Friday, October 21, 2011

हाऊ आर यु टूडे?

"हेय, हाऊ आर् यु टूडे?"
आमचा सिक्युरिटी ऑफिसर रोज संध्याकाळी ६ वाजता आमच्या इमारतीमधुन चक्कर मारतो. बरोब्बर ६:०५ ला माझ्या lab च्या बाजुला येतो आणि  मला रोज न चुकता हा प्रश्न विचारतो! मीही माझ्या ठरलेल्या साचेबद्ध उत्तरापैकी एखादे त्याला उत्तर देतो :  "आएम गुड",  "नॉट बॅड!" किंवा तत्सदृश काहितरी. परंतु त्याच्या मुळ प्रश्नातच मुळी एक गम्मत आहे. आज कसा आहेस असे विचारायला, रोज माझ्या आयुष्यात खरेच काही वेगळे घडते का?

   सकाळी विशिष्ट वेळेला कंटाळा करत उठतो. अंघोळ-टंघोळ करुन, अत्यंतिक बेचव सिरीअलचा बाउल रिचवत, संगणिकेवर पत्रं आणि हवामान बघतो. आवरुन कामाला. तोच रस्ता, तिच वेळ त्यामुळे माणसंही तिच. चौकातला भिकारी मला रोज तशीच हाक मारतो, मी तसेच दुर्लक्ष करत पुढे!  पुढे जी काही तुरळक लोक समोरुन येत असतात त्यातून एक बुटका म्हातारा माणुस पुढे येतो. निळी टोपी, निळं जाकीट आणि निळी जीन्स ह्यामुळे ते 'निळकट्ट आजोबा' नावाने ओळखले जातात (म्हणजे सध्या तरी मी एकटा त्यांना त्या नावाने ओळखतोय!). चालताना एका पायाने किंचित अधू असल्यासारखे चालतात. पण फुटपाथचा संपूर्ण वापर केला पाहिजे असा त्यांचा नियम असल्याने फुटपाथच्या उजव्या बाजुपासुन डाव्याबाजुपर्यंत सारखे लेन बदलताना दिसतात. निळकट्ट आजोबांना एक सवय आहे. कॅनडात अनेक ठिकाणी फुकट वर्तमानपत्रे मिळतात. ती एका पेटीत रचुन ठेवलेली असतात आणि अश्या अनेक पेट्या गावभर मांडून ठेवलेल्या असतात. तर आमचे हे निळकट्ट आजोबा एखाद्या पेटीच्या ठिकाणी जातात त्यातले एखादे वर्तमानपत्र काढतात, दोन मिनिटं चाळल्यासारखे करतात, परत ठेवून देतात आणि पुढे सरकतात. मी अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या पेट्यांवर त्यांना हे करताना पाहिलंय पण मला आजतागायत ह्याचे प्रयोजन लक्षात नाही आले! (अहो, ते फुकटचं वर्तमानपत्र आहे, घ्या की आणि घरी जाउन निवांत वाचा ना! (ह्या ह्या अश्याच फुकट्या प्रवृत्तीमुळे घरात पेपरांचा ढिग जमलाय, त्याचे काहितरी करा आधी मग द्या सल्ले दुस-यांना!)) ह्या आजोबांचे असे मनोरंजक निरिक्षण चालू असताना बाजुने एक गंभिर चेह-याचा माणुस जातो. ह्या बुवांविषयी मला कमालीचे आकर्षण आहे. त्याच्याकडे बघितल्यावर मला प्रकर्षाने वाटतं की हा कोणी एखाद्या राजघराण्याचा वंशज आहे. छान परिटघडीचे कपडे, तेही शक्यतो पांढ-या किंवा तत्सदृश सौम्य रंगाचे. त्यावर व्हेस्ट, त्या व्हेस्टच्या रंगाला शोभेल अशी प्यांट! व्यवस्थित विंचरुन लावलेले केस अन् त्यावर एखादी, समस्त पोषाखाला साजेश्या रंगाची ह्याट आणि व्हेस्टच्या खिशात जुन्या पद्धतीचे घड्याळ आहे की काय असे भासवणारी एक सोनेरी चेन. पायातले महागडे चकचकीत लेदरचे बूट हेही ह्या सगळ्या राजवैभवाला साजेसे! खांद्यावर नेहमी एखादी ब्याग, कधी शबनम-छाप तर कधी लेदरची. हा सद्गृहस्थ नेहमी नाकासमोर नजर ठेवून झपाझप चालत निघुन जातो. ह्याचा मागोवा घेउन नक्की करतो काय अशी गुप्तहेरगिरी करावी अशी खुमखूमी आवरती घेत मीही पुढे सरकतो.
   पुण्याच्या गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत जसे कसब्याचा गणपती पुढे सरकल्यावर तांबडी जोगेश्वरी येतो, तसा हा निटनेटका राजपुत्र पुढं सरकल्यावर थोड्याच वेळात अजागळ 'जांभळ कपल' येतं! जांभळ्या कपलमधल्या पोरीच्या केसांची पुढची बट जांभळी आहे तर पोराच्या हातावर जांभळ्या रंगाचे ट्याटू गोंदवलेले आहेत! हे जोडफं रॉक संगिताचं भक्त आहे हे मी पैजेवर सांगायला तयार आहे. त्यांचा पोषाखच तसा असतो मुळी. प्रामुख्याने काळ्या रंगाचे ढगळ कपडे, त्यावर स्टीलच्या वस्तुंची एंब्रोयडरी! पैकी पोराच्या कानात काळ्या रंगाच्या तीन चकत्या तर पोरीच्या कानात रिंगाच रिंगा! दोघांच्या केसांची स्टाईल कोणत्याप्रकारची आहे ह्यावर अजुन माझेच एकमत झालेले नाही. पोराचे केस बहुधा बेकहम अधिक गांधिजी भागिले दोन, अश्या स्टाईलचे असावेत! 
  ह्या मंडळींच्या व्यतरिक्त, बसस्टॉपवर केस विंचरत उभी दिसणारी भारतीय वंशाची मुलगी(!), टीम होर्टीनच्या टपरीच्या बाहेर चकाट्या पिटणारी बेघर मंडळी, वृद्धाश्रमाबाहेर व्हिलचेअरवर बसून शून्यात बघणारे आजोबा अशी अनेक मंडळी मला नित्यनेमाने अगदी ठराविक ठिकाणी दर्शन देत राहतात. पण 'चिनी म्हातारा' नेमका कोणत्या वेळेस कुठे दिसेल ह्याचा काही नेम नाही. किंवा तो अगदी नियमितपणे आदल्या दिवशीपेक्षा वेगळ्या ठिकाणी दिसतो हे नक्की. आमच्या विद्यापीठाची पिवळ्या जर्द रंगाची पिशवी एका खांद्यावर लटकवून हे महाराज कोणता तरी रस्ता ओलांडतांना दिसतात. पण रस्त्यावर दिसणा-या इतर मंडळींच्यात आणि चिनी म्हाता-याच्यात एक फरक आहे. चिनी म्हाता-याशी मी बोललोय! एके दिवशी मी जेव्हा डबा आणायचा आळस केला होता तेव्हा विद्यापीठाच्या खानावळीत बर्गर गिळत निमुटपणे बसलो होतो. तेव्हा माझ्या शेजारच्या खुर्चीवरुन आवाज आला,
"एक्सक्युज मी!"
"...?" मी बर्गरसाठी वासलेला 'आ' शेजारी बसलेल्या चिनी म्हाता-याकडं वळवला.
चिमा : तुला काय वाटतं, वय महत्वाचे की पात्रता?
 मला काही झेपलंच नाही! अरे ह्या प्रश्नाला काही प्रस्तावना?   
मी : ..?
चिमा : त्याचं काय आहे, चिन मधे एका नोकरीसाठी मी अर्ज धाडतोय, पण समस्या अशी आहे की नोकरीचे पात्रता वय कमाल ३५ वर्षांचे आहे, आणि मी आहे ५६ चा! पण मी म्हणतो एव्हढ्या 'साध्या' कारणासाठी कोणी माझा अर्ज रद्दबातल कसे काय करु शकेल?...
बर्गरसाठी मघाशी आवासलेला आ अजूनही बंद नाही झाला हे माझ्या लक्षात आले!
चिमा : .. माझा अनुभव त्यांनी लक्षात घेतला पाहिजे ना! मी ३४व्या वर्षी इकडं आलो. आज माझ्याकडं २०+ वर्षांचा अनुभव आहे. तेही महत्वाचे आहे ना?
मी : हो ना! (आता ह्या व्यतरिक्त मी काय म्हणू शकत होतो? पण सिरीअस्ली, ३५ आणि ५६??)
पुढे  दहा मिनीटं त्याचं आत्मचरित्र ऐकत ऐकत बर्गर संपवला आणि शेवटी 'जेवण झालं' हे कारण देत तिथुन अक्षरश: कल्टी मारली! तर असा हा चिनी म्हातारा सतत बिचारा नोकरी शोधत ह्या दुकानातून त्या दुकानात हिंडतोय असे मला उगिचच वाटत राहतं!
   अशा नानाविध माणसांना रोज न चुकता हजेरी देत मी कार्यस्थळी दाखल होतो. आता मी काय काम करतो (किंबहुना करतो की नाही) हा आंतरराष्ट्रीय वादाचा मुद्दा असल्यानं त्याच्या खोलात न गेलेलं (माझ्यादृष्टीनं) बरे! (पण हो, संशोधन क्षेत्रात काम करतो म्हणजे रोज बाथरुममधुन 'युरेका-युरेका' म्हणत बोंबलत उठतो असेही नव्हे.)  अर्थातच संशोधनाच्या पाट्या टाकताना चहापाण्याच्या वेळा अचूक सांभाळल्या जातील ह्याची मात्र मी पुरेपूर काळजी घेतो. अरे हो, चहापाणी म्हटल्यावर आठवले, एकवेळ उपरोल्लेखित सर्व घटनांना अपवाद घडू शकतो, पण एक गोष्ट रोज म्हणजे रोज म्हणजे रोज घडते ती म्हणजे आमच्या स्टिव्हच्या डब्यातल्या 'बिन्स'. स्टिव्ह रोजच्या रोजच्या रोज डब्यात एकाच प्रकारे शिजवलेली एकाच पद्धतीची कडधान्यं आणतो. रोऽऽज! त्याच्याबरोबर डबा खाताना आदल्या दिवशीचीच रेकोर्डींग समोर चालू आहे असं भासतं. खरं म्हणजे त्याचा रोजचा दिवस हा तर माझ्यापेक्षाही चाकोरीबद्ध आहे! तो एकतर खुप शिस्तीचा आणि अर्थातच वस्तू जागच्या जागी ठेवणारा आहे. एकदम मितभाषी आणि जंटलमन प्रकाराच्या स्टिव्हचा दिवस कितीही चाकोरीबद्ध असला तरी त्याचं आयुष्य बाकी एकदमच बंडखोर वाटेचं. प्रस्थापित नातेसंबंधाच्या चौकटीला आणि लग्ननिर्देशांना न जुमानता आज स्टिव्ह त्याच्या फिलीपिनी पार्टनर बरोबर सुखाचा संसार करतोय.
       तसं बघायला गेलं तर निळकट्ट म्हातारा असो, राजपुत्र असो, जांभळ कपल असो, चिमा असो वा स्टिव्ह असो सगळे रोज एकसारखंच आयुष्य जगत असतात. तरी मला रोज त्यांची नोंद घ्यावीशी का वाटते? रोज काहितरी वेगळं घडतय अश्या भावाने मी का निरिक्षणं नोंदवत असतो? की खरेच मंडळी चाकोरीचे आयुष्य काढतात? सगळेच जण फुकटची वर्तमानपत्रे उचलतात मग निळकट्ट म्हातारा का नाही उचलत? आणि राजपुत्र अश्या जुन्या धाटणीच्या अवतारात आधुनिक जगात काय म्हणून वापरतो? जांभळ कपल बटा जांभळ्या करुन फिरताना किंवा कानात चकत्या घालून वावरताना आजुबाजूच्या प्रस्थापित वेषभूषेला काटशहच नाही का देत? चिमाला छपन्नाव्या वर्षी पस्तिशीच्या नोकरीची उमेद कशी काय येते? किंबहुना अश्या नोकरीसाठी प्रयत्न करावा हा विचारच कसा काय येतो? आणि रोज कडधान्याचं अळणी जेवण घेणा-या स्टिव्हला नातेसंबंधात ठसका लावणारा मसाला टाकायची ताकत कुठून येते? वरकरणी चाकोरीबद्ध तरिही चाकोरीच्या बाहेरचं आयुष्य जगणार्या ह्या मंडळींना एकदा थांबवून मला विचारायचंय:
'हाऊ आर यु टूडे?'


Friday, March 4, 2011

'अमानुष' माणूस

  बऱ्याच जणांचा असा (गैर)समज आहे की आमचा इव्हान माणूस आहे! वेल्ल, इव्हान म्हणजे माझ्या बाजुच्या संगणकावर माझ्याप्रमाणे चवऱ्या ढाळणारा कानी कपाळी निटस असलेला, दोन हात दोन पाय एक डोके असा वरकरणी माणसासारखा दिसणारा एक अ-माणूस! तो मूळचा युक्रेनचा पण रशियन वंशाचा आणि आमच्याच लॅब मध्ये पी.एचडी करणारा विद्यार्थी! लोकांना तर तो माणुसच वाटतो, पण मला विचाराल तर तो रशियाच्या कुठल्याशा अतिगुप्त संघटनेनं अतिअतिगुप्त प्रयोगाअंतर्गत बनवलेला, हुबेहूब माणुस दिसणारा एक रोबो आहे! अहो खरेच! (कृपया रजनीकांतशी काहीही संबंध जोडू नये!)

  मी सुरवातीला त्याला भेटलो तेव्हा मी इथे नविन होतो आणि 'कोणी घर देता का घर' असा प्रश्न घेऊन गावभर फिरत होतो. तेव्हा एक घर बघण्यासाठी इव्हान बरोबर जाण्याचा योग आला!
"आपण ४ नंबर बसनं १०:४५ ला निघू, १०:५२ ला रस्ता नं १०७ वर उतरु. तिथुन चालत आपल्याला ९ मिनिटं लागतील  म्हणजे आपण ११:०१ ला घरी पोचू; पण हे बसवाले कधिकधी उशिर करतात त्यामुळे आपण त्या घरमालकाला ११:०३ ची वेळ सांगू!" मी आवाक! काळ सांगायची वेळ जेव्हा येते तेव्हा तासाचे 'साधारण' चार भाग करुन त्यांना सव्वा-साडे-पावणे आणि तास अश्या नावाने संबोधायची मला सवय! तासाचे साठ भाग करुन खरंच ते वापरायचे असतात हे आमच्या गावीही नाही! मला जर कुणी सांगितले की मी तुझ्याकडे ११:०३ ला पोचतो तर ११:०३ घड्याळात कसे दिसतात ह्याचा हिशोब लावेतो तो सद्गृहस्थ दारी अवतरलासुद्धा असता! तर तेव्हा मला पहिली चुणूक आली की हा 'अमानुष' आहे! पुढे बसथांब्यावर तर अजुन कहर. मी नवा होतो तरिही मला बसा कश्या व्यवस्थित माहिती आहेत असा भाव खाण्यासाठी त्याला म्हणालो की "अरे, ही बघ ७ नंबर बस, ही पण जाईल ना तिकडे? हिनेच जावं का?". इव्हान : "नको! त्याला दोन कारणे आहेत. कारण एक: दोन्ही बस एकदमच सुटतात आणि कारण दोन: मला ७ नंबर बस आवडत नाही! २००८ सालच्या डिसेंबरमधे  ह्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लागली होती! आणि तेव्हा काही सुट्टीचा दिवसही नव्हता, बुधवार होता!" मी आवाक! महत्प्रयासाने 'तारिख काय होती रे' हा प्रश्न आवरला!  मी परत हिशोबाला बसलो! समजा पुण्यात एखाद्या पीएमटी च्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लावली असती आणि मी जर बसवर रुसून बसलो असतो तर मी अश्या किती बसांच्या प्रेमाला पारखे झालो असतो?! असो. पण इव्हान रोबो आहे की काय असे मला तेव्हा वाटू लागले.

 हळुहळू माझ्या रोबो-सिद्धांतावर माझी पक्की खातरजमा होऊ लागली. इव्हानचा रोज साधारण एकसारखा पेहराव असतो. एखादा टि-शर्ट आणि घोट्यापर्यंत पोचलेली जीन्स! तापमान १०.३ सेल्सिअसच्या वर असले की जीन्सच्या जागी हाफ चड्डी! तो फार हसत नाही. आमच्या सारखं 'ख्या-ख्या' करत दात काढताना तर मी त्याला कधिच पाहिलं नाहिए!  सकाळी भेटला की माझ्यापासून साडे चार फुट अंतरावरुन 'गुड मॉर्निंग' म्हणताना मानेला वरच्या बाजुला किंचीत झटका देतो आणि ओठ साधारण चार मिलिमीटर फाकवतो! बोलताना, ओठांना लिपस्टिक लावलेलं आहे आणि ते खराब होऊ नये म्हणून ओठांची फार हालचाल होणार नाही, अश्या पद्धतीत बोलतो!  तो फार तोलून-मापून आणि तांत्रिक दृष्ट्या अचूक बोलतो; ते "११:०३" वरुन वाचकांच्या ध्यानी आलेच असेल! बोलताना चेह-यावर हावभाव फारच कमी त्यामुळे तो विनोद सांगतोय का मर्तिकाची बातमी ह्याचा काही सुगावा लागत नाही!

  इव्हानला थंडी आवडते, आणि त्याच्यादृष्टीनं थंडी म्हणजे -२०सेल्सिअस पेक्षा कमी तापमान! जेव्हा तापमान -३ सेल्सिअसला पोहोचले होते तेव्हा मी इमानेइतबारे स्वतःला कपड्यांच्या ढिगामधे गुंडाळून वावरत होतो तेव्हा हा मला म्हणतोय "अरे अजुन तर हिवाळा सुरू व्हायचाय;  तू इतके का गुरफटून बसलायस? तसेही किती ऊबदार आहे आत्ता!" ... ऊबदार? हेल्लो??!!

 इव्हानचे फंडेही भारी! 'फुटबॉल किती बोर खेळ आहे! एक चेंडू इतकी सारी माणसं! मला उलटं आवडतं एक माणूस आणि खूप सारे चेंडू - बिलिअर्ड!!' (स्वाभाविकपणे मी आजपर्यंत ह्याच्या समोर क्रिकेटबद्दल बोललो नाहिए! एक चेंडू तोही अतिसुक्ष्म, इतकी सारी माणसे आणि तब्बल ५ दिवस!!)

 आमच्या ग्रुपच्या सिनियर मंडळींना दर आठवड्याला ग्रुप मधल्या पीएचडीच्या मुलामुलींच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनला बसावे लागते. इव्हान चे प्रेझेन्टेशन असले की आम्ही आधीच थोडी तयारी करून घेतो. चेहऱ्याला पाणी मारणे, त्याने मागच्या वेळी काय सांगितले होते ते आठवणे इत्यादी इत्यादी. इव्हान प्रचंड गंभीर चेहऱ्याने खोलीत प्रवेशतो. तो मुळातच सगळीकडे गंभीर मुद्रेने असतो इथे तर गंभीरतेची अनुज्ञप्ती मिळालेली! हा गडी नमनाला चमचाभारही तेल न वापरता सरळ आलेख वगैरे सादर करायला सुरवात करतो. बाजूच्या पब्लिकला (म्हणजे आम्ही बापुडे) कळतही नाही की नेमके कशाचा आलेख आहे आणि काय वरती चाललंय आणि काय खालती घसरतंय!! तो मोजून ५ स्लाईड्स दाखवतो आणि छापील कागद डोळ्यासमोर असल्याप्रमाणे आजूबाजूच्या य:कश्चित मंडळींकडे साफ दुर्लक्ष करत आपले सादरीकरण आटोपते घेतो. त्याने नोबेल पारितोषिकाच्या लायकीचे जरी संशोधन केले तरी बोलताना त्याचा एकही स्वर ना वर सरकतो ना खाली! सादरीकरण संपता संपता निम्मे इतरेजन डुलक्या काढत असतात उर्वरित  छताकडे बघत असतात किंवा खिडकीच्या बाहेर किंवा आपल्या संगणिकेत नाक खुपसून असतात!

 पण तो रोबो असल्याचा त्याला एक फायदाही आहे, तो सुपर हुशार आहे! त्याला त्याच्या कामाबद्दल विचारलेल्या कोणत्या प्रश्नांचे उत्तर येणार नाही असे घडणे फारच दुरापास्त! त्याच्याशी सापेक्षतावादाच्या सिद्धांतापासून (Theory of Relativity) ते पुंज भौतिकीच्या (Quantum Physics) सिद्धांतांवर चर्चा करणे तुफान मजेदार (आणि  आव्हानात्मक) असते. तो रशियन असल्यानं इतर रशियन माणसांप्रमाणे त्याचेही गणिताचा पाया भलताच बळकट आहे.

आणि इव्हान अरसिक आहे असेही नाही! (प्रोग्रामच तसे केले आहे हो!) तो बऱ्याच वेळा गाणी ऐकताना दिसतो (आता गाणी असतात की हाय-कमांडच्या आज्ञावली ते सांगणे कठीण). पण त्याच्या सगळ्यात आवडता छंद म्हणजे ट्रेकिंग! आम्ही तासनतास ट्रेकिंगच्या गप्पा मारत घालवले आहेत. इव्हान खूप सराईत गिर्यारोहक आहे, तो विविध संसाधने वापरून गिर्यारोहण करण्यात पटाईत आहे. ट्रेकिंग, स्कीईंग अश्याबद्दल तो भरभरून बोलतो. त्याला असे भरून बोलताना पहिले की वाटते की चला कुठेतरी 'माणुसकीचा' अंश आहे!


असा हा इव्हान! पुढं जाऊन मला जेव्हा घर मिळालं तेव्हा त्याने मला विचारले की "कुठे आहे तुझे घर?" मी सांगितले अमुक अमुक रस्ता तमुक तमुक गल्ली!
तो: "मग तुला घरी चालत जायला किती वेळ लागतो?"
मी: "अम्म, साधारण अर्धा तास!"
तो: "अर्धा तास? मला नाही वाटत.. कमी लागत असेल"
मी: "हां, असेलही! २० मिनीटं लागत असतील"
तो: "फक्त २० मिनिटं?"
माझा टोटल वैताग! वाटलं म्हणावं : 'अरे २० मिनीटं आणि ३० मिनीटं ह्याच्या मधली वेळ माझं घड्याळ दाखवत नाही रे बाबा!'. पण मी तसे काही बोललो नाही म्हटलं चला आपणही गम्म्त करावी
मी: "त्याचे काय आहे, मला साधारण २४ मिनीटं लागतात पण मी फारच कमी दिवस झाले चालत येतोय त्यामुळे खात्रीनं सांगायला पुरेसा डेटा नाहिए माझ्याकडं!!!"
तो: "ओह! हं .. बरोबर आहे तुझं"

अरे बरोबर काय आहे??? डोंबल!! मला क्षणभर त्याला गदागदा हलवून जागं करावंस वाटलं, पण मग लक्षात आलं तो माणूस थोडीच आहे झोपायला! :)
 

Wednesday, November 24, 2010

बर्फाळ वहि'वाट'

   फार वेळ वाट पाहू न देता आमच्याकडे बर्फाळा येउन थबकला! मागे म्हटल्याप्रमाणे, आमच्या मते, इकडे कॅनडात दोनच ऋतू: एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी हिवाळ्यात थंडी वाजते तर बर्फाळ्यात सगळ्या संवेदना आजुबाजूच्या बर्फाप्रमाणे गोठून गेलेल्या असतात.

   तर असा बर्फाळा येणार म्हणून आम्हीसुद्धा कसून तयारी केली होती; निदान तसा आमचा समज तरी होता! भले थोरले, woodland चा बाप शोभतील असे, बूट घेउन आलो. ('पादत्राण' शब्दाचा उद्गम बहुधा असलेच काहितरी बघून झाला असणार!) पुण्यात असताना कधी मफ्लर वापरुन माहित नाही, इथे इमानेइतबारे एक मफ्लर घेउन ठेवला. पुण्याहून येताना आणलेली कानटोपी अंमळ तकलादू आहे हे ज्ञान व्हायला फार काळ लागला नाही! चुपचाप एक कानटोपीही घेउन आलो. थोडक्यात काय तर बर्फ पडायला सुरु व्हायच्या आधी आम्ही पुरेसी मानसिक तयारी करुन बसलो होतो.

  आणि बर्फ पडला. आणि सोबत पाराही! -१०, -१५, -२५... बघता बघता -३० सेल्सिअस चा असह्य ॠतू चराचराला गोठवता झाला. हवेत होती नव्हती ती सगळी आर्द्रताही बर्फ बनुन जिथे जागा मिळेल तिथे जाउन बसली. सगळं कसे पांढरं-फटाक! इतक्या थंड हवामानात सगळे कसे निर्जीव होउन जाते. बहुतांश झाडांनी पाने केव्हाच झाडून टाकलीयत, त्यामुळे एखादी वा-याची झुळूक आलीच तर त्या सोबत डोलायला कोणी नाही. बहुतांश पक्षीगणही केव्हाच दक्षिणेच्या ऊबदार हवामानाकडे निघून गेलेत. जे कोणी एखाद-दुसरं आहेत ते चुपचाप काळोख्या ढोल्यांमध्ये लपून बसलेत. त्यामुळे पहाटे पक्षांच्या किलबिलाट किंवा चिवचीवाटासारखे रोमँटीक काहिही घडत नाही!  सगळं कसे एकदम चिडीचूप, निष्प्राण! इतक्या थंडीत सूर्यही उगवायचा कंटाळा करतो आणि उगवल्यावर लगेचच घरी परतायच्या घाईत असल्यासारखा क्षितिजावरच टाईमपास करताना दिसतो. त्यामुळे माफक सूर्यप्रकाशाचा बर्फावर काडीमात्र परिणाम होत नाही.

  पण ह्या सगळ्याचा आमच्या उत्साहावर थोडीच परीणाम होणार? आम्हीही थंडीच्या नाकावर टिच्चून ठरवून टाकले की कामाच्या ठिकाणी रोज पायीच चालत जायचे! (लेखकाने 'ठरवून टाकले' असे म्हटले आहे, 'संकल्प केला' असे म्हटलेले नाही, त्यामुळे संकल्पभंगाचे पाप माथी लागायची शक्यता नाही हे वाचकांच्या लक्षात आलेच असेन!) तशीही आमची खत्रुडातली खत्रूड सायकल चोरीला(!) गेल्यावर आम्ही पायीच चालत होतो त्यामुळे काही वेगळी तयारी करायची गरज नव्हती. आणि अंतर जेमतेम दोन किलोमीटर, ते २०-२५ मिनीटात पार होऊन जाते त्यामुळे थंडीची जाणिव व्हायच्या आत आपण ईप्सित जागी पोहोचलेलोसुद्धा असू असा आम्ही अंदाज बांधला! (वाह रे माझ्या राजा!). त्यानंतर आमची ही रोज बर्फ तुडवत जाण्याची वहिवाट सुरू झाली!

  आधी सांगितल्याप्रमाणे आमची मानसिक तयारी जय्यत आहेच, फक्त निघताना रोज काय ती शारिरीक तयारी करावी लागते इतकेच. (व्यायाम? का उगिच गम्मत करता राव!?) लज्जारक्षणार्थ असलेल्या कपड्यांव्यतरिक्त, थर्मल्स, त्यावर एक साधा टी-शर्ट, त्यावर कामाच्या जागी मिरवायचा शर्ट, त्यावर एक स्वेटर त्यावर एक जाडं भरडं जॅकेट, हातात एक किंवा दोन हातमोजे, डोक्यावर कानटोपी, त्यावर जॅकेटची टोपी, लांबीचे आणि मानेच्या परिघाचे अचुक गणित करुन गुंडाळलेला मफ्लर; जो नाकाच्या शेंड्यावर तोलून धरला जातो, पायात जीन्स,  एक किंवा दोन मोजे आणि त्यावर आमचे धट्टेकट्टे बूट, अशी जय्यत तयारी करुन आम्ही रोज युध्दभूमीकडे प्रयाण करायच्या अविर्भावात घराचे दार ओढून घेतो. आणि इथेच पहिली समस्या न चुकता उभी राहते.

  इतकी सगळी साग्रसंगित तयारी केल्यावर त्या जाड्याभरड्या हातमोज्याने काहि केल्या जीन्सच्या खिशात आतवर गेलेली किल्ली बाहेर काढता येत नाही! आम्ही अजुन घराच्या बाहेर पण इमारतीच्या आतल्या उबदार वातावरणातच असतो आणि त्या ड्यांबिस किल्लीच्या आणि हातमोज्याच्या अहमहिमिकेमध्ये आमचा मफ्लरमध्ये गुंडाळलेला श्वास गुदमरायला लागतो! मग परत मफ्लर बाजुला करुन, हातमोजा काढून, वस्त्रप्रावरणांची आवरणं बाजुला काढत खिशातून किल्ली काढुन मार्गस्थ होईपर्यंत कानटोपीने निषेध दाखल केलेला असतो, मफ्लरने गणित चुकवून ठेवलेले असते आणि ती वस्त्रप्रावरणांची आवरणेही टोचायला लागतील अश्या अवस्थेत चुरगाळून गेलेली असतात! पण चिडचीडिचा परमोच्च बिंदू तेव्हा येतो जेव्हा जिन्याच्या चार पाय-या उतरल्यावर हे लक्षात येते की, पेन, रुमाल, पाकीट, कार्ड किंवा तत्सदृश, हरवायचा अंगिभूत गुण असलेल्या कोण्या वस्तुने, आमच्या नजरेला गुंगारा देउन कालच्या शर्ट/पँटच्या खिशात दडी मारलीय!

 पण 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार असे' अश्या घोषवाक्याने प्रेरित आमच्यासारख्या मावळ्याला असली क्षुद्र संकटं थोडीच थांबवणार आहेत? आम्हीही त्या सर्वांवर मात करत, आमची चिलखतं सावरत मोठ्या उमेदीनं इमारतीच्या बाहेर पडतो! हवेच्या थंडगार झोतासह नवोन्मेषाने संचारत आम्ही यात्रा सुरू करतो. पायाखाली कुरुकूरू वाजणा-या बर्फावर निर्धाराने पावले टाकत, दर चार पावलांमागे सिंहावलोकन करत, बर्फावर उमटलेली स्वतःचीच पावले कौतुकाने न्याहाळत आम्ही बाणेदारपणे मार्गाक्रमण करु लागतो!

 हळुहळू डोळ्यांच्या आजुबाजूला थंड वाटू लागते. मग आम्ही मफ्लर अजुन थोडा वर उचलतो आणि कानटोपी खाली खेचतो; भुवयीच्याही थोडी खालीच! आता आम्हाला डोळ्याच्या वरच्या बाजुला टोपी, खालती मफ्लर आणि आजुबाजुला जॅकेटची टोपी असे चौकटबद्ध जग दिसू लागते. मफ्लर, टोपी सावरण्यासाठी खिशातुन बाहेर काढलेला हात आता गारठतो, मग आम्ही परत खिशात तो खुपसून मार्गस्थ!

 दोन चार गल्ल्या पार केल्या रे केल्या की आमच्या बुटाची नाडी बंड करुन उठते. बुटाची सुटलेली नाडी ही दातात अडकलेल्या बडिशेपेच्या तुकड्यासारखी असते; काही केल्या स्वस्थ बसू देत नाही! आमच्या दृष्टीने बुटाची सुटलेली नाडी म्हणजे धर्मसंकट. आता ती  नाडी बांधायची म्हणजे हात खिशातुन तर काढावेच लागतात पण  हातमोज्यातूनही काढावे लागतात! पण 'तस्माद् अपरिहार्ये अर्थे' असे म्हणत, उणे तिस अंश सेल्सिअसच्या तापमानात बधरटलेल्या बोटांनी नाडी बांधताना आम्ही त्या बुट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करुन मोकळे होतो.

 पदयात्रा सुरू करुन पाच सात मिनिटे होतात न होतात तो आम्हाला जाणिव होउ लागते की मघाशी ते 'नवोन्मेष' का काय संचारलं होते ते आजुबाजूच्या बर्फात गोठून गेलंय! पण तरिही आम्ही नेटाने पावले टाकत मोठ्या चौकाच्या सिग्नलपाशी येउन थडकतो. चौक ओलांडण्यासाठी सिग्नल मिळेपर्यंत आजुबाजूच्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेउ लागतो. कॅनडात रस्त्यावरचे बर्फ घसरडे होउ नये म्हणुन त्यावर बारीक वाळू पसरवतात. त्यामुळे येणा-या जाणा-या वाहतुकीच्या पायदळी तुडवून बर्फाचा चिखल तयार होतो. पण बर्फही निगरगट्ट; इतक्या कारा, बसा, ट्रके अंगावरुन जाउनसुद्धा वितळायचे नाव घेत नाही. माती, वाळू आणि बर्फ ह्यांचा भुसभूशित चिखल रस्त्याच्या आजुबाजूला छोटीशी भिंत तयार करतो. हे सगळे निरिक्षण चालू असताना, आमचे गारठलेले हात काही केल्या टाळ्यावर यायचे नाव घेत नसतात. आम्ही दुर्लक्ष करत मार्गस्थ!

 आता एक विचित्र समस्या समोर येते. आमचा मफ्लरमधून बाहेर पडणार उच्छवास आमच्या डोळ्यांकडे सरकतोय हे आम्हाला माहितीच असते. पण आता हळुहळू तो पापण्यावर पाणी आणि बर्फाची एक झालर बनवायला लागतो! आमची परत चिडचीड, आता पापण्या साफ करणे म्हणजे खिशात गरम होऊ पाहणारा हात परत बाहेर! पण पर्याय तरी काय म्हणा! खरेतर आता आम्हाला हेही कळून चुकते की मफ्लरच्या बाहेर सर्वत्रच बारीक बर्फ जमलाय! आम्ही चुपचाप मफ्लर न हलेल ह्याची काळजी घेत परत गारठलेला हात खिशात कोंबून वाट चालू लागतो.

  नाकाला खाज सुटणे, कानात गुदगूल्या होणे, डोळ्यात काहितरी गेल्यासारखे वाटणे किंवा गारठलेले हात अस्वस्थ करणे अश्या असंख्य छोट्यामोठ्या समस्या आमच्या प्रवासात विघ्न आणू पाहातात पण आम्ही निर्धाराने दुर्लक्ष करत पुढे सरकतो! आमची एक वाईट खोड आहे, (तश्या अनेक आहेत,पण सध्यापुरती एकच.) रस्त्यावरुन चालता चालता बाजुला साठलेल्या भुसभूशीत बर्फाला लाथ तरी मारायची किंवा त्यात पाय किती खोल बुडतो हे तपासण्यासाठी त्यात पाय रोवायचा! वाटताना गम्मत वाटते, पण आख्खा बूट वरुन-खालून बर्फाने माखून जातो! मग काय हळुहळू बूटातून थंडी आमच्या पायांपर्यंत पोहोचतेच! आम्ही परत बूट कंपनीच्या मालकांच्या खानदानाचा उद्धार करतो! एव्हाना आम्ही अर्ध्याच्या वर अंतर आलेलो असतो पण आता पाउले थंड पडू लागलीयत अशी भावना जोर धरू लागते. आमचे हात आधिच थंडीला वैतागलेत आता पायही त्यात सामिल. हातापायांतून आत एक थंडीची लकेर नाचून जाते आणि -३०ची थंडी हाडांपर्यंत पोचते! (तसे आमच्या हाडांपर्यंत पोहोचायला थंडीला विशेष श्रम पडत नसावेत)

  गारठलेले हात-पाय, मफ्लरभोवती साठलेल्या बर्फाने गारठलेला चेहरा, नाकाला सुटलेली खाज, कानाला सुटलेल्या गुदगुल्या, पापण्यावर साचलेला बर्फ ह्यामुळे आमची चिडचीड पराकोटीला पोचते. कधी एकदा एखाद्या इमारतीत शिरतो असे होउन जाते. अजुन पाच एक मिनिटांचे चालणे बाकी असेल आणि थंडीने नाकी नउ आणलेले असतात. इतक्यात समोरून परीशुद्ध कॅनडीयन माणूस जातो. ना हातात मोजे, ना मानेवर मफ्लर, ना डोईवर कानटोपी! थंडीवरच उपकार करतोय अश्या अविर्भावात लटकवलेले जॅकेट! जाताना तो मंदस्मित करतो; आम्हाला वाटते की जणू वाकुल्या दाखवत म्हणतोय
"हे हे हे! ये तो बस शुरवात हैं| आगे आगे देखो होता हैं क्या!!"

 

Wednesday, November 17, 2010

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन

केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.

आम्ही कोण?
'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?

ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!

रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा

आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?

           - भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)



मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'.

Tuesday, October 26, 2010

पैलतीरी काफ्का!

  "मित्रा, काय कानफाटात दिल्यासारखं गायलायस!!" अशी अवधूत गुप्तेंची प्रतिक्रिया बहुधा आपण ऐकलीच असेल. काही कलाकार आपल्या कलाकृतीद्वारे आपल्याला असे काही स्तंभित करुन टाकतात की जणु कानफाटात बसल्यासारखे वाटते! आणि जेव्हा जपानी लेखक, "हारुकी मुराकामी" कानफाटात देतात तेव्हा पाचही बोटे व्यवस्थित गालावर उमटतील ह्याची ते खात्री घेतात!

मागे एकदा, आमचे मित्र राज ह्यांनी मुराकामींच्या "Kafka on the shore"  नामक पुस्तकाबद्दल लिहिले होते. त्यानंतरही त्यांच्या वेगवेगळ्या टिका-टिप्पणीतुन मुराकामींचे नाव सतत कानावर येते होते. राज हे चांगले व्यासंगी मित्र, म्हणुन म्हटले जरा बघावे कोण आहेत हे मुराकामी आणि त्यायोगे Kafka on the shore हे पुस्तक वाचायला घेतले!


Kafka on the shore चे पहिलेच (खरे म्हणजे शून्यावे) प्रकरण "कावळा नावाचा मुलगा" असे असल्याने, लगेचच ध्यानात येते की हे जरा वाचायला जड जाणारे पुस्तक आहे! आणि शेवटच्या पानापर्यंत मुराकामी तशी पुरेपूर खात्रीही घेतात. तसे बघायला गेले तर हे पुस्तक एका पंधरावर्षीय मुलाचे आहे. जो आपल्या बापाला वैतागून आईचा शोध घ्यायला घराबाहेर पडतो. त्याला येणारे गोचर आणि अगोचर अनुभवांच्या झालरीतून तयार झालेले कथानक म्हणजे Kafka on the shore! पण अर्थात ही फक्त ह्या पंधरा वर्षीय मुलाचीच कथा आहे असे म्हणणेही जरा चुकीचे आहे. खरेतर मुलगा फक्त इतर पात्रांना आणि घटनांना जोडणार दुवा आहे.

 पुस्तकाच्या सुरवातीच्या प्रकरणांमधुन अनेक, वरकरणी असंबद्ध अशी, कथानकं जन्माला येतात. वाचकालाही माहित असते की काहितरी करुन हे सगळे घागे एकत्र जोडले जाणार, पण कसे जोडले जाणार ह्याचे गुढ जपण्यात मुराकामी कमालीचे यशस्वी होतात. प्रत्येक प्रकरणांनिशी गहन आणि गुढ होत जाणारे कथानक अश्या धक्कादायक वळणांमधुन जाते की, 'पुढे काय होणार?' हा जीवघेणा प्रश्न पुस्तक हातातून ढळू देत नाही!

पण Kafka on the shore ची फक्त कथाच सुरस आहे असे नाही. किंबहुना "काफ्का..." ची खरी ताकद त्यातल्या तत्त्वज्ञानात आहे! प्रत्येक प्रकरणातुन, प्रत्येक पात्राकडून मुराकामी खुप सारे प्रश्न, अनेक कोडी निर्माण करतात आणि वाचकाला गहन विचारात बुडवतात.  काहींची उत्तरे पुस्तकात मिळतात , तर काही मिळतात की नाही हे सांगणे जरा अवघडच आहे! कथेत खुप सा-या रुपकांची रेलचेल आहे. कोणी मांजरांशी गप्पा मारणारा म्हातारा असो किंवा कोणी कर्नलचे रुप धारण केलेला "एब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट" असो, कधी आकाशातुन पडणा-या जळवा असो किंवा मांजरांच्या आत्म्यांंपासुन बनवलेली बासरी असो! एक ना दोन अश्या अनेक रुपकांतून वाचकाच्या डोक्यात सतत प्रश्नांचे काहुर माजुन जाते!

 Kafka on the shore च्या कथेतुन डोकावणारी पात्रंसुद्धा निराळीच. जवळजवळ सगळीच पात्रं समाजातल्या मुख्य प्रवाहापासुन बाजुला पडलेली. अर्थात, प्रस्थापित नातेसंबधांच्या चौकटीला छेद देणारं किंवा व्यवहारी मनाला अगोचर वाटणा-या घटनांची मंदियाळी असलेल्या कथानकाची पात्रंही सर्वसामान्य असुन कसे चालेन?!

ह्या पुस्तकाचे कथानक, त्यातली पात्रं, घडणा-या घटना सगळंच क्लिष्ट आणि प्रचंड प्रमाणात धक्कादायकही आहेत. खुद्द  मुराकामींच्याच मते हे पुस्तक एकदा वाचुन समजणे जरा अवघड आहे! मुराकामी हे मराठीतल्या जीए किंवा ग्रेस ह्यांच्या जातकुळाचे. त्यामुळे जर तुम्ही जीए/ग्रेसांचे पंखे असाल किंवा काहीतरी बौद्धीक खुराकाच्या शोधार्थ असाल तर पैलतीरीचा काफ्का तुमची वाट बघतोय!! 

You sit at the edge of the world,
I am in a crater that's no more.
Words without letters
Standing in the shadow of the door.

The moon shines down on a sleeping lizard,
Little fish rain from the sky.
Outside the window there are soldiers,
steeling themselves to die.

(Refrain)

Kafka sits in a chair by the shore,
Thinking for the pendulum that moves the world, it seems.
When your heart is closed,
The shadow of the unmoving Sphinx,
Becomes a knife that pierces your dreams.

The drowning girl's fingers
Search for the entrance stone, and more.
Lifting the hem of her azure dress,
She gazes --
at Kafka on the shore"
— Haruki Murakami (Kafka on the Shore)

Sunday, September 26, 2010

फॉल पडला!



   पाश्चिमात्य देशात वर्षाची साधारणपणे चार ऋतुंमध्ये विभागणी केलेली असते: वसंत (स्प्रिंग), उन्हाळा (समर), शरद (फॉल/ऑटम) आणि हिवाळा (विंटर). पण कोणी काही म्हणू द्या कॅनडामध्ये  केवळ दोनच ऋतू आहेत असा आमचा दृढ समज आहे. एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी बर्फाळा हा वर्षातले ६ महिने (ऑक्टोबर ते मार्च) असतो आणि मी ज्याला हिवाळा म्हणतो त्या ऋतूत इथल्या लोकांनी बाकीचे ऋतू कोंबुन ठेवलेले आहेत. परन्तु एका भारतीयानं २५ अंश सेल्सिअस प्रसन्न तापमानाला उन्हाळा म्हणणं म्हणजे त्याच्या भारतीयत्वाशी प्रतारणाच की! पण कितीही संक्षिप्त तरी सर्व ऋतू आपापली पदाचिन्हे सोडून जातातच हे नक्की.

    पैकी वसंत आणि शरद हे रंगेबिरंगी ऋतू आहेत.  वसंतात झाडांवर विविध रगांची फुले उमलतात तर शरदात झाडांची पाने आपला रंग बदलतात आणि अख्खा भूमि लाल-हिरव्या-सोनेरी रंगाचे भरजरी वस्त्र ल्यालासारखी दिसते.  असा हा रंगेबिरंगी फॉल सध्या आमच्याकडे पडलाय. (म्हणजे ऊन पडणे, थंडी पडणे, पाऊस पडणे अश्या अर्थानं!). मी ज्या ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला जातो ती जागा एकदम भन्नाट आहे. शहरापासुन दूर, नदीकिनारी थोड्याश्या उंचीवर वसलेल्या ह्या जागेवरुन खुप दूरवरचा परिसर पहायला मिळतो. त्यातून ही "नॉर्थ-सास्कॅचवन" नदी एक विलोभनीय वळण घेत 'चंद्रभागा' होते! वळणदार नदी, बाजुला गर्द झाडी, समोर मैलोन्-मैल सपाट प्रदेश आणि क्षितिजावर एडमंटन शहराच्या गगनचुंबी इमारती ह्या सगळ्यामुळे लँडस्केप (छाया)चित्रकारीतेसाठी ही एक आदर्श जागा बनुन जाते! त्यातून शरदाची रंगपंचमी चालू असेल तर काय विचारा!

वळणदार नदी आणि आजुबाजुला 'पडलेला' फॉल!

 ह्या झाडांची पण गम्मत असते. काही झाडांची पाने पिवळी होतात तर काहींची लाल. काही पांढरी पडतात तर काही रंग बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत! परीणामतः विविधरंगी झुबक्यांनी सगळ परिसर नटुन जातो.

कधिकधी वाटुन जातो अरे हे सगळं कशासाठी चाललंय? (ईश्वरानं समस्त सृष्टी मनुष्याच्या उपभोगासाठी आणि मनोरंजनासाठी बनविलेली आहे, अश्या 'इंटेलिजेंट डिझाईन'च्या मतप्रवाहाशी मी आजिबात सहमत नाही!) ह्या सगळ्यामागचं विज्ञानही फार भन्नाट आहे.


सगळ्याची सुरवात होते, ते पानांमधल्या क्लोरोफीलपासून! झाडं सतत क्लोरोफील तयार करत असतात, जे पानांमध्ये साचले जाते. क्लोरोफील सूर्यप्रकाशाचे रुपांतर झाडांना आवश्यक त्या उर्जेमध्ये करते (प्रकाश संश्लेषण). ह्या क्लोरोफीलमुळेच पानांना हिरवा रंग येतो. जसाजसा हिवाळा जवळ येउ लागतो तशीतशी सूर्यप्रकाशाची तिव्रता आणि काळ कमी होऊ लागतो. मग झाडांची उर्जेचे रुपांतर करण्याची प्रक्रियाही मंदावते. पण पानांमधुन बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतुन खुप सा-या पाण्याचा अपव्यय होउ लागतो! मग अश्यावेळी काही झाडं, ज्यांना पानगळी/पानझडीची झाडे म्हणतात, ती सरळपणे आपली पानेच झडून टाकायची प्रक्रीया सुरू करतात! त्याच्याच एक भाग म्हणुन ही झाडं क्लोरोफील बनवणे थांबवतात. जसेजसे पानांमधिल क्लोरोफील संपू लागते तसे तसे त्यातील इतर घटक (पिगमेंट्स) दृष्टीस पडू लागतात, मग ज्या पानांत जे घटक आहेत त्या नुसार त्यांना पिवळा, लाल, राखाडी असे विविध रंग प्राप्त होतात! बाकी काही झाडे (सूचीपर्णी) असे रंग बदलण्याच्या कटकटी करण्यापेक्षा जरा जाडसर पाने निर्माण करतात आणि बाष्पीभवनापासून स्वतःला वाचवतात. ती सदैव हिरवीच राहतात.


पण ह्या रंगबिरंगी ऋतूलासुद्धा जराशी उदासिनतेची झालर आहे. क्षितिजाच्या पार आता हाडं गोठवणारी थंडी वाट बघत आहे, आता सृष्टी उजळून टाकणारा सूर्यप्रकाश आता अभावानेच येणार, आता पक्षी दूरदेशी निघुन जाणार अश्या विचारांनी कविमनं हळवी होतात. आटणारा सूर्यप्रकाश मन खच्ची करुन जातो. (हो, तुम्हाला माहितीय का की, सूर्यप्रकाश सर्वात प्रभावी 'अँटी-डीप्रेसंट' मानला जातो!) त्यामुळे अश्या ऋतूंमध्ये कविलोकांनी विरहाची भाषा केली नाही तर नवलच.


Who now has no house, will not build one (anymore).
Who now is alone, will remain so for long,
Will wake, and read, and write long letters 
And back and forth on the boulevards 
Will restlessly wander, while the leaves blow 
            - Herbsttag (Autumn Day)  by Rainer Maria Rilke. (विकीवरुन साभार)

सूर्यप्रकाशात उजळून गेलेल्या इमारती अन् आभाळात साचलेलं मळभ!

Monday, September 6, 2010

पास्ता!

  आज मी चक्क एका पाककृतीबद्दल लिहिणार आहे! एकटं राहिलं की, स्वतःच स्वयंपाक बनवून खावं लागतं त्यामुळे स्वाभाविकच स्वयंपाकघरात जाणं होतं! पण समस्या अशी आहे की, संतमंडळींन्नी म्हटल्याप्रमाणे "आळस हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे" (आणि "गरज ही शोधाची जननी असेल, तर आळस हा त्याच्या बाप आहे!"), त्यामुळे कधितरी, नेहमी, वारंवार, रोजच्या रोज तुम्हाला स्वयंपाकाचा आळस येणे हे स्वाभाविकच आहे!  त्यातुन बहुतांश भारतीय पदार्थ हे 'साग्र-संगित' प्रजातीत मोडतात आणि भारतीय जेवण बनवणं हे कमालीचं जिकरीचं बनुन जातं. मग एका बाजुला आळस आणि एका बाजुला भुक, अश्या दारूण प्रसंगी युरोपातले पदार्थ मदतीला धावून येतात! ईटालीचा पास्ता हा त्यापैकीच एक!
पास्त्याचे प्रकार! (विकीपिडीया वरुन साभार.)

  पास्ता हा ईटालियन जेवणाचा अनिवार्य भाग आहे. पण पास्ता हे कोणत्या एका पदार्थाला उद्देशुन नाव नाही. पास्त्याचे अक्षरशः हजारो प्रकार आहेत आणि ते अस्मितेसमान ईटालियन मातीत जपले जातात! साधारणपणे कणिक किंवा मैदा तिंबुन जे काही बनवता येईल त्याला ढोबळमानाने पास्ता नाव देतात. मग त्या कणकेपासुन जर शेवया बनवल्या तर त्यांना "स्फगेटी" म्हणायचं, नळ्या बनवल्या तर "मॅकरोनी" म्हणायचं, मोठे चौकोन लाटले तर "लझानिया" म्हणायचं आणि स्प्रिंगा बनवल्या तर "फ्युसिली" म्हणायचं. अर्थात त्यांचे आकार-लांबी-रुंदी ह्या वरुन पुढे त्यांची हजारो नावे तयार होतात.

  पास्त्याच्या अनेक सोप्या पाककृती आहेत पण मी जी पाककृती सांगणार आहे, ती झटपट होणारी नाही पण कमी परिश्रमाची आहे (आळस!). तर पास्ता बनवण्याची सुरवात होते, पास्ता खरेदी करण्यापासुन. बाजारात जाउन तुम्हाला आवडेल त्या आकाराचा पास्त आणावा (मी बहुदा स्प्रिंग किंवा शिंपल्याचा आकाराचा पास्ता आणतो). ह्या व्यतरिक्त तुम्हाला काही खास ईटालियन पदार्थ पण लागतात: थोडे ऑलिव्ह तेल, पार्सेली, टोमॅटोची पेस्ट, चीज (ह्या पदार्थांना शेंगदाणातेल, कोथिंबीर, केचअप आणि पनीर हे पर्याय होउ शकत नाहीत हे वाचकांनी ध्यानात घ्यावे!), कांदा आणि लसुण. हे पदार्थ तसे मॉल्समध्ये सहज सापडतात!

 प्रथम एक मोठा बाउलभर पास्ता शिजवात ठेवावा (मला वस्तूंची मापं ग्रॅम-मिलीमध्ये सांगणं जरा विचित्र वाटतं). त्यासाठी पास्ताचं पाकीट पहावं. प्रत्येक पास्त्याची शिजवण्याची वेळ ठरलेली असते आणि ती त्या पाकिटावर नोंदवलेली असते. उकळत्या पाण्यात साधारण १०-१५ मिनिट पास्ता शिजत ठेवावा लागतो. कमी वेळ शिजला तर पास्ता चांगला लागत नाही आणि जास्त वेळ शिजला तर लगदा होतो. पास्ता शिजत असताना बाजुला थोडी पार्सेली, १ कांदा आणि २/३ लसुण एकदम बारीक चिरुन ठेवावेत. पास्ता शिजुन झाला की, ऑलिव्ह ऑईल तापवत ठेवावे. ऑलिव्ह ऑईल  तापल्यावर (किंवा बराच वेळ झालात असे वाटल्यावर) त्यात पार्सेली परतुन घ्यावी, मग लसुण परतावा मग कांदा परतावा. कांद्याने रंग बदलला की परतुन परतुन कंटाळा आला की त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी. टोमॅटो पेस्ट जरा सढळ हातानेच घालावी लागते. साधारण एक मोठी वाटी. २-३ मिनिटं परतावे!  (ही परतण्याची प्रक्रिया चालू असताना शेफाने/शेफीने स्वतःच्या भारतीय प्रकृतीला काबूत ठेवावे. ह्या सर्व प्रकारात, जिरे, मोहरी, मेथ्या, कसुरी मेथी, उडीद डाळ, हळद, गोडा, गरम किंवा गार मसाला, तिखट ई. ई. काहीही घालण्यापासुन स्वतःला परावृत्त करावे आणि पास्त्याचे ईटालियनत्व अबाधित ठेवावे). आता ह्या मिश्रणात शिजवलेला पास्ता (पाणी काढून) टाकून नीट ठवळावा, त्यात चवीनुसार मीठ टाकून थोड्यावेळ झाकून ठेवावं. मग त्यावर थोडे (खरे सांगायचे तर भरपुर) चिज टाकून तापू द्यावे, चिज वितळून सर्वत्र पसरल्यावर गॅस बंद करावा! झाला पास्ता तयार!

 पास्त्याला चव ऑलिव्ह ऑईल मध्ये तळलेल्या पार्सेली-कांद्या-लसणामुळे येते आणि अर्थातच चिज तर महत्त्वाचे! वाचकाच्या ध्यानात आलेच असेल की, ह्यात तिखटजन्य पदार्थांची उणिव आहे. जर तुम्हाला जर थोडा मसाला हवाच असेल तर बाजारात जरा तिखटाकडे झुकणारे "ईटालियन-ड्रेसिंग" मिळते त्याचा वापर करु शकता. (अर्थात भारतीय मसाले वापरुन केलेला "पंजाबी-पास्ता" अनेक हॉटेलांत मिळतोच की!)

आणि हो, एक सांगायचे राहिलेच! इतके सगळे झाल्यावर शेफाला/शेफीला आपला पास्ता आवडेलच ह्याची कोणतीही शाश्वती लेखक देउ शकत नाही. वाचकांनी विवेक जागृत ठेवावा. :)