Wednesday, March 21, 2012

इति श्री

  मार्च महिना.  जरासं तापमान वर गेलं आणि मी इतके महिने बर्फामुळे घट्ट बसलेली खिडकी उघडली. वाऱ्याच्या थंडगार झोतासरशी एक अस्फुटसा मृद्गंधही नाकाला स्पर्शून गेला. लहानपणापासून अनुभवलेल्या वळवाच्या पावसात येणाऱ्या मृद्गंधापेक्षा हा वेगळ्या थाटाचा. ह्या गंधात वसंताच्या आगमनाचं गुपित दडलयं. दुरुन येणारे पक्षांचे किलबिलाट, आजूबाजूला मातकट होऊन शेवटच्या घटका मोजणारा बर्फ किंवा आपली पांढरी गुबगुबीत फर झाडून टाकणारे ससे येणाऱ्या वसंताचीच नांदी म्हणायचे. पुन्हा झाडं खुलतील, फुलं बहरतील,  पक्ष्यांच्या गर्दीत तळीही परत जिवंत होतील, पण अरेरे! कॅनडातला येता वसंत काही माझ्या नशिबी नाही हेच खरं. बघता बघता दोन वर्ष झाली कॅनडात येउन, आणि आता गाशा गुंडाळायची वेळ आली. कॅनडा सोडायची वेळ आली. मार्च महिना सरतासरता जसे पक्षीगण दक्षिणेकडुन परतू लागतील तसे मला दक्षिणेकडे, म्हणजे भारताकडे, परातावं लागेन. परतताना सोबत बरंच काही घेउन चाललोय म्हणा!

आंद्रेयच्या कुटुंबासमवेत
    दोन वर्षात बरेच काही शिकायला मिळालं. संशोधनाचं म्हणाल तर सौरऊर्जेपासून ते ग्राफीन सारख्या अनेक विषयावर हातपाय मारता आले. पण खरी मजा आली ती म्हणजे अँड्रीय (आंद्रेय) बरोबरच्या सघन चर्चेत. 'स्टिप्स'च्या दुकानात बसुन आम्ही इतके कप काळे/हिरवे चहा रिचवले असतील की विचारयची सोय नाही. कोणत्याशा मंद सुरातील इंग्रजी गाण्याच्या पार्श्वभुमीवर समोरच्या कागदाच्या कस्पटावर किती गणितं सोडवली असतील, किती आलेख खरडले असतील, किती आकृत्या चितारल्या असतील आणि किती कल्पनांचा कीस पाडला असेल ह्याला मोजदाद नाही.  (अर्थात, मी 'चर्चा' हा शब्द वापरला पण बर्याचदा त्यांचे स्वरुप भांडण ह्याच प्रकारात जायचे. कित्तेक वेळा तर तीन-चार कप चहा ढोसूनही प्रश्न मार्गी लागायचा नाही मग आम्ही माझ्या खोलीवर येउन उरलेलं भांडण भांडायचो!) १२ मितीच्या अमूर्त मॅनिफोल्ड मधुन 'रस्ता' शोधायचा असो वा ग्राफिनमधल्या इलेक्ट्रॉनचं हरवलेलं ‌‌वजन समजुन घ्यायचं असो,  आंद्रेय बरोबरच्या चर्चेतून जितकं ज्ञान मिळालं असेल तितकं गेल्या दोन वर्षात इतर कशातूनच मिळालं नसेल! आज जेव्हा कॅनडा सोडायचा विचार करतो तेव्हा हे प्रकर्षानं जाणवतं की भविष्यात ह्या सगळ्या 'हिटेड डिबेट्स'ची मनात सदैव हुरहूर लागून राहील!

कॅरोलीन(, क्ष जॉगर) आणि डॅन
   आणि मनात राहतील ते म्हणजे इथले पक्षी आणि पक्षीनिरीक्षण. स्वत:ची चारचाकी नसेल तर कॅनडात भटकणे जरा जिकरीचे जाते. तरीही  डॅनसारखा सज्जन मित्र बरोबर असेल तर बरीच सोय होते. डॅनबरोबर एडमंटनच्या आजुबाजूला अनेक ठिकाणी भटकलो. 'कॅनडा गीज' पासून 'स्नोवी आऊल' (हिमघुबड)  पर्यंत शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीचे पक्षी पाहिले! डॅनमुळं अनेक व्याख्यानं ऐकायला मिळाली, अनेक लोकांशी ओळखी झाल्या. डॅनचे आभार मानायला माझ्याकडं शब्द नाहीत, तो नसता तर मी फोटोग्राफीचे काय केले असते कोण जाणे!

  कॅनडात बरीच फोटोग्राफी करायला मिळाली. इथला भूभाग अर्थातच खूप वेग‍ळा, बहुदा बर्फात अडकलेला. बराच काळ बर्फाच्छादित राहण्याचे काही फायदेही आहेत. जसं की, छायाचित्रांच्या पार्श्वभूमी‌वरचे लक्ष विचलित करू शकणारे बरेच घटक बर्फात झाकले जातात! पण एक फोटोग्राफर म्हणून 'आयुष्य सार्थकी लागल्याचे' क्षण मिळणे खुप महत्त्वाचे!  आणि असाच एक दुर्मीळ क्षण कॅनडात माझ्या नशिबी आला! व्हॅंकुव्हर शहराला भेट दिली तेव्हा देवमाश्यांच्या (Killer Whale /Orca) स्थलांतराचा काळ होता.  अशी नामी संधी सोडून कसं चालेल? देवमासा बघायचाच हे मी नक्की केले, पण जो भव्य देखावा, जसा टिपायला मिळाला त्याची मात्र कल्पना केली नव्हती.


 सहा हजार किलो वजनाचा, जवळजवळ तिस फूट लांब निव्वळ अजस्त्र असा प्राणी ज्या सुलभतेनं आणि डौलानं पाण्याबाहेर उसळतो त्याला बस तोडच नाही! असलं काहितरी बघायला मिळणं, वरुन त्याचे फोटो काढायला जमणं (आणि कधी नव्हे तो फोकस बरोब्बर बसणं) हे म्हणजे 'अजि म्या ब्रह्म देखिले'! हे असलं काही टिपायला मिळाल्यानं कॅनडातलं आयुष्य सार्थकी लागलं!

    भारतात परतायची कितीही ओढ असली तरी अनेक ‍गोष्टींची हुरहूरही आहे. सदैव हाडांचा ठाव घेणारी थंडी, एखाद्या रात्री दिव्यांच्या पिव‍ळ्या प्रकाशात  ह‍‍ळूवार भिरभिरत जमिनीवर उतरणारं बर्फ, नियमीतपणे गोठणारी आणि फुगणारी नदी, त्याच तालात रंग बदलणारा तिचा किनारा ह्या आणि अश्या कितीतरी गोष्टींचा मनात सतत निवास राहील हेच खरं.  आंद्रेय, डॅन, इव्हान, वाटेवर गवसलेले अनेक अनोळखी चेहरे ह्यांनी आणि अश्या अनेक जणांनी माझा कॅनडातला सह‌वास सुखकर केला, ह्या सर्वांचा मी आभारी आहे. हे, ह्या ब्लॉग वरचं शेवटचं पान, लिहिण्याच्या अनुषंगाने मी सर्व वाचकांचेही आभार मानतो. आपल्या प्रोत्साहनावरच इथ‌वर पोचता आलं. पुन्हा काही खरडायला घेतलं तर इथं अथवा कुठंतरी जाहीर करेनच!

तो पर्यंत, कळावे लोभ असावा!

4 comments:

  1. बाप रे..!! तुझ्या परतण्याची मला पण आता हुरहूर लागून राहणार. मीसुद्धा हे सगळं "संशोधन गीता पुराण" कसं असतं अनुभवलंय. तेव्हा तिथून निघताना होणारी मनाची कालवाकालव मी समजू शकतो...

    पण काही नवीन सुरु होण्यासाठी काही संपाव लागतं कदाचित हाच जीवनाचा नियम असेल...

    तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेछा कायमच आहेत. आज त्या शब्दात पुन्हा व्यक्त करतो..तू कायमच लाडका "Mr. Doc"..sorry..now "Mr. Post-doc" राहणार आहेस.

    :)

    ReplyDelete
  2. भारतात परतताना टोरोंटो मार्गे जाणे जमवता येईल का ? भेट होईल. ब्लॉग वाचनातून झालेली ओळख पक्क्या मैत्रीत बदलेल.
    आपल्या बर्फाळा या कॅनडातील ऋतूची ओळख करून दिल्याने आपल्या लिखाणाचा झालेला एक चाहता.

    ReplyDelete
  3. @रविंद्र. मनापासून धन्यवाद! मलाही भेटायला आवडलंं असतं पण दुर्दैवानं माझं विमान टिकिट वैगरे आधीच बुक करुन झालयं. पुन्हा कधी कॅनडात आलो तर नक्की विरोप टाकेन!

    ReplyDelete