पाश्चिमात्य देशात वर्षाची साधारणपणे चार ऋतुंमध्ये विभागणी केलेली असते: वसंत (स्प्रिंग), उन्हाळा (समर), शरद (फॉल/ऑटम) आणि हिवाळा (विंटर). पण कोणी काही म्हणू द्या कॅनडामध्ये केवळ दोनच ऋतू आहेत असा आमचा दृढ समज आहे. एक हिवाळा आणि दुसरा बर्फाळा! पैकी बर्फाळा हा वर्षातले ६ महिने (ऑक्टोबर ते मार्च) असतो आणि मी ज्याला हिवाळा म्हणतो त्या ऋतूत इथल्या लोकांनी बाकीचे ऋतू कोंबुन ठेवलेले आहेत. परन्तु एका भारतीयानं २५ अंश सेल्सिअस प्रसन्न तापमानाला उन्हाळा म्हणणं म्हणजे त्याच्या भारतीयत्वाशी प्रतारणाच की! पण कितीही संक्षिप्त तरी सर्व ऋतू आपापली पदाचिन्हे सोडून जातातच हे नक्की.
पैकी वसंत आणि शरद हे रंगेबिरंगी ऋतू आहेत. वसंतात झाडांवर विविध रगांची फुले उमलतात तर शरदात झाडांची पाने आपला रंग बदलतात आणि अख्खा भूमि लाल-हिरव्या-सोनेरी रंगाचे भरजरी वस्त्र ल्यालासारखी दिसते. असा हा रंगेबिरंगी फॉल सध्या आमच्याकडे पडलाय. (म्हणजे ऊन पडणे, थंडी पडणे, पाऊस पडणे अश्या अर्थानं!). मी ज्या ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला जातो ती जागा एकदम भन्नाट आहे. शहरापासुन दूर, नदीकिनारी थोड्याश्या उंचीवर वसलेल्या ह्या जागेवरुन खुप दूरवरचा परिसर पहायला मिळतो. त्यातून ही "नॉर्थ-सास्कॅचवन" नदी एक विलोभनीय वळण घेत 'चंद्रभागा' होते! वळणदार नदी, बाजुला गर्द झाडी, समोर मैलोन्-मैल सपाट प्रदेश आणि क्षितिजावर एडमंटन शहराच्या गगनचुंबी इमारती ह्या सगळ्यामुळे लँडस्केप (छाया)चित्रकारीतेसाठी ही एक आदर्श जागा बनुन जाते! त्यातून शरदाची रंगपंचमी चालू असेल तर काय विचारा!
वळणदार नदी आणि आजुबाजुला 'पडलेला' फॉल! |
ह्या झाडांची पण गम्मत असते. काही झाडांची पाने पिवळी होतात तर काहींची लाल. काही पांढरी पडतात तर काही रंग बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत! परीणामतः विविधरंगी झुबक्यांनी सगळ परिसर नटुन जातो.
कधिकधी वाटुन जातो अरे हे सगळं कशासाठी चाललंय? (ईश्वरानं समस्त सृष्टी मनुष्याच्या उपभोगासाठी आणि मनोरंजनासाठी बनविलेली आहे, अश्या 'इंटेलिजेंट डिझाईन'च्या मतप्रवाहाशी मी आजिबात सहमत नाही!) ह्या सगळ्यामागचं विज्ञानही फार भन्नाट आहे.
सगळ्याची सुरवात होते, ते पानांमधल्या क्लोरोफीलपासून! झाडं सतत क्लोरोफील तयार करत असतात, जे पानांमध्ये साचले जाते. क्लोरोफील सूर्यप्रकाशाचे रुपांतर झाडांना आवश्यक त्या उर्जेमध्ये करते (प्रकाश संश्लेषण). ह्या क्लोरोफीलमुळेच पानांना हिरवा रंग येतो. जसाजसा हिवाळा जवळ येउ लागतो तशीतशी सूर्यप्रकाशाची तिव्रता आणि काळ कमी होऊ लागतो. मग झाडांची उर्जेचे रुपांतर करण्याची प्रक्रियाही मंदावते. पण पानांमधुन बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतुन खुप सा-या पाण्याचा अपव्यय होउ लागतो! मग अश्यावेळी काही झाडं, ज्यांना पानगळी/पानझडीची झाडे म्हणतात, ती सरळपणे आपली पानेच झडून टाकायची प्रक्रीया सुरू करतात! त्याच्याच एक भाग म्हणुन ही झाडं क्लोरोफील बनवणे थांबवतात. जसेजसे पानांमधिल क्लोरोफील संपू लागते तसे तसे त्यातील इतर घटक (पिगमेंट्स) दृष्टीस पडू लागतात, मग ज्या पानांत जे घटक आहेत त्या नुसार त्यांना पिवळा, लाल, राखाडी असे विविध रंग प्राप्त होतात! बाकी काही झाडे (सूचीपर्णी) असे रंग बदलण्याच्या कटकटी करण्यापेक्षा जरा जाडसर पाने निर्माण करतात आणि बाष्पीभवनापासून स्वतःला वाचवतात. ती सदैव हिरवीच राहतात.
पण ह्या रंगबिरंगी ऋतूलासुद्धा जराशी उदासिनतेची झालर आहे. क्षितिजाच्या पार आता हाडं गोठवणारी थंडी वाट बघत आहे, आता सृष्टी उजळून टाकणारा सूर्यप्रकाश आता अभावानेच येणार, आता पक्षी दूरदेशी निघुन जाणार अश्या विचारांनी कविमनं हळवी होतात. आटणारा सूर्यप्रकाश मन खच्ची करुन जातो. (हो, तुम्हाला माहितीय का की, सूर्यप्रकाश सर्वात प्रभावी 'अँटी-डीप्रेसंट' मानला जातो!) त्यामुळे अश्या ऋतूंमध्ये कविलोकांनी विरहाची भाषा केली नाही तर नवलच.
Who now has no house, will not build one (anymore).
Who now is alone, will remain so for long,
Will wake, and read, and write long letters
And back and forth on the boulevards
Will restlessly wander, while the leaves blow
- Herbsttag (Autumn Day) by Rainer Maria Rilke. (विकीवरुन साभार)
सूर्यप्रकाशात उजळून गेलेल्या इमारती अन् आभाळात साचलेलं मळभ! |