखा वेष करुन फिरतात.
लिओ : पण का? कॅनडात भुतं फार आहेत म्हणून का? (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना : छेछे, फक्त कॅनडातच नाही तर सर्वत्र करतात साजरे. आणि भुतं वगैरे असे काही नसतंच रे.
लिओ : आमच्या ब्राझिलमधे असतात की (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना: गप! उगिच गम्मत नको करुस. भुतं काय,  चेटकीणी काय, पिशाच्चं काय सगळे मनाचे खेळ ... पण हो, व्हंपायर मात्र खरे असतात बरं का!
लिओ : ऑऽ?
लिउ :  ऑऽ?
मी :  ऑऽ?
स्टीव्ह : ऑऽ?
निक :  ऑऽ?
बाजुचे टेबल :  ऑऽ?
शेजारची इमारत :  ऑऽ?
एडमंटण गाव :  ऑऽ?
एलेना : हो! व्हंपायर बाकी खरे असतात. युरोपात सर्रास सापडतात!..
(हे बाकी अति झालं! सर्रास सापडतात म्हणायला ये काय पिझ्झा-हट सारखे स्टॉल टाकून बसलेयत का?)
एलेना : .. माझी एक मैत्रीण होती ईटलीची, तिच्या आजीनं स्वत:च्या डोळ्यानं पाहिला होता एक!
लिओ : कसा होता दिसायला? (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना : अरे नेहमीच्या माणसांसारखेच दिसतात रे ते!

लिओ : पण मग व्हंपायर आहे हे ओळखायचं कसं! (लि स खे ए सं प दे ना)
एलेना : जर कोणी व्यक्ती तुमच्या मानेकडं सरकतयं असे दिसले तर समजायचं की ती व्यक्ती व्हंपायर आहे!
लिओ (लि स खे ए सं प दे ना) : ओह् नो!
एलेना : का? काय झालंं?
लिओ : ओह् नो!  मी इतके दिवस एका व्हंपायरच्या प्रेमात पडलोय वाटतं!
(लि स खे ए सं प दे ना)


--------------------------------------------------------
दृश्य तिसरे
पात्रं : कोणीच नाही. (तसं म्हणजे, मी आहे, पण झोपलेलो!)
वेळ: माहित नाही (अहो असं काय करताय, सांगितलं ना झोपलेलो आहे ते)

फोन खणखणतो! यच्चयावत शिव्या गिळत,
मी: हम्म्म् ?
पलिकडून : झोपलाय काय?
मी (यच्चयावत शिव्या गिळत): असे वाटतय तरी...
पलिकडून : अरे मग उठ उठ, धाव.. घराबाहेर पड!
मी : पण का? आधी सांगा कोण बोलतंय? (पृथ्वीवर प्रलय आला तरी झोपेशी तडजोड नाही)
पलिकडून : अरे मी, इव्हान बोलतोय..
मी : ओह्.. का काय् झालं?
इव्हान: अरे असे काय करतोस? आपले ठरलंय ना, ज्याला कोणाला अरोरा दिसेल तो दुस-याला फोन करुन सांगणार ते! आत्ता आकाशात दिसतोय अरोरा .. पटकन उठ आहे बाहेर पड!

आधी पाहिलेला अरोरा!
का? का? मी असे ठराव करतो! तसा मी ह्या पुर्वी अरोरा पाहिला होता त्यामुळं मला तितका उत्साह नव्हता, तरी झक मारत उठलो आणि खिडकीकडं गेलो. डोळे फाडून बघायचा प्रयत्न केला. काहिही दिसले नाही. माझा असा दृढ विश्वास आहे की माणसाच्या पापणीच्या आणि डोळ्यांच्या मधे एक बारीक पडदा असतो. तो जोपर्यंत सरकत नाही ना तो पर्यंत काहिही दिसत नाही! तीन सेकंद कठोर मेहनत घेउन, काहिही दिसत नाहिए असा समज करुन मी परत ताणुन दिली.

दुस-या दिवशी.
इव्हान : मग? दिसला का?
मी : नक्की सांगता येत नाही, पण काहितरी दिसले असावं! (नरोवा कुंजरोवा!)
इव्हान : हो हो खुपच नाजुक दिसत होता!
मी : ह्म्म्
(मनात : चला बरं झालं जीवाला जास्त त्रास नाही करुन घेतला!)

------------------------------------------------------

Friday, October 21, 2011

हाऊ आर यु टूडे?

"हेय, हाऊ आर् यु टूडे?"
आमचा सिक्युरिटी ऑफिसर रोज संध्याकाळी ६ वाजता आमच्या इमारतीमधुन चक्कर मारतो. बरोब्बर ६:०५ ला माझ्या lab च्या बाजुला येतो आणि  मला रोज न चुकता हा प्रश्न विचारतो! मीही माझ्या ठरलेल्या साचेबद्ध उत्तरापैकी एखादे त्याला उत्तर देतो :  "आएम गुड",  "नॉट बॅड!" किंवा तत्सदृश काहितरी. परंतु त्याच्या मुळ प्रश्नातच मुळी एक गम्मत आहे. आज कसा आहेस असे विचारायला, रोज माझ्या आयुष्यात खरेच काही वेगळे घडते का?

   सकाळी विशिष्ट वेळेला कंटाळा करत उठतो. अंघोळ-टंघोळ करुन, अत्यंतिक बेचव सिरीअलचा बाउल रिचवत, संगणिकेवर पत्रं आणि हवामान बघतो. आवरुन कामाला. तोच रस्ता, तिच वेळ त्यामुळे माणसंही तिच. चौकातला भिकारी मला रोज तशीच हाक मारतो, मी तसेच दुर्लक्ष करत पुढे!  पुढे जी काही तुरळक लोक समोरुन येत असतात त्यातून एक बुटका म्हातारा माणुस पुढे येतो. निळी टोपी, निळं जाकीट आणि निळी जीन्स ह्यामुळे ते 'निळकट्ट आजोबा' नावाने ओळखले जातात (म्हणजे सध्या तरी मी एकटा त्यांना त्या नावाने ओळखतोय!). चालताना एका पायाने किंचित अधू असल्यासारखे चालतात. पण फुटपाथचा संपूर्ण वापर केला पाहिजे असा त्यांचा नियम असल्याने फुटपाथच्या उजव्या बाजुपासुन डाव्याबाजुपर्यंत सारखे लेन बदलताना दिसतात. निळकट्ट आजोबांना एक सवय आहे. कॅनडात अनेक ठिकाणी फुकट वर्तमानपत्रे मिळतात. ती एका पेटीत रचुन ठेवलेली असतात आणि अश्या अनेक पेट्या गावभर मांडून ठेवलेल्या असतात. तर आमचे हे निळकट्ट आजोबा एखाद्या पेटीच्या ठिकाणी जातात त्यातले एखादे वर्तमानपत्र काढतात, दोन मिनिटं चाळल्यासारखे करतात, परत ठेवून देतात आणि पुढे सरकतात. मी अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या पेट्यांवर त्यांना हे करताना पाहिलंय पण मला आजतागायत ह्याचे प्रयोजन लक्षात नाही आले! (अहो, ते फुकटचं वर्तमानपत्र आहे, घ्या की आणि घरी जाउन निवांत वाचा ना! (ह्या ह्या अश्याच फुकट्या प्रवृत्तीमुळे घरात पेपरांचा ढिग जमलाय, त्याचे काहितरी करा आधी मग द्या सल्ले दुस-यांना!)) ह्या आजोबांचे असे मनोरंजक निरिक्षण चालू असताना बाजुने एक गंभिर चेह-याचा माणुस जातो. ह्या बुवांविषयी मला कमालीचे आकर्षण आहे. त्याच्याकडे बघितल्यावर मला प्रकर्षाने वाटतं की हा कोणी एखाद्या राजघराण्याचा वंशज आहे. छान परिटघडीचे कपडे, तेही शक्यतो पांढ-या किंवा तत्सदृश सौम्य रंगाचे. त्यावर व्हेस्ट, त्या व्हेस्टच्या रंगाला शोभेल अशी प्यांट! व्यवस्थित विंचरुन लावलेले केस अन् त्यावर एखादी, समस्त पोषाखाला साजेश्या रंगाची ह्याट आणि व्हेस्टच्या खिशात जुन्या पद्धतीचे घड्याळ आहे की काय असे भासवणारी एक सोनेरी चेन. पायातले महागडे चकचकीत लेदरचे बूट हेही ह्या सगळ्या राजवैभवाला साजेसे! खांद्यावर नेहमी एखादी ब्याग, कधी शबनम-छाप तर कधी लेदरची. हा सद्गृहस्थ नेहमी नाकासमोर नजर ठेवून झपाझप चालत निघुन जातो. ह्याचा मागोवा घेउन नक्की करतो काय अशी गुप्तहेरगिरी करावी अशी खुमखूमी आवरती घेत मीही पुढे सरकतो.
   पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत जसे कसब्याचा गणपती पुढे सरकल्यावर तांबडी जोगेश्वरी येतो, तसा हा निटनेटका राजपुत्र पुढं सरकल्यावर थोड्याच वेळात अजागळ 'जांभळ कपल' येतं! जांभळ्या कपलमधल्या पोरीच्या केसांची पुढची बट जांभळी आहे तर पोराच्या हातावर जांभळ्या रंगाचे ट्याटू गोंदवलेले आहेत! हे जोडफं रॉक संगिताचं भक्त आहे हे मी पैजेवर सांगायला तयार आहे. त्यांचा पोषाखच तसा असतो मुळी. प्रामुख्याने काळ्या रंगाचे ढगळ कपडे, त्यावर स्टीलच्या वस्तुंची एंब्रोयडरी! पैकी पोराच्या कानात काळ्या रंगाच्या तीन चकत्या तर पोरीच्या कानात रिंगाच रिंगा! दोघांच्या केसांची स्टाईल कोणत्याप्रकारची आहे ह्यावर अजुन माझेच एकमत झालेले नाही. पोराचे केस बहुधा बेकहम अधिक गांधिजी भागिले दोन, अश्या स्टाईलचे असावेत! 
  ह्या मंडळींच्या व्यतरिक्त, बसस्टॉपवर केस विंचरत उभी दिसणारी भारतीय वंशाची मुलगी(!), टीम होर्टीनच्या टपरीच्या बाहेर चकाट्या पिटणारी बेघर मंडळी, वृद्धाश्रमाबाहेर व्हिलचेअरवर बसून शून्यात बघणारे आजोबा अशी अनेक मंडळी मला नित्यनेमाने अगदी ठराविक ठिकाणी दर्शन देत राहतात. पण 'चिनी म्हातारा' नेमका कोणत्या वेळेस कुठे दिसेल ह्याचा काही नेम नाही. किंवा तो अगदी नियमितपणे आदल्या दिवशीपेक्षा वेगळ्या ठिकाणी दिसतो हे नक्की. आमच्या विद्यापीठाची पिवळ्या जर्द रंगाची पिशवी एका खांद्यावर लटकवून हे महाराज कोणता तरी रस्ता ओलांडतांना दिसतात. पण रस्त्यावर दिसणा-या इतर मंडळींच्यात आणि चिनी म्हाता-याच्यात एक फरक आहे. चिनी म्हाता-याशी मी बोललोय! एके दिवशी मी जेव्हा डबा आणायचा आळस केला होता तेव्हा विद्यापीठाच्या खानावळीत बर्गर गिळत निमुटपणे बसलो होतो. तेव्हा माझ्या शेजारच्या खुर्चीवरुन आवाज आला,
"एक्सक्युज मी!"
"...?" मी बर्गरसाठी वासलेला 'आ' शेजारी बसलेल्या चिनी म्हाता-याकडं वळवला.
चिमा : तुला काय वाटतं, वय महत्वाचे की पात्रता?
 मला काही झेपलंच नाही! अरे ह्या प्रश्नाला काही प्रस्तावना?   
मी : ..?
चिमा : त्याचं काय आहे, चिन मधे एका नोकरीसाठी मी अर्ज धाडतोय, पण समस्या अशी आहे की नोकरीचे पात्रता वय कमाल ३५ वर्षांचे आहे, आणि मी आहे ५६ चा! पण मी म्हणतो एव्हढ्या 'साध्या' कारणासाठी कोणी माझा अर्ज रद्दबातल कसे काय करु शकेल?...
बर्गरसाठी मघाशी आवासलेला आ अजूनही बंद नाही झाला हे माझ्या लक्षात आले!
चिमा : .. माझा अनुभव त्यांनी लक्षात घेतला पाहिजे ना! मी ३४व्या वर्षी इकडं आलो. आज माझ्याकडं २०+ वर्षांचा अनुभव आहे. तेही महत्वाचे आहे ना?
मी : हो ना! (आता ह्या व्यतरिक्त मी काय म्हणू शकत होतो? पण सिरीअस्ली, ३५ आणि ५६??)
पुढे  दहा मिनीटं त्याचं आत्मचरित्र ऐकत ऐकत बर्गर संपवला आणि शेवटी 'जेवण झालं' हे कारण देत तिथुन अक्षरश: कल्टी मारली! तर असा हा चिनी म्हातारा सतत बिचारा नोकरी शोधत ह्या दुकानातून त्या दुकानात हिंडतोय असे मला उगिचच वाटत राहतं!
   अशा नानाविध माणसांना रोज न चुकता हजेरी देत मी कार्यस्थळी दाखल होतो. आता मी काय काम करतो (किंबहुना करतो की नाही) हा आंतरराष्ट्रीय वादाचा मुद्दा असल्यानं त्याच्या खोलात न गेलेलं (माझ्यादृष्टीनं) बरे! (पण हो, संशोधन क्षेत्रात काम करतो म्हणजे रोज बाथरुममधुन 'युरेका-युरेका' म्हणत बोंबलत उठतो असेही नव्हे.)  अर्थातच संशोधनाच्या पाट्या टाकताना चहापाण्याच्या वेळा अचूक सांभाळल्या जातील ह्याची मात्र मी पुरेपूर काळजी घेतो. अरे हो, चहापाणी म्हटल्यावर आठवले, एकवेळ उपरोल्लेखित सर्व घटनांना अपवाद घडू शकतो, पण एक गोष्ट रोज म्हणजे रोज म्हणजे रोज घडते ती म्हणजे आमच्या स्टिव्हच्या डब्यातल्या 'बिन्स'. स्टिव्ह रोजच्या रोजच्या रोज डब्यात एकाच प्रकारे शिजवलेली एकाच पद्धतीची कडधान्यं आणतो. रोऽऽज! त्याच्याबरोबर डबा खाताना आदल्या दिवशीचीच रेकोर्डींग समोर चालू आहे असं भासतं. खरं म्हणजे त्याचा रोजचा दिवस हा तर माझ्यापेक्षाही चाकोरीबद्ध आहे! तो एकतर खुप शिस्तीचा आणि अर्थातच वस्तू जागच्या जागी ठेवणारा आहे. एकदम मितभाषी आणि जंटलमन प्रकाराच्या स्टिव्हचा दिवस कितीही चाकोरीबद्ध असला तरी त्याचं आयुष्य बाकी एकदमच बंडखोर वाटेचं. प्रस्थापित नातेसंबंधाच्या चौकटीला आणि लग्ननिर्देशांना न जुमानता आज स्टिव्ह त्याच्या फिलीपिनी पार्टनर बरोबर सुखाचा संसार करतोय.
       तसं बघायला गेलं तर निळकट्ट म्हातारा असो, राजपुत्र असो, जांभळ कपल असो, चिमा असो वा स्टिव्ह असो सगळे रोज एकसारखंच आयुष्य जगत असतात. तरी मला रोज त्यांची नोंद घ्यावीशी का वाटते? रोज काहितरी वेगळं घडतय अश्या भावाने मी का निरिक्षणं नोंदवत असतो? की खरेच मंडळी चाकोरीचे आयुष्य काढतात? सगळेच जण फुकटची वर्तमानपत्रे उचलतात मग निळकट्ट म्हातारा का नाही उचलत? आणि राजपुत्र अश्या जुन्या धाटणीच्या अवतारात आधुनिक जगात काय म्हणून वापरतो? जांभळ कपल बटा जांभळ्या करुन फिरताना किंवा कानात चकत्या घालून वावरताना आजुबाजूच्या प्रस्थापित वेषभूषेला काटशहच नाही का देत? चिमाला छपन्नाव्या वर्षी पस्तिशीच्या नोकरीची उमेद कशी काय येते? किंबहुना अश्या नोकरीसाठी प्रयत्न करावा हा विचारच कसा काय येतो? आणि रोज कडधान्याचं अळणी जेवण घेणा-या स्टिव्हला नातेसंबंधात ठसका लावणारा मसाला टाकायची ताकत कुठून येते? वरकरणी चाकोरीबद्ध तरिही चाकोरीच्या बाहेरचं आयुष्य जगणार्या ह्या मंडळींना एकदा थांबवून मला विचारायचंय:
'हाऊ आर यु टूडे?'


Friday, March 4, 2011

'अमानुष' माणूस

  बऱ्याच जणांचा असा (गैर)समज आहे की आमचा इव्हान माणूस आहे! वेल्ल, इव्हान म्हणजे माझ्या बाजुच्या संगणकावर माझ्याप्रमाणे चवऱ्या ढाळणारा कानी कपाळी निटस असलेला, दोन हात दोन पाय एक डोके असा वरकरणी माणसासारखा दिसणारा एक अ-माणूस! तो मूळचा युक्रेनचा पण रशियन वंशाचा आणि आमच्याच लॅब मध्ये पी.एचडी करणारा विद्यार्थी! लोकांना तर तो माणुसच वाटतो, पण मला विचाराल तर तो रशियाच्या कुठल्याशा अतिगुप्त संघटनेनं अतिअतिगुप्त प्रयोगाअंतर्गत बनवलेला, हुबेहूब माणुस दिसणारा एक रोबो आहे! अहो खरेच! (कृपया रजनीकांतशी काहीही संबंध जोडू नये!)

  मी सुरवातीला त्याला भेटलो तेव्हा मी इथे नविन होतो आणि 'कोणी घर देता का घर' असा प्रश्न घेऊन गावभर फिरत होतो. तेव्हा एक घर बघण्यासाठी इव्हान बरोबर जाण्याचा योग आला!
"आपण ४ नंबर बसनं १०:४५ ला निघू, १०:५२ ला रस्ता नं १०७ वर उतरु. तिथुन चालत आपल्याला ९ मिनिटं लागतील  म्हणजे आपण ११:०१ ला घरी पोचू; पण हे बसवाले कधिकधी उशिर करतात त्यामुळे आपण त्या घरमालकाला ११:०३ ची वेळ सांगू!" मी आवाक! काळ सांगायची वेळ जेव्हा येते तेव्हा तासाचे 'साधारण' चार भाग करुन त्यांना सव्वा-साडे-पावणे आणि तास अश्या नावाने संबोधायची मला सवय! तासाचे साठ भाग करुन खरंच ते वापरायचे असतात हे आमच्या गावीही नाही! मला जर कुणी सांगितले की मी तुझ्याकडे ११:०३ ला पोचतो तर ११:०३ घड्याळात कसे दिसतात ह्याचा हिशोब लावेतो तो सद्गृहस्थ दारी अवतरलासुद्धा असता! तर तेव्हा मला पहिली चुणूक आली की हा 'अमानुष' आहे! पुढे बसथांब्यावर तर अजुन कहर. मी नवा होतो तरिही मला बसा कश्या व्यवस्थित माहिती आहेत असा भाव खाण्यासाठी त्याला म्हणालो की "अरे, ही बघ ७ नंबर बस, ही पण जाईल ना तिकडे? हिनेच जावं का?". इव्हान : "नको! त्याला दोन कारणे आहेत. कारण एक: दोन्ही बस एकदमच सुटतात आणि कारण दोन: मला ७ नंबर बस आवडत नाही! २००८ सालच्या डिसेंबरमधे  ह्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लागली होती! आणि तेव्हा काही सुट्टीचा दिवसही नव्हता, बुधवार होता!" मी आवाक! महत्प्रयासाने 'तारिख काय होती रे' हा प्रश्न आवरला!  मी परत हिशोबाला बसलो! समजा पुण्यात एखाद्या पीएमटी च्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लावली असती आणि मी जर बसवर रुसून बसलो असतो तर मी अश्या किती बसांच्या प्रेमाला पारखे झालो असतो?! असो. पण इव्हान रोबो आहे की काय असे मला तेव्हा वाटू लागले.

 हळुहळू माझ्या रोबो-सिद्धांतावर माझी पक्की खातरजमा होऊ लागली. इव्हानचा रोज साधारण एकसारखा पेहराव असतो. एखादा टि-शर्ट आणि घोट्यापर्यंत पोचलेली जीन्स! तापमान १०.३ सेल्सिअसच्या वर असले की जीन्सच्या जागी हाफ चड्डी! तो फार हसत नाही. आमच्या सारखं 'ख्या-ख्या' करत दात काढताना तर मी त्याला कधिच पाहिलं नाहिए!  सकाळी भेटला की माझ्यापासून साडे चार फुट अंतरावरुन 'गुड मॉर्निंग' म्हणताना मानेला वरच्या बाजुला किंचीत झटका देतो आणि ओठ साधारण चार मिलिमीटर फाकवतो! बोलताना, ओठांना लिपस्टिक लावलेलं आहे आणि ते खराब होऊ नये म्हणून ओठांची फार हालचाल होणार नाही, अश्या पद्धतीत बोलतो!  तो फार तोलून-मापून आणि तांत्रिक दृष्ट्या अचूक बोलतो; ते "११:०३" वरुन वाचकांच्या ध्यानी आलेच असेल! बोलताना चेह-यावर हावभाव फारच कमी त्यामुळे तो विनोद सांगतोय का मर्तिकाची बातमी ह्याचा काही सुगावा लागत नाही!

  इव्हानला थंडी आवडते, आणि त्याच्यादृष्टीनं थंडी म्हणजे -२०सेल्सिअस पेक्षा कमी तापमान! जेव्हा तापमान -३ सेल्सिअसला पोहोचले होते तेव्हा मी इमानेइतबारे स्वतःला कपड्यांच्या ढिगामधे गुंडाळून वावरत होतो तेव्हा हा मला म्हणतोय "अरे अजुन तर हिवाळा सुरू व्हायचाय;  तू इतके का गुरफटून बसलायस? तसेही किती ऊबदार आहे आत्ता!" ... ऊबदार? हेल्लो??!!

 इव्हानचे फंडेही भारी! 'फुटबॉल किती बोर खेळ आहे! एक चेंडू इतकी सारी माणसं! मला उलटं आवडतं एक माणूस आणि खूप सारे चेंडू - बिलिअर्ड!!' (स्वाभाविकपणे मी आजपर्यंत ह्याच्या समोर क्रिकेटबद्दल बोललो नाहिए! एक चेंडू तोही अतिसुक्ष्म, इतकी सारी माणसे आणि तब्बल ५ दिवस!!)

 आमच्या ग्रुपच्या सिनियर मंडळींना दर आठवड्याला ग्रुप मधल्या पीएचडीच्या मुलामुलींच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनला बसावे लागते. इव्हान चे प्रेझेन्टेशन असले की आम्ही आधीच थोडी तयारी करून घेतो. चेहऱ्याला पाणी मारणे, त्याने मागच्या वेळी काय सांगितले होते ते आठवणे इत्यादी इत्यादी. इव्हान प्रचंड गंभीर चेहऱ्याने खोलीत प्रवेशतो. तो मुळातच सगळीकडे गंभीर मुद्रेने असतो इथे तर गंभीरतेची अनुज्ञप्ती मिळालेली! हा गडी नमनाला चमचाभारही तेल न वापरता सरळ आलेख वगैरे सादर करायला सुरवात करतो. बाजूच्या पब्लिकला (म्हणजे आम्ही बापुडे) कळतही नाही की नेमके कशाचा आलेख आहे आणि काय वरती चाललंय आणि काय खालती घसरतंय!! तो मोजून ५ स्लाईड्स दाखवतो आणि छापील कागद डोळ्यासमोर असल्याप्रमाणे आजूबाजूच्या य:कश्चित मंडळींकडे साफ दुर्लक्ष करत आपले सादरीकरण आटोपते घेतो. त्याने नोबेल पारितोषिकाच्या लायकीचे जरी संशोधन केले तरी बोलताना त्याचा एकही स्वर ना वर सरकतो ना खाली! सादरीकरण संपता संपता निम्मे इतरेजन डुलक्या काढत असतात उर्वरित  छताकडे बघत असतात किंवा खिडकीच्या बाहेर किंवा आपल्या संगणिकेत नाक खुपसून असतात!

 पण तो रोबो असल्याचा त्याला एक फायदाही आहे, तो सुपर हुशार आहे! त्याला त्याच्या कामाबद्दल विचारलेल्या कोणत्या प्रश्नांचे उत्तर येणार नाही असे घडणे फारच दुरापास्त! त्याच्याशी सापेक्षतावादाच्या सिद्धांतापासून (Theory of Relativity) ते पुंज भौतिकीच्या (Quantum Physics) सिद्धांतांवर चर्चा करणे तुफान मजेदार (आणि  आव्हानात्मक) असते. तो रशियन असल्यानं इतर रशियन माणसांप्रमाणे त्याचेही गणिताचा पाया भलताच बळकट आहे.

आणि इव्हान अरसिक आहे असेही नाही! (प्रोग्रामच तसे केले आहे हो!) तो बऱ्याच वेळा गाणी ऐकताना दिसतो (आता गाणी असतात की हाय-कमांडच्या आज्ञावली ते सांगणे कठीण). पण त्याच्या सगळ्यात आवडता छंद म्हणजे ट्रेकिंग! आम्ही तासनतास ट्रेकिंगच्या गप्पा मारत घालवले आहेत. इव्हान खूप सराईत गिर्यारोहक आहे, तो विविध संसाधने वापरून गिर्यारोहण करण्यात पटाईत आहे. ट्रेकिंग, स्कीईंग अश्याबद्दल तो भरभरून बोलतो. त्याला असे भरून बोलताना पहिले की वाटते की चला कुठेतरी 'माणुसकीचा' अंश आहे!


असा हा इव्हान! पुढं जाऊन मला जेव्हा घर मिळालं तेव्हा त्याने मला विचारले की "कुठे आहे तुझे घर?" मी सांगितले अमुक अमुक रस्ता तमुक तमुक गल्ली!
तो: "मग तुला घरी चालत जायला किती वेळ लागतो?"
मी: "अम्म, साधारण अर्धा तास!"
तो: "अर्धा तास? मला नाही वाटत.. कमी लागत असेल"
मी: "हां, असेलही! २० मिनीटं लागत असतील"
तो: "फक्त २० मिनिटं?"
माझा टोटल वैताग! वाटलं म्हणावं : 'अरे २० मिनीटं आणि ३० मिनीटं ह्याच्या मधली वेळ माझं घड्याळ दाखवत नाही रे बाबा!'. पण मी तसे काही बोललो नाही म्हटलं चला आपणही गम्म्त करावी
मी: "त्याचे काय आहे, मला साधारण २४ मिनीटं लागतात पण मी फारच कमी दिवस झाले चालत येतोय त्यामुळे खात्रीनं सांगायला पुरेसा डेटा नाहिए माझ्याकडं!!!"
तो: "ओह! हं .. बरोबर आहे तुझं"

अरे बरोबर काय आहे??? डोंबल!! मला क्षणभर त्याला गदागदा हलवून जागं करावंस वाटलं, पण मग लक्षात आलं तो माणूस थोडीच आहे झोपायला! :)