Monday, August 16, 2010

इट्स रेनिंग इन बार्सेलोना


(टीप: सदरहू लेखात "इट्स रेनिंग इन बार्सेलोना" ह्या नाटकाची माहिती देताना शेवटही उद्धॄत केला जाणार आहे ह्याची वाचकांनी दखल घ्यावी)

  "लाली" - बार्सेलोनातल्या पडक्या चाळीत राहणारी एक वेश्या, जिला अभिरुचीप्रधान गि-हाईकं आवडतात, त्यासाठी ती संग्रहालये, विद्यापीठ अश्या ठिकाणी भेटी देते; "कार्लोस" - लालीचा दलाल आणि प्रियकर, तिच्याबरोबर राहतो पण ती सोडून जाईल ह्या भयगंडानं सदैव पछाडलेला; डेव्हिड - लालीचा जुना गि-हाईक, रोज आपल्या आजारी बायकोच्या मरणाची वाट पहाणारा. तिघांच्या नात्यात किती गुंतागुंत.

   डेव्हिडचे पुस्तकांचे दुकान आहे. त्याचा साहित्याचा अभ्यासही बरा आहे. तो नेहमी लालीसाठी एखादी कविता वाचून दाखवतो किंवा कुठल्याश्या पुस्तकातल्या चार ओळी. त्याला फक्त शांतपणे बसून तिला पहायचे असते. कार्लोसला साहित्य, संग्रहालयं, शाळा असल्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. नाही म्हणायला तो लालीसाठी चॉकलेटच्या वेष्टनावर छापलेल्या चारोळ्या वाचून दाखवत असतो पण त्यापेक्षा त्याचा साहित्याशी अधिक संबंध नाही! आणि खरेतरं लालीलाही "डांटे" सोडून दुसरा कोणताच कवि/लेखक माहिती नाही! पण तिला शिकावंसं सारखं वाटतं, कविता ऐकाव्याश्या वाटतात, म्हणुन डेव्हिड तिचा 'फेव्हरेट-क्लाएंट' आहे. कार्लोसला स्वाभाविकच डेव्हिडबद्दल आकस आहे. आणि खिडकीबाहेर घिरट्या घालणा-या 'सि-गल' पक्षाला बहुधा तिघांची गम्मत वाटते!

  आजही डेव्हिड आला. नेहमीप्रमाणे, ठरलेल्या वेळेच्या आधीच. कार्लोसला घाईघाईत बाहेर पडावं लागलं. डेव्हिडला आता खात्री झाली आहे की, येत्या काही दिवसात त्याची बायको मरणार. आज डेव्हिड लालीला समुद्राबद्दल सांगतोय. तिला सांगतोय की, "कधीतरी त्या अथांग समुद्राकडे डोळे भरुन पहा, कधी उर भरुन त्याची जड हवा श्वासात सामवून पहा. बघ तो समुद्र तुला काय सांगतोय ते. बघ त्याच्या यांत्रिक लाटा ह्रदय कसे हेलावून देतील. त्याच समुद्राचा यांत्रिकपणा तुला प्रेम म्हणजे काय ते समाजावेल. लाली, कधीतरी ह्या चाळीच्या भिंतींबाहेरचे जग उघड्या डोळ्यांनी पहा, मोकळ्या मनाने पहा, जगात बरेच काही सुंदर आहे! ... लाली ऐक माझे, सोड हा धंदा, दुसरे काहीतरी कर", लालीही हसत म्हणतेय "बरं, मी सोडेनही, मग तु काय करशीन?".. "हा हा, अर्थात तु माझ्यसाठी अपवाद ठेवशीलच की!" ... 

   पण लालीच्या डोक्यात ही गोष्ट खरचं पिंगा घालू लागलीय की खरंच आपल्याला हा धंदा सोडून दुसरे काही करता येईल का! कार्लोस मात्र नुसत्या अश्या विचारानेही कावून उठतो : "काय? हा धंदा सोडायचा?! मग दुसरे काय करणार तु? आणि मी काय करायचे? ...  आणि बाहेर महिन्यात कमावणार नाहीस इतके इथे दिवसात कमावतेस!" लालीकडेही ह्याची काहिच उत्तरे नाहीत.. बाहेरच्या सि-गल कडे पहात अश्रू ढाळण्याव्यतरिक्त ती तरी काय करू शकते.

  आजही डेव्हिड आला. आज बाकी त्याने कोणतीच कविता आणलेली नाही. आज त्याला तिला काहितरी विचारयचेय. बराच वेळ शांततेत गेल्यावर तो धीर करुन विचारतोच.
"डॉक्टर म्हणतायत की, बायकोकडे जास्तीत जास्त दोन दिवस आहेत."
"ओह्ह्ह!"
"नाही, तसे अपेक्षीतच होतं, पण मी तुला ह्यासाठी सांगितले की, माझी अशी ईच्छा आहे की, तु तिच्या अंत्यविधीसाठी यावेस"
"काय?"
".. हो .. आणि तु चार शब्दही बोलावेस तिथे, त्यानावाने तु आजपर्यंत ऐकलेले वाचलेले कामी येईल! ... प्लिज तुझ्या येण्याने मला फार बर वाटेल"
लाली कबुल करते.

 दोन दिवस झाले डेव्हिडच्या बायकोला जाऊन. कबुल केल्याप्रमाणे खरेच लाली अंत्यविधीसाठी गेलीसुद्धा! कोणत्यातरी पुस्तकातुन पाठ केलेल्या चार ओळी तिने बोलूनही दाखवल्या. पहिल्यांदाच समाजात उजळ माथ्यानं वावरली ती. पहिल्यांदाच चाळीच्या चार भिंतीच्या बाहेरील जग ख-या अर्थाने पाहिले. लाली खुष आहे. नुसतीच उजळ माथ्यानं वावरली म्हणुन नाही तर तिला आता नोकरीही लागलीय! आता ह्या धंद्यातुन बाहेर पडण्याचा आंनद ती लपवू नाही शकत आहे आणि म्हणुनच तिने डेव्हिडला घरी बोलावून कार्लोसशी भेट घडावायची ठरवलीय.

  डेव्हिड घरी पोहोचलाय पण लाली काहितरी आणण्यासाठी बाहेर गेलीय. बाहेर जोराचा पाऊस चालु आहे त्यामुळे तिला यायला उशीर होतोय बहुधा. त्यामुळे घरात डेव्हिड, कार्लोस आणि कमालीचा तणाव. कार्लोसला डेव्हिड कधीच आवडला नाहि आता तर मुळीच नाही.

शांतता आता बाकी अस्वस्थ करायला लागलीय.
डेव्हिडः बराच वेळ लागतोय नाही तिला?
कार्लोस: ह्म्म्म

शांतता!

कार्लोसः .. तर तू म्हणे लालीला स्वतःच्या दुकानात नोकरी दिलीयस?
डेव्हिडः हम्म! तिला आवड आहे पुस्तकांची
कार्लोस : आणि आता मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?

....... शांतता! डेव्हिड खिडकीबाहेरचा पाउस बघणं पसंत करतोय...

कार्लोस : किती पैसे देणारेस?
डेव्हिड : ९०० युरो .. वर्षाला
कार्लोस : ९००?
डेव्हिड : "सर्व्हीस" पकडुन
कार्लोस : सर्व्हीस?
डेव्हिड : हम्म सर्व्हीस!
कार्लोस  : तिला माहितीय का?
डेव्हिड : अजुन पर्यंत नाही पण सांगेन लवकरच!
.....
कार्लोस  : वेल्ल!..  तसे असेल तर ९०० बरेच कमी आहेत..
डेव्हिड : काय??
कार्लोस : हो! इतके मोठे दुकान तुझे आणि फक्त ९००? तेही सर्व्हीस पकडून? नाही जमणार .. १२०० युरो!
डेव्हिड : बाराशे?? वेडा आहेस का? माझे दुकान इतकेही फायद्यातले नाही!
कार्लोस : ठिक आहे मग ११००?
डेव्हिड : नाही नाही .. १००० शेवटचं
कार्लोस : १०००?
डेव्हिड : हम्म हजार
कार्लोस : ठिक आहे हजार तर हजार!
डेव्हिड : ठरलं तर मग!

दोघेही शेक-हँड करतात .. दरवाजा वाजतो .. लाली आली .. भिजून! तिने तिघांसाठी हॉट डॉग्स आणलेत... तिघेही एकत्र बसुन आस्वाद घेतायत..
डेव्हिड खुष आहे...
कार्लोसही खुष आहे...
लालीसुद्धा खुष आहे ...
बाहेरचा पाऊस बाकी थांबायचं नाव घेत नाहिये! ............


------------------------------------------------------------


It’s Raining in Barcelona
http://www.raininginbarcelona.com/

by Pau Miró (translated by Sharon G. Feldman)

Directed by Jim Guedo

Starring Alan Long (David), Leora Joy Godden (Lali), & Jeffrey Pufahl (Carlos)
-----------------------------------------------------------