Saturday, July 3, 2010

ब्लू-बर्ड बँडींग!



ब्लूबर्डची पिसं
   माऊंटन ब्लू-बर्ड (Mountain Bluebird) हा खुपच देखणा पक्षी उन्हाळ्याच्या काळात कॅनडा मध्ये स्थलांतर करतो. नराच्या पिसांच रंग हा त्याला त्याचे नाव बहाल करतो. त्याच्या नावातील माऊंटन हा शब्द कोणत्या डोंगराशी संबधित नसुन कॅनडातील प्रभागाशी संबधित आहे: ईस्टर्न, वेस्टर्न आणि माऊंटन!
   आणखी एक गमतीचा भाग म्हणजे ह्याच्या पिसांचा रंग ह्या त्या पिसांमधिल कोणत्याही रासायनिक घटकद्रव्यांमुळे (जसे की pigments) आलेला नसुन, पिसांच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे आला आहे. पिसांच्या सुक्ष्म रचनेमुळे फक्त निळा प्रकाश बाहेर परावर्तित केला जातो आणि त्यामुळे पिसांना तो रंग प्राप्त होतो. जर एखादे पिस प्रकाशाच्या स्त्रोताच्या पुढे धरुन पाहिले (backlit) तर तिच पिसे राखाडी रंगाची दिसतात!!
नेस्टबॉक्स
 
ब्लू-बर्ड स्वतः घरटे बांधत नाहीत. झाडांमधिल एखादे नैसर्गिक छिद्र किंवा एखाद्या सुतार पक्ष्याने वापरुन सोडलेले छिद्र हे ह्यांचे आवडते आश्रयस्थान! पण सर्वात जास्त ब्लूबर्ड कुठे निवारा करत असतील तर ते मनुष्यनिर्मित नेस्टबॉक्स मध्ये!!  भारताच्या तुलनेत कॅनडामधे (विशेषतः शहराबाहेर) फिरताना एक फरक प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे इथे लोकं नेस्टबॉक्सेस खुप बांधतात! शेताच्या कुंपणावर जवळजवळ प्रत्येक खांबावर एक नेस्टबॉक्स उभा असतो. हे नेस्टबॉक्स स्वाभाविकपणे अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान होतात. भारतात असे फारच कमी आढळते! :(

ह्या नेस्टबॉक्सेसचा फायदा पक्षी-निरिक्षक न उठवतील तर नवलच. "जॅक पार्क" हे असेच एक निरिक्षक. जॅक ७२ वर्षांचे आहेत आणि गेले तब्बल ४५ वर्ष ते पक्षी-निरिक्षक आहेत! अर्थातच ह्या क्षेत्रातील त्यांची हातोटी आणि अनुभव वादातीत आहे! जॅक अजुनही काम करतात. आमच्या गावातील वाईल्डबर्ड जनरल स्टोअर्स मध्ये ते कामाला असतात! (अवांतरः भारतात किती लोक रिटायर झाल्यावर काम करतात?). गेले काही वर्षे जॅक एका भन्नाट कामात मग्न आहेत - ब्लू-बर्ड बँडींग!

 "बँडींग" किंवा "रिंगिंग" हा पक्ष्यांचा अभ्यासातला महत्वाचा घटक. पक्षी कुठुन कसे स्थलांतर करतात, किती वर्षं जगतात, कसे जगतात ह्याचा अभ्यास करण्यासाठी पक्ष्यांच्या पायात (किंवा मानेवर किंवा पंखावर) एक बिल्ला/पट्टी जाते. ह्या पट्टीवर एक सांकेतिक क्रमांक असतो. एकदा का हा क्रमांक पक्ष्याच्या अंगावर चढवला की त्याची नोंद एका डाटाबेस मधे केली जाते. त्यामुळे जेव्हा तो पक्षी स्थानांतर करतो त्यावेळी त्याच्या अंगावरच्या पट्टीवरिल क्रमांकावरुन तो कुठुन आला, कसा आला ह्याची माहीती मिळवता येते!

  तर ब्लू-बर्ड पक्ष्याची माहिती जमवण्यासाठी जॅक ह्यांनी त्यांचे बँडींग १९७४ साली सुरु केले, (स्वयंप्रेरणा आणि स्वयंखर्च) आणि ते अजुनही अव्याहत पणे चालु आहे. दर उन्हाळ्यात ब्लू-बर्डस् स्थलांतर करुन गावाबाहेरच्या शेतांवरच्या बॉक्सेसमध्ये घरटी करतात आणि जॅक त्यांच्या पायात रिंग चढवतात अन्यथा असलेल्या रिंगचा अभ्यास करतात. आणि ज्या कोणाला हे सर्व कसे चालते ते पाहयचे आहे त्यांना आनंदाने स्वतःच्या गाडीतुन घेउन जातात. अर्थातच अशी संधी सोडुन कसे चालेल? त्यामुळे अशाच एका अभियानात मी त्यांना सामिल झालो.


अंडे
आम्ही तीन बोक्सेसचा अभ्यास केला (म्हणजे अभ्यास जॅकनी केला आम्ही आपले बघत होतो!). पैकी एक बॉक्स रिकामा होता (म्हणजे त्यातील पिल्ले उडुन गेली होती). दुसर्या बॉक्स मध्ये एक अंडे होतं. चित्रात दिसत असल्याप्रमाणे ब्लू-बर्डची अंडी मस्त निळसर रंगाची असतात! मादी एकावेळी ५-६ अंडी घालते, जी साधारण दोन आठवडे ती उबविली जातात. त्यानंतर त्यातुन बाहेर आलेली पिल्ले पुढचे २१ दिवस आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतात, मग ती घरटे सोडुन उडुन जातात. अर्थातच सगळ्याच अंड्यातुन पिल्ले बाहेर येतात असे नाही. दुर्दैवाने आम्ही पाहिलेलं अंडेही मृत झालेले होते :(. त्यामुळे त्यातुन पिल्लु बाहेर येणार नव्हते! अंडे जिवंत की मृत हे त्याच्या तापमानावरुन ठरवता येते. मृत अंडी हाताला थंड लागतात (आणि कॅनडामध्ये थंड म्हणजे अक्षरशः थंडगार).  उबवण्याची प्रक्रिया म्हणजे त्या अंड्याचे तापमान नियंत्रीत ठेवण्याची क्रिया असते.
 
पिल्लं

तो बॉक्स सोडुन आम्ही किलोमीटरभर पुढच्या बॉक्सपाशी सरकलो. इथे बाकी आमचे नशीब फळफळले! बॉक्स मध्ये पिल्लं होती - एकुण पाच! जॅकने काही दिवसांपुर्वी ह्या घरट्यात अंडी पाहिली होती त्यामुळे ते बँडींगच्या तयारीतच आले होते. बँडींग करताना एकेका पक्षाला घरट्याबाहेर काढाचचे, पायात काळजीपुर्वक रिंग चढवायची आणि त्याची वहीत नोंद करुन ठेवायची असा क्रम ठरलेला असतो.
पिल्लाला बँडींग करताना
ह्या वेळी पहिल्यांदाच मला कोण्या पक्ष्याच्या पायात रींग चढवायची संधी मिळाली. 

ह्या सगळ्या अभ्यासातुन अनेक गोष्टी जॅकना सापडल्या. एकदा त्यांनी रींग चढवलेला पक्षी तब्बल सात वर्षांनी त्यांना परत सापडला! त्यांच्या हेही लक्षात आले की, नर-मादी आयुष्यभर एकत्र राहतात आणि जर संधी मिळाली तर तोच तोच बॉक्स दरवर्षी वापरतात. म्हणजे दर उन्हाळ्यात ते जेव्हा अमेरिकेतुन हजारो किलोमिटरचा प्रवास करुन कॅनडात येतात तेव्हा ते विशिष्ट गावातील विशिष्ट शेताच्या कुंपणावरिल विशिष्ट बॉक्स शोधुन तिथेच नव्याने घर बसवतात! पण समस्या अशी असते की हे बॉक्स वापरुन झाल्यावर घाण झालेले असतात, मग जॅकसारखी माणसे ब्लू-बर्ड येण्याच्या अगदी आधी सगळे बॉक्सेस साफ करुन ठेवतात!!
पिल्लांशी चाललेले "खेळ" बघुन वैतागलेले आई-बाबा!

भारतातही बँडींग केले जाते पण फारच कमी प्रमाणात! जे होते ते कोणत्या तरी संस्थेतर्फे असते. जॅक सारखे एकलकोंडे बँड बांधणारे मी कोणीच पाहिले नाहित. मला इथे येउन काही महिने झाले नाहित आणि मी अनेक बॅंडींगच्या कार्यक्रमाविषयी ऐकले आणि दोन कार्यक्रमात सहभागी पण झालो. भारतात अशी संधी कधीच मिळाली नव्हती :(. असे का?!



1 comment: