Wednesday, November 24, 2010

बर्फाळ वहि'वाट'

   फार वेळ वाट पाहू न देता आमच्याकडे बर्फाळा येउन थबकला! मागे म्हटल्याप्रमाणे, आमच्या मते, इकडे कॅनडात दोनच ऋतू: एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी हिवाळ्यात थंडी वाजते तर बर्फाळ्यात सगळ्या संवेदना आजुबाजूच्या बर्फाप्रमाणे गोठून गेलेल्या असतात.

   तर असा बर्फाळा येणार म्हणून आम्हीसुद्धा कसून तयारी केली होती; निदान तसा आमचा समज तरी होता! भले थोरले, woodland चा बाप शोभतील असे, बूट घेउन आलो. ('पादत्राण' शब्दाचा उद्गम बहुधा असलेच काहितरी बघून झाला असणार!) पुण्यात असताना कधी मफ्लर वापरुन माहित नाही, इथे इमानेइतबारे एक मफ्लर घेउन ठेवला. पुण्याहून येताना आणलेली कानटोपी अंमळ तकलादू आहे हे ज्ञान व्हायला फार काळ लागला नाही! चुपचाप एक कानटोपीही घेउन आलो. थोडक्यात काय तर बर्फ पडायला सुरु व्हायच्या आधी आम्ही पुरेसी मानसिक तयारी करुन बसलो होतो.

  आणि बर्फ पडला. आणि सोबत पाराही! -१०, -१५, -२५... बघता बघता -३० सेल्सिअस चा असह्य ॠतू चराचराला गोठवता झाला. हवेत होती नव्हती ती सगळी आर्द्रताही बर्फ बनुन जिथे जागा मिळेल तिथे जाउन बसली. सगळं कसे पांढरं-फटाक! इतक्या थंड हवामानात सगळे कसे निर्जीव होउन जाते. बहुतांश झाडांनी पाने केव्हाच झाडून टाकलीयत, त्यामुळे एखादी वा-याची झुळूक आलीच तर त्या सोबत डोलायला कोणी नाही. बहुतांश पक्षीगणही केव्हाच दक्षिणेच्या ऊबदार हवामानाकडे निघून गेलेत. जे कोणी एखाद-दुसरं आहेत ते चुपचाप काळोख्या ढोल्यांमध्ये लपून बसलेत. त्यामुळे पहाटे पक्षांच्या किलबिलाट किंवा चिवचीवाटासारखे रोमँटीक काहिही घडत नाही!  सगळं कसे एकदम चिडीचूप, निष्प्राण! इतक्या थंडीत सूर्यही उगवायचा कंटाळा करतो आणि उगवल्यावर लगेचच घरी परतायच्या घाईत असल्यासारखा क्षितिजावरच टाईमपास करताना दिसतो. त्यामुळे माफक सूर्यप्रकाशाचा बर्फावर काडीमात्र परिणाम होत नाही.

  पण ह्या सगळ्याचा आमच्या उत्साहावर थोडीच परीणाम होणार? आम्हीही थंडीच्या नाकावर टिच्चून ठरवून टाकले की कामाच्या ठिकाणी रोज पायीच चालत जायचे! (लेखकाने 'ठरवून टाकले' असे म्हटले आहे, 'संकल्प केला' असे म्हटलेले नाही, त्यामुळे संकल्पभंगाचे पाप माथी लागायची शक्यता नाही हे वाचकांच्या लक्षात आलेच असेन!) तशीही आमची खत्रुडातली खत्रूड सायकल चोरीला(!) गेल्यावर आम्ही पायीच चालत होतो त्यामुळे काही वेगळी तयारी करायची गरज नव्हती. आणि अंतर जेमतेम दोन किलोमीटर, ते २०-२५ मिनीटात पार होऊन जाते त्यामुळे थंडीची जाणिव व्हायच्या आत आपण ईप्सित जागी पोहोचलेलोसुद्धा असू असा आम्ही अंदाज बांधला! (वाह रे माझ्या राजा!). त्यानंतर आमची ही रोज बर्फ तुडवत जाण्याची वहिवाट सुरू झाली!

  आधी सांगितल्याप्रमाणे आमची मानसिक तयारी जय्यत आहेच, फक्त निघताना रोज काय ती शारिरीक तयारी करावी लागते इतकेच. (व्यायाम? का उगिच गम्मत करता राव!?) लज्जारक्षणार्थ असलेल्या कपड्यांव्यतरिक्त, थर्मल्स, त्यावर एक साधा टी-शर्ट, त्यावर कामाच्या जागी मिरवायचा शर्ट, त्यावर एक स्वेटर त्यावर एक जाडं भरडं जॅकेट, हातात एक किंवा दोन हातमोजे, डोक्यावर कानटोपी, त्यावर जॅकेटची टोपी, लांबीचे आणि मानेच्या परिघाचे अचुक गणित करुन गुंडाळलेला मफ्लर; जो नाकाच्या शेंड्यावर तोलून धरला जातो, पायात जीन्स,  एक किंवा दोन मोजे आणि त्यावर आमचे धट्टेकट्टे बूट, अशी जय्यत तयारी करुन आम्ही रोज युध्दभूमीकडे प्रयाण करायच्या अविर्भावात घराचे दार ओढून घेतो. आणि इथेच पहिली समस्या न चुकता उभी राहते.

  इतकी सगळी साग्रसंगित तयारी केल्यावर त्या जाड्याभरड्या हातमोज्याने काहि केल्या जीन्सच्या खिशात आतवर गेलेली किल्ली बाहेर काढता येत नाही! आम्ही अजुन घराच्या बाहेर पण इमारतीच्या आतल्या उबदार वातावरणातच असतो आणि त्या ड्यांबिस किल्लीच्या आणि हातमोज्याच्या अहमहिमिकेमध्ये आमचा मफ्लरमध्ये गुंडाळलेला श्वास गुदमरायला लागतो! मग परत मफ्लर बाजुला करुन, हातमोजा काढून, वस्त्रप्रावरणांची आवरणं बाजुला काढत खिशातून किल्ली काढुन मार्गस्थ होईपर्यंत कानटोपीने निषेध दाखल केलेला असतो, मफ्लरने गणित चुकवून ठेवलेले असते आणि ती वस्त्रप्रावरणांची आवरणेही टोचायला लागतील अश्या अवस्थेत चुरगाळून गेलेली असतात! पण चिडचीडिचा परमोच्च बिंदू तेव्हा येतो जेव्हा जिन्याच्या चार पाय-या उतरल्यावर हे लक्षात येते की, पेन, रुमाल, पाकीट, कार्ड किंवा तत्सदृश, हरवायचा अंगिभूत गुण असलेल्या कोण्या वस्तुने, आमच्या नजरेला गुंगारा देउन कालच्या शर्ट/पँटच्या खिशात दडी मारलीय!

 पण 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार असे' अश्या घोषवाक्याने प्रेरित आमच्यासारख्या मावळ्याला असली क्षुद्र संकटं थोडीच थांबवणार आहेत? आम्हीही त्या सर्वांवर मात करत, आमची चिलखतं सावरत मोठ्या उमेदीनं इमारतीच्या बाहेर पडतो! हवेच्या थंडगार झोतासह नवोन्मेषाने संचारत आम्ही यात्रा सुरू करतो. पायाखाली कुरुकूरू वाजणा-या बर्फावर निर्धाराने पावले टाकत, दर चार पावलांमागे सिंहावलोकन करत, बर्फावर उमटलेली स्वतःचीच पावले कौतुकाने न्याहाळत आम्ही बाणेदारपणे मार्गाक्रमण करु लागतो!

 हळुहळू डोळ्यांच्या आजुबाजूला थंड वाटू लागते. मग आम्ही मफ्लर अजुन थोडा वर उचलतो आणि कानटोपी खाली खेचतो; भुवयीच्याही थोडी खालीच! आता आम्हाला डोळ्याच्या वरच्या बाजुला टोपी, खालती मफ्लर आणि आजुबाजुला जॅकेटची टोपी असे चौकटबद्ध जग दिसू लागते. मफ्लर, टोपी सावरण्यासाठी खिशातुन बाहेर काढलेला हात आता गारठतो, मग आम्ही परत खिशात तो खुपसून मार्गस्थ!

 दोन चार गल्ल्या पार केल्या रे केल्या की आमच्या बुटाची नाडी बंड करुन उठते. बुटाची सुटलेली नाडी ही दातात अडकलेल्या बडिशेपेच्या तुकड्यासारखी असते; काही केल्या स्वस्थ बसू देत नाही! आमच्या दृष्टीने बुटाची सुटलेली नाडी म्हणजे धर्मसंकट. आता ती  नाडी बांधायची म्हणजे हात खिशातुन तर काढावेच लागतात पण  हातमोज्यातूनही काढावे लागतात! पण 'तस्माद् अपरिहार्ये अर्थे' असे म्हणत, उणे तिस अंश सेल्सिअसच्या तापमानात बधरटलेल्या बोटांनी नाडी बांधताना आम्ही त्या बुट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करुन मोकळे होतो.

 पदयात्रा सुरू करुन पाच सात मिनिटे होतात न होतात तो आम्हाला जाणिव होउ लागते की मघाशी ते 'नवोन्मेष' का काय संचारलं होते ते आजुबाजूच्या बर्फात गोठून गेलंय! पण तरिही आम्ही नेटाने पावले टाकत मोठ्या चौकाच्या सिग्नलपाशी येउन थडकतो. चौक ओलांडण्यासाठी सिग्नल मिळेपर्यंत आजुबाजूच्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेउ लागतो. कॅनडात रस्त्यावरचे बर्फ घसरडे होउ नये म्हणुन त्यावर बारीक वाळू पसरवतात. त्यामुळे येणा-या जाणा-या वाहतुकीच्या पायदळी तुडवून बर्फाचा चिखल तयार होतो. पण बर्फही निगरगट्ट; इतक्या कारा, बसा, ट्रके अंगावरुन जाउनसुद्धा वितळायचे नाव घेत नाही. माती, वाळू आणि बर्फ ह्यांचा भुसभूशित चिखल रस्त्याच्या आजुबाजूला छोटीशी भिंत तयार करतो. हे सगळे निरिक्षण चालू असताना, आमचे गारठलेले हात काही केल्या टाळ्यावर यायचे नाव घेत नसतात. आम्ही दुर्लक्ष करत मार्गस्थ!

 आता एक विचित्र समस्या समोर येते. आमचा मफ्लरमधून बाहेर पडणार उच्छवास आमच्या डोळ्यांकडे सरकतोय हे आम्हाला माहितीच असते. पण आता हळुहळू तो पापण्यावर पाणी आणि बर्फाची एक झालर बनवायला लागतो! आमची परत चिडचीड, आता पापण्या साफ करणे म्हणजे खिशात गरम होऊ पाहणारा हात परत बाहेर! पण पर्याय तरी काय म्हणा! खरेतर आता आम्हाला हेही कळून चुकते की मफ्लरच्या बाहेर सर्वत्रच बारीक बर्फ जमलाय! आम्ही चुपचाप मफ्लर न हलेल ह्याची काळजी घेत परत गारठलेला हात खिशात कोंबून वाट चालू लागतो.

  नाकाला खाज सुटणे, कानात गुदगूल्या होणे, डोळ्यात काहितरी गेल्यासारखे वाटणे किंवा गारठलेले हात अस्वस्थ करणे अश्या असंख्य छोट्यामोठ्या समस्या आमच्या प्रवासात विघ्न आणू पाहातात पण आम्ही निर्धाराने दुर्लक्ष करत पुढे सरकतो! आमची एक वाईट खोड आहे, (तश्या अनेक आहेत,पण सध्यापुरती एकच.) रस्त्यावरुन चालता चालता बाजुला साठलेल्या भुसभूशीत बर्फाला लाथ तरी मारायची किंवा त्यात पाय किती खोल बुडतो हे तपासण्यासाठी त्यात पाय रोवायचा! वाटताना गम्मत वाटते, पण आख्खा बूट वरुन-खालून बर्फाने माखून जातो! मग काय हळुहळू बूटातून थंडी आमच्या पायांपर्यंत पोहोचतेच! आम्ही परत बूट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करतो! एव्हाना आम्ही अर्ध्याच्या वर अंतर आलेलो असतो पण आता पाउले थंड पडू लागलीयत अशी भावना जोर धरू लागते. आमचे हात आधिच थंडीला वैतागलेत आता पायही त्यात सामिल. हातापायांतून आत एक थंडीची लकेर नाचून जाते आणि -३०ची थंडी हाडांपर्यंत पोचते! (तसे आमच्या हाडांपर्यंत पोहोचायला थंडीला विशेष श्रम पडत नसावेत)

  गारठलेले हात-पाय, मफ्लरभोवती साठलेल्या बर्फाने गारठलेला चेहरा, नाकाला सुटलेली खाज, कानाला सुटलेल्या गुदगुल्या, पापण्यावर साचलेला बर्फ ह्यामुळे आमची चिडचीड पराकोटीला पोचते. कधी एकदा एखाद्या इमारतीत शिरतो असे होउन जाते. अजुन पाच एक मिनिटांचे चालणे बाकी असेल आणि थंडीने नाकी नउ आणलेले असतात. इतक्यात समोरून परीशुद्ध कॅनडीयन माणूस जातो. ना हातात मोजे, ना मानेवर मफ्लर, ना डोईवर कानटोपी! थंडीवरच उपकार करतोय अश्या अविर्भावात लटकवलेले जॅकेट! जाताना तो मंदस्मित करतो; आम्हाला वाटते की जणू वाकुल्या दाखवत म्हणतोय
"हे हे हे! ये तो बस शुरवात हैं| आगे आगे देखो होता हैं क्या!!"

 

8 comments:

  1. Toooo gud Bhalchandra....ekdam perfect varnan ahe he...ani specially ji chidchid vyakta keli ahes na...ti mhanje ekach no...sagla mazaya swatabadlach ahe asa vatala!! :) :)

    ReplyDelete
  2. ek number...!! Wish u all the best for remaining "Barfala"

    ReplyDelete
  3. ekadam sahi bhava...ya varshi thandi lambali aahe barya paiki

    ReplyDelete
  4. ekadam mast !!!!!
    wachatana malahi thandi vaju lagaliye.

    ReplyDelete