Wednesday, November 9, 2011

असंबद्ध गमती

दृश्य पहिले: नेहमीचाच रस्ता,
वेळ: घरी परतायची
पात्रं  : मी, व्यंकटेश, आजुबाजुचं बरच पब्लिक (पण सगळे कार मधे असल्यानं बिनचेह-याचे!)

   "भारतासमोरचे प्रोब्लेम्स कशामुळे आहेत माहितीय? कारण भारताच्या वास्तूतच दोष आहे!" - इति माझ्याबरोबर काम करणारा व्यंकटेश! विज्ञानशाखेत काम करणा-यांचे सर्वसाधारणपणे देवाधर्माशी फार सख्य नसतं हा प्रवाद अगदिच काही खरा नव्हे. आमचा व्यंकटेश तिरुपतीच्या व्यंकटेशाचा निस्सिम भक्त. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं आदर्श नोकरी म्हणजे तिरुपतीच्या विद्यापीठात शिक्षकी! 'जर मला तिथे नोकरी मिळाली ना, तर मी रोज मस्तपैकी सकाळी २/३ तास मंदिरात जाउन दर्शन घेईन, संध्याकाळीसुध्दा डोंगरावर जाऊन २/३ चक्कर मारुन येईन आणि जमल्यास दुपारी एकदा दर्शनाला जात जाईन!' व्यंकटेशकडे चमत्कारांनी भरलेल्या घटनांची पण भारी रेलचेल. भारतातील कोणत्यातरी संस्थानाचा कोणतातरी हिरा कसा कोण्या परदेशी माणसाने चोरला, मग कसा तो हिरा जिथे जाईल तिथे, म्हणजे फ्रान्स, बेल्जीअम, इंग्लंड मधे, संकटं कोसळत गेली, मग कसा कोणी एक साधू प्रकट झाला आणि तो हिरा घेउन अदृश्य झाला! किंवा जर पद्मनाभ मंदिराचा सहावा कक्ष उघडला तर सर्वनाश कसा अटळ आहे वगैरे वगैरे! तर तिकडे भारतात लोकपाल आंदोलन जसे तापू लागले तसे व्यंकटेशला भारतासमोर कसा वेगवेगळ्या समस्यांचा चिखल साचलाय ह्याची जाणिव झाली. मग एके दिवशी घरी जाताना वाटेत मला म्हणाला:
तो: भारतासमोरचे प्रोब्लेम्स कशामुळे आहेत माहितीय?
मी: ?
तो: कारण भारताच्या वास्तूतच दोष आहे!
मी : काय सांगतो?
तो: होच मुळी!
मी: असं कसं? अरे वास्तुत दोष असता तर इतका महाकाय देश इतकी वर्ष कसा तगला असता? कशी काय इतकी विकसित संस्कृती टिकली असती?
तो: हो. टिकलीय, पण पहिल्यापासून प्रोब्लेम्स आहेतच ना!
(आता काय बोलणार) मी: बर बुवा, काय दोष आहे वास्तुत?
तो: हिमालय आहे ना, तो उत्तरेला नको होता... दक्षिणेला हवा होता!

मी हबकलोच! आता वास्तुशास्त्राला पटत नसेलही, पण त्या हिमालयाला दक्षिणेला कसं काय कोंबायचं? जागा कुठाय तिकडं? बरं उत्तरेवरुन काढला तर थंडगार चिनी वारं, नाहितर अख्खा चीनच भारतात शिरेल त्यांच काय? आणि समजा, सह्याद्रीची आणि अरवलीची कशीबशी समजुत काढून हिमालयाला दक्षिणेत नेवून ठेवलंच तर पल्याडचा मान्सुन कसा यायचा भारतात? जाउ देत मी आपलं उगिच फालतू हिशोब करत बसतो झालं.
-------------------------------------------------

दृश्य दोन.
जागा: कार्यस्थळ,
वेळ: जेवणाची,
पब्लिक: मी, लिओनार्डो, लिउ, स्टीव्ह, निक, बाजुनं जाताजाता थांबलेली एलेना, (आजुबाजूची काही लोकं आणि समस्त एडमंटण ग्रामस्थ)
विषय: काहिच्या काही, उदा: टेबलटेनिस, लिओची प्रेयसी, स्टीव्हच्या बिन्स, बॉसलोकं, कॅनडातला हिवाळा, हालोवीन

(ब्राझिलियन विद्यार्थी) लिओनार्डो : हे 'हालोवीन' काय असते?
( प्रशासकीय कर्मचारीण) एलेना : तो भुताखेतांसाठी साजरा होणारा दिवस आहे. त्या दिवशी लोक भुतासारखा वेष करुन फिरतात.
लिओ : पण का? कॅनडात भुतं फार आहेत म्हणून का? (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना : छेछे, फक्त कॅनडातच नाही तर सर्वत्र करतात साजरे. आणि भुतं वगैरे असे काही नसतंच रे.
लिओ : आमच्या ब्राझिलमधे असतात की (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना: गप! उगिच गम्मत नको करुस. भुतं काय,  चेटकीणी काय, पिशाच्चं काय सगळे मनाचे खेळ ... पण हो, व्हंपायर मात्र खरे असतात बरं का!
लिओ : ऑऽ?
लिउ :  ऑऽ?
मी :  ऑऽ?
स्टीव्ह : ऑऽ?
निक :  ऑऽ?
बाजुचे टेबल :  ऑऽ?
शेजारची इमारत :  ऑऽ?
एडमंटण गाव :  ऑऽ?
एलेना : हो! व्हंपायर बाकी खरे असतात. युरोपात सर्रास सापडतात!..
(हे बाकी अति झालं! सर्रास सापडतात म्हणायला ये काय पिझ्झा-हट सारखे स्टॉल टाकून बसलेयत का?)
एलेना : .. माझी एक मैत्रीण होती ईटलीची, तिच्या आजीनं स्वत:च्या डोळ्यानं पाहिला होता एक!
लिओ : कसा होता दिसायला? (लिओ समोरच्याची खेचायची एकही संधी पडू देत नाही)
एलेना : अरे नेहमीच्या माणसांसारखेच दिसतात रे ते!

लिओ : पण मग व्हंपायर आहे हे ओळखायचं कसं! (लि स खे ए सं प दे ना)
एलेना : जर कोणी व्यक्ती तुमच्या मानेकडं सरकतयं असे दिसले तर समजायचं की ती व्यक्ती व्हंपायर आहे!
लिओ (लि स खे ए सं प दे ना) : ओह् नो!
एलेना : का? काय झालंं?
लिओ : ओह् नो!  मी इतके दिवस एका व्हंपायरच्या प्रेमात पडलोय वाटतं!
(लि स खे ए सं प दे ना)


--------------------------------------------------------
दृश्य तिसरे
पात्रं : कोणीच नाही. (तसं म्हणजे, मी आहे, पण झोपलेलो!)
वेळ: माहित नाही (अहो असं काय करताय, सांगितलं ना झोपलेलो आहे ते)

फोन खणखणतो! यच्चयावत शिव्या गिळत,
मी: हम्म्म् ?
पलिकडून : झोपलाय काय?
मी (यच्चयावत शिव्या गिळत): असे वाटतय तरी...
पलिकडून : अरे मग उठ उठ, धाव.. घराबाहेर पड!
मी : पण का? आधी सांगा कोण बोलतंय? (पृथ्वीवर प्रलय आला तरी झोपेशी तडजोड नाही)
पलिकडून : अरे मी, इव्हान बोलतोय..
मी : ओह्.. का काय् झालं?
इव्हान: अरे असे काय करतोस? आपले ठरलंय ना, ज्याला कोणाला अरोरा दिसेल तो दुस-याला फोन करुन सांगणार ते! आत्ता आकाशात दिसतोय अरोरा .. पटकन उठ आहे बाहेर पड!

आधी पाहिलेला अरोरा!
का? का? मी असे ठराव करतो! तसा मी ह्या पुर्वी अरोरा पाहिला होता त्यामुळं मला तितका उत्साह नव्हता, तरी झक मारत उठलो आणि खिडकीकडं गेलो. डोळे फाडून बघायचा प्रयत्न केला. काहिही दिसले नाही. माझा असा दृढ विश्वास आहे की माणसाच्या पापणीच्या आणि डोळ्यांच्या मधे एक बारीक पडदा असतो. तो जोपर्यंत सरकत नाही ना तो पर्यंत काहिही दिसत नाही! तीन सेकंद कठोर मेहनत घेउन, काहिही दिसत नाहिए असा समज करुन मी परत ताणुन दिली.

दुस-या दिवशी.
इव्हान : मग? दिसला का?
मी : नक्की सांगता येत नाही, पण काहितरी दिसले असावं! (नरोवा कुंजरोवा!)
इव्हान : हो हो खुपच नाजुक दिसत होता!
मी : ह्म्म्
(मनात : चला बरं झालं जीवाला जास्त त्रास नाही करुन घेतला!)

------------------------------------------------------